कौटिलीय अर्थशास्त्रातील दुर्गांचे महत्व

दुर्गबांधणीची कला ही भारतीयांना प्राचीन काळापासून अवगत होती व याचे दाखले अनेक ग्रंथांत आढळतात. इ.स.च्या दुसऱ्या शतकात चाणक्य उर्फ कौटिल्य याने लिहिलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजच्या काळातही मार्गदर्शक मानला जाणारा ग्रंथ आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात दुर्गांविषयी जे भाष्य करण्यात आले आहे त्यावरून भारतातील दुर्गबांधणीची कला किती जुनी होती हे लक्षात येते.

कौटिलीय अर्थशास्त्रातील दुर्गांचे महत्व
दुर्गांचे महत्व

गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, किंबहुना गडकोट म्हणजे प्राणरक्षण या शब्दात किल्ल्यांचे महत्व रामचंद्र पंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या आधारेच अनेक प्रबळ शत्रूंशी झुंज देऊन स्वराज्य उभारले.

दुर्गबांधणीची कला ही भारतीयांना प्राचीन काळापासून अवगत होती व याचे दाखले अनेक ग्रंथांत आढळतात. इ.स.च्या दुसऱ्या शतकात चाणक्य उर्फ कौटिल्य याने लिहिलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा  ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजच्या काळातही मार्गदर्शक मानला जाणारा ग्रंथ आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात दुर्गांविषयी जे भाष्य करण्यात आले आहे त्यावरून भारतातील दुर्गबांधणीची कला किती जुनी होती हे लक्षात येते.

दुर्गांचे सर्वात मुख्य व प्रसिद्ध प्रकार म्हणजे डोंगरी किल्ले, जलदुर्ग आणि भुईकोट हे आपल्याला ठाऊक आहेतच आणि आजही या प्रकारातील किल्ले आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. कौटिल्याने त्याच्या ग्रंथात राज्याच्या सीमेवर चारही दिशांना जे चार किल्ले बांधले जात त्यांस दुर्ग ही संज्ञा दिली आहे याशिवाय जलदुर्गांस 'औदक', डोंगरी किल्ल्यांस 'पार्वत' आणि भुईकोटांना 'धान्वन' अशी नावे देण्यात आली आहेत. याशिवाय किल्ल्यांचे इतरही अनेक प्रकार अस्तित्वात असून अरण्यात अथवा खाडी काठच्या चिखलाच्या जागी हे किल्ले बांधले जात त्यांना 'वनदुर्ग' अशी ओळख होती.

तत्कालीन दुर्गव्यवस्थेत 'धान्वन' आणि 'पार्वत' या प्रकारातील किल्ल्यांचा वापर नगराच्या व लोकवस्तीच्या संरक्षणासाठी होत असे व 'औदक' आणि 'वनदुर्ग' या प्रकारातील किल्ल्यांचा उपयोग प्रसंगानुसार तात्पुरत्या निवाऱ्यासाठी अथवा लढण्यासाठी केला जात असे.

प्राचीन काळी नगराच्या अथवा राजमहालाच्या रक्षणासाठी जे भुईकोट बांधले जात त्यामध्ये आपत्कालीन प्रसंगी महालातून बाहेर जाण्याचा प्रसंग आल्यास निवाऱ्यासाठी राज्याच्या मध्यभागी एक उत्तम जागा शोधून तेथे एक समुदाय स्थान तयार करण्यात येत असे. हे ठिकाण नद्यांच्या संगमावर, जिवंत पाण्याच्या झऱ्यावर किंवा तलावाच्या ठिकाणी असे व त्याचा आकार गोल, चौकोनी किंवा दीर्घ चतुष्कोनी असे.

