दुर्गविधानम - किल्ल्यांची बांधणी

दुर्ग कसा बांधावा हे सविस्तरपणे सांगणारे प्राचीन साधन म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र. यातील दुसऱ्या अधिकारणातील तिसरा अध्याय (प्रकरण २१) हा किल्ल्याच्या बांधणीबद्दल अतिशय बारीक सूचना व माहितीने युक्त आहे.

दुर्गविधानम - किल्ल्यांची बांधणी
दुर्गविधानम - किल्ल्यांची बांधणी

मागील भागात आपण प्राचीन काळात विविध ग्रंथात आलेल्या दुर्गांच्या उल्लेखांचा धावता आढावा घेतला. या भागात आपण प्राचीन साहित्यात प्रत्यक्ष दुर्गबांधणीबद्दल ऊपलब्ध असणारी माहिती जाणून घेऊयात.  

ऋग्वेदात आपण तटबंदीयुक्त पुरांचा उल्लेख पहिला, तसेच मनुस्मृती मध्ये सांगितलेले दुर्गांचे विविध प्रकार पाहिले. महाभारतातील शांतिपर्वात पितामह भीष्म यांनी केलेली दुर्गचर्चा देखील पाहिली. युधीष्ठीर जेव्हा त्यांना विचारतो कि राजाने राहायचे ते नगर कसे असावे? यावर उत्तर देताना पितामह त्याला जे उत्तर देतात त्यात विशेषतः दुर्ग कसे असावेत याबद्दल सांगताना म्हणतात - शांतीचे वास्तव्य असणारे, कोठूनही भीती नसलेले, शूर आणि द्रव्यसंपन्न लोकांनी पूर्ण असलेले जे नगर, ज्यामध्ये, सैन्य व आमात्य ज्याला वश आहेत अशा राजाने प्रवेश करावा. नगरातील लोकांना ये-जा करण्यासाठी नगराला  लहान दारे ठेवावी व त्यांचे संरक्षण करावे. द्वारावर संग्रामासाठी लागणारी सर्व आयुधे सदैव सज्ज ठेवावीत. दुर्गांच्या जवळ सैन्याचा तळ असावा. मात्र या चर्चेतून प्रत्यक्ष दुर्ग उभारणीसाठी काही ठोस माहिती मिळत नाही.

विसाव्या शतकात सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि तिची अनेक शहरे उत्खननात सापडली. मोहेंजोदारो व हडप्पा हि आदर्श शहर रचनेचे नमुने म्हणून गणली गेली. मात्र सिंधू संस्कृतीचं कोणताही लिखित साहित्य उपलब्ध नसल्याने हि शहर बसविण्यासाठी त्यांनी कोणते रचनाशास्त्र प्रमाण मानले होते हे आज तरी गुलदस्त्यातच आहे.

दुर्ग कसा बांधावा हे सविस्तरपणे सांगणारे प्राचीन साधन म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र. यातील दुसऱ्या अधिकारणातील तिसरा अध्याय (प्रकरण २१) हा किल्ल्याच्या बांधणीबद्दल अतिशय बारीक सूचना व माहितीने युक्त आहे.

प्रकरणाचे नावच मुळी 'दुर्गविधानम' अर्थात दुर्गाची बांधणी असे आहे. यात कौटिल्य सांगतो - जनपदाच्या सरहद्दीवर चारी दिशानी युध्दासाठी सज्ज असे दुर्ग स्थापावेत. पुढे दुर्गाचे जलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग, धन्वदुर्ग असे अनेक प्रकार सांगून राज्यातील उत्पन्न जमा करण्याचे ठिकाण हे मध्यभागी बसवावे व ते जलसाठ्याच्या (नैसर्गिक वा कृत्रिम) सन्निध असावे आणि अनेक प्रकारच्या बाजारपेठांणी युक्त आणि जलमार्ग व खुष्कीच्या मार्गाने इतर प्रदेशाला जोडलेलं असावे.

शहराभोवती एक एक दंडाच्या अंतरावर ३ खंदक १४, १२ व १० दंड रुंदीचे खंदक असावेत. खंदकाची खोली ही रुंदीच्या पाऊणपट अथवा अर्धी असावी. तसेच खंदकाच्या  भिंती या विटांनी व दगडांनी बांधलेल्या असाव्यात आणि त्यांना जिवंत पाण्याचे झरे असावेत अथवा दुसरीकडून पाणी सोडून ते भरण्याची व अधिकचे पाणी वाहून जाण्याची सोय असावी. तसेच खंदकात कमळे, मगरी आणि इतर जलचर असावेत.

सर्वात आतल्या खंदकापासून ४ दंड अंतरावर ६ दंड उंच व त्याच्या दुप्पट रुंद असा वर निमुळता होत जाणारा पक्का तट (खंदकासाठी खणलेल्या) मातीने बांधावा. तट बांधून उरलेली माती शहरात भराव घालण्यासाठी वापरावी. तटाच्या वर रुंदीच्या दुप्पट उंचीची व १२ ते २४ हातापर्यंत  उंची असणारी विटांची अथवा दगडांची भिंत (वप्र) बांधावी. मात्र हि भिंत लाकडाची कदापि घालू नये कारण त्यात अग्नी दडलेला असतो.

वप्राच्या रुंदी एवढीच  लांबी-रुंदी असलेले बुरुज (अट्टालक)  एकमेकांपासून ३० दंड अंतरावर बांधावेत. २ बुरुजांच्या मधोमध देवडी बांधावी. सैनिकांना चढ उतार करण्यासाठी १ किंवा २ दंड रुंदीचे जिने करावेत. शत्रूला सहज हल्ला करता येणार नाही अशा ठिकाणी सैनिकांना तटाबाहेर पाडण्यासाठी द्वार (निष्किरद्वार) देखील तयार करून घ्यावे.

भिंतीच्या दोन्ही बाजूस दिड दंड विस्ताराची व मेंढ्याच्या शृंगयुक्त डोक्याच्या आकाराची द्वाराची रचना करावी. पुढे कौटिल्य द्वाराच्या रचनेबद्दल अतिशय बारीक-सारीक माहिती देतो. सर्वच माहिती विस्तार भयास्तव इथे देता येणार नाही.

पुढे कौटिल्य किल्य्यात जे नगर वसवायचे आहे ते कसे बसवावे याबाबदल विस्ताराने सांगतो. ३ राजमार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे व ३ राजमार्ग दक्षिणोत्तर जाणारे असावेत. नागरास १२ दरवाजे असावेत व त्यात पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठी पाट व छुपे रस्ते असावेत. सामान्य रस्ते ४ दंड रुंदीचे तर राजमार्ग, द्रोणमुख, ग्रामीण प्रदेश, गुरचराईच्या जागा, बंदरे, स्मशान यांना जाणारे रस्ते ८ दंड रुंद असावेत. हत्तीसाठी व शेताच्या बाजूने जारे मार्ग २ दंड, रथासाठीचे मार्ग ५ दंड रुंदीचे असावेत. याशिवाय मनुष्य, लहान जनावरे यांसाठी २ हात व जनावरांसाठी ४ हात रुंद मार्ग असावेत.

जेथे ४ वर्णाचे लोक राहू शकतील अशा सर्वोत्कृष्ट जागी राजाचे निवासस्थान असावे. राजवाडा वस्तीच्या मध्यभागाच्या उत्तरेकडील एक नवमांश भागात पूर्वाभिमुख असा बांधावा.

राजवाड्याच्या पूर्वेस उत्तरबाजूस आचार्य आणि पुरोहित यांचे निवासस्थान, यज्ञशाळा व जलागार, आणि मंत्र्यांचे  निवास असावे. पूर्वेस दक्षिण बाजूस पाकशाला, हस्तीशाला व कोठार असावेत. त्याच्या पलीकडे सुगंधी द्रव्ये, फुले व रस यांचे व्यापारी, प्रसाधने बनविणारे कारागीर व क्षत्रिय यांची वस्ती पूर्व दिशेला असावी.

राजवाड्याच्या दक्षिणेस पूर्व भागात हिशेबतपासनीसाचे कार्यालय, भांडार व सेवकांच्या राहण्याच्या जागा असाव्यात. तसेