मावळ प्रदेश - एक ऐतिहासिक भूमी
महाराष्ट्राच्या इतिहासात मावळ प्रांतास फार महत्व आहे. शिवरायांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला तो मावळ्यांच्या साथीने त्यामुळे हे मावळे ज्या मातीत रुजले व फुलले अशा मावळची माती ही समस्त मराठी जनांसाठी पुण्यवान अशी आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात मावळ प्रांतास फार महत्व आहे. शिवरायांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला तो मावळ्यांच्या साथीने त्यामुळे हे मावळे ज्या मातीत रुजले व फुलले अशा मावळची माती ही समस्त मराठी जनांसाठी पुण्यवान अशी आहे.
शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला अनेकदा बारा मावळ हा शब्द वारंवार वाचावयास मिळतो. हा शब्द खूप प्रचलित असला तरी ही १२ मावळे नक्की कोणती याचा अंदाज पटकन येत नाही. मुळात मावळ या शब्दाचा अर्थ म्हणजे मावळतीकडील अर्थात पश्चिमेकडील भाग.
मावळ हा शब्द मुळात अतिशय प्राचीन असून काही प्राचीन शिलालेखात मावळचा उल्लेख मामलाहार असा केला गेला आहे. महाबळेश्वर पूर्वी मामलेश्वर या नावाने ओळखले जात असे. मल्लराष्ट्र, महामल्ल अशा उत्पत्त्या सुद्धा मावळ साठी देण्यात येतात.
ही मावळे प्रामुख्याने सह्याद्रीच्या कुशीत आहेत. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर नद्यांची जी खोरी तयार झाली आहेत त्या खोऱ्यांना मावळ असे म्हंटले जाते.
शाहीर तुळशीदासाने आपल्या पोवाड्यात एकूण २४ मावळांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये तो म्हणतो की १२ मावळे पुण्याखाली, १२ मावळे जुन्नरखाली. यामधील पुण्याखाली असलेली १२ मावळे ही मावळ अथवा खोरे या नावाने प्रसिद्ध आहेत तर जुन्नर खाली असलेली मावळे ही नेरे या नावाने प्रसिद्ध आहेत.
आता ही मावळे नक्की कोणती ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम आपण पुण्याखालची मावळे कुठली ते पाहू.
अंदर अथवा इंदर मावळ, पवन मावळ, घोटण मावळ, नाणे मावळ, गुंजण मावळ, हिरडस मावळ ही झाली ६ मावळे आणि उर्वरित मावळे ही खोरे या नावाने ओळखली जातात ती पुढील प्रमाणे मुसे खोरे, मुठे खोरे, पौड खोरे, भोर खोरे, वेळवंड खोरे, शिवथर खोरे.
- आंदर अथवा इंदर मावळ - कार्ले लेण्या ज्या डोंगरात आहेत त्या डोंगराच्या उत्तरेस आंध्रा नदीचे खोरे आहे. आंध्र नदी भिवपुरीजवळ उगम पावून राजापूर जवळ इंद्रायणीस मिळते. आंध्र नदीच्या कुशीत असलेल्या प्रदेशास आंदर अथवा इंदर मावळ म्हटले जाते.
- नाणे मावळ - इंद्रायणीच्या खोऱ्यास नाणे मावळ असे नाव आहे. इंद्रायणीच्या उत्तर बाजूस नाणे नावाचे एक गाव आहे त्यावरून या मावळास नाणे मावळ असे नाव मिळाले.
- पवन मावळ - पवना नदीच्या आसमंतातील प्रदेशास पवन मावळ या नावाने ओळखले जाते. तुंग किल्ल्याच्या उत्तर दिशेस पवना उगम पावते आणि दापोडी व बोपोडी जवळ मुळा नदीस मिळते.
- पौड खोरे - मुळा नदीच्या खोऱ्यास पौड खोरे असे नाव आहे. मुळशी तालुक्यात पौड नावाचे गाव आहे जे या तालुक्याचे मुख्यालय सुद्धा आहे.
- मुसे खोरे - मुसा उर्फ मोसे नावाची नदी खडकवासला या ठिकाणी मुठा नदीस मिळते. मोसे नावाचे एक खेडे त्या नदीच्या काठावर आहे. मुसा नदीच्या खोऱ्यास मुसे खोरे असे नाव आहे.
- मुठे खोरे - मुठा नदीच्या काठावर मुठे नावाचे गाव आहे. मुठा नदीच्या खोऱ्यास मुठे खोरे या नावाने ओळखले जाते.
- गुंजण मावळ - गुंजवणी नावाची नदी राजगड किल्ल्याच्या उत्तरेकडील डोंगरात गुंजवणे येथे उगम पावून आळंदे नजीक नीरा नदीस मिळते. गुंजवणी नदीच्या खोऱ्यास गुंजण मावळ म्हणतात.
- हिरडस मावळ - नीरा नदीच्या काठी हिरडोशी नावाचे एक गाव आहे. या परिसरात हिरड्याची झाडे बऱ्याच प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागास हिरडस मावळ अशी संज्ञा आहे.
- रोहीड खोरे - रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी रोहिड खोरे आहे. रोहिडा किल्ला हा या रोहिडा खोऱ्यातच येतो.
- शिवतर खोरे - घाटमाथ्याच्या पश्चिम दिशेस असलेले हे एकमेव मावळ. या मावळात एकूण तीन शिवतरे येतात ज्यांना कुंभे शिवथर, आंबे शिवथर व कसबे शिवथर अशी नावे आहेत.