या समुदाय स्थानाच्या चोहोबाजूस तटबंदी असून तटाच्या बाहेर खंदक असत आणि या खंदकात पाटाचा वापर करून पाणी सोडण्यात येत येई आणि खंदकावरून बाहेर जाता यावे यासाठी जमिनीवरून व पाण्यातून असे मार्ग तयार केले जात. खंदकाच्या आत २४ फूट अंतरावर तटबंदी असे आणि तटबंदीची उंची ३६ फूट व रुंदी ७२ फूट असे. तटबंदी ही तळाशी चौकोनी आणि मध्यभागी अंडाकृती असून तिचा पाया हत्ती व बैलांच्या पायानी तुडवून शक्य तितका मजबूत करण्यात येई आणि तिच्यावर काटेरी व विषारी वनस्पती लावण्यात येत.

मूळ खंदकाबाहेर २४-२४ फुटांच्या अंतरावर अजून दोन खंदक तयार करण्यात येत व पहिल्या खंदकाची रुंदी ५६ फूट, दुसऱ्याची ४८ फूट आणि बाहेरील खंदकाची रुंदी ४० फूट असे. खंदकांच्या बांधकामात दगड व विटांचा वापर होत असे आणि बांधकाम होऊन त्यात पाटाने पाणी सोडल्यावर पाण्याने भरलेल्या खंदकांत मगरी आणि सुसरी सोडल्या जात. विशेष म्हणजे पाण्यातून पोहून अथवा होडीचा वापर करून आत येणे अशक्य व्हावे म्हणून पाण्यात कमळाची झाडे लावली जात जेणेकरून कमळाची देठे पाण्यात पसरली तर पोहून अथवा नौकेचा वापर करून खंदक पार करणे कठीण असावयाचे.

याशिवाय भुईकोटास रस्ते, तटावर जाण्यासाठी शिड्या, तटाचे संरक्षण, 'प्रधावीतिका' अर्थात बाहेर जाण्याचा मार्ग आणि 'निषकुरद्वार' म्हणजे चोर दरवाजा, हत्यारे ठेवण्याच्या गोपनीय जागा कशा असाव्यात हे सुद्धा कौटिल्याने आपल्या दुर्गविषयक प्रकरणात विस्ताराने सांगितले आहे.

राज्याच्या चार सरहद्दींवर जे 'दुर्ग' बांधले जात त्यांवरून शत्रूची टेहळणी व शत्रूचे आक्रमण झाल्यास त्यांचा प्रतिकार करण्यासाठी जे पहिल्या फळीचे सैन्य तैनात असे त्यांस 'अंत पालक' असे नाव होते. राज्याच्या मध्यभागाचे संरक्षण करणारे सैन्य हे 'वागूरीक' या नावाने ओळखले जाई आणि तिरंदाज हे 'शबर', शिकारी हे 'पुलिंद' आणि अरण्यात वावर करून राज्याचे रक्षण करणारे सैन्य 'अरण्यचर' या नावाने ओळखले जाई.

राजधानीच्या शहराची बाह्यरचना अर्थात शहराच्या बाहेरचा कोट व खंदक यांची रचना सुद्धा समुदायस्थानाप्रमाणेच केली जात असे मात्र शहराच्या तटबंदीस एकूण बारा मोठे दरवाजे आणि काही गुप्त दरवाजे बांधण्यात येत. याशिवाय शहरास पूर्व पश्चिम तीन आणि दक्षिणोत्तर तीन असे सहा भव्य राजमार्ग आणि इतर काही रस्ते तयार केले जात आणि रस्त्याची रुंदी ही २४ फुटांपासून ४८ फूट असे व शहराच्या उत्तर भागातील मध्यवस्तीत पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असा राजवाडा असे.

कौटिलीय अर्थशास्त्रातील दुर्गाविषयक प्रकरणाचा अभ्यास करताना त्या काळात भुईकोटांना अधिक महत्व प्राप्त होते असे दिसून येते. अर्थात भरतखंडात नांदलेल्या वेगवेगळ्या राजवटींत किल्ल्यांच्या डोंगरी दुर्ग, जलदुर्ग व भुईकोट इत्यादी प्रकारांचे महत्व त्या त्या काळातील राजकीय परिस्थतीनुसार कमी जास्त होत गेले हे निश्चित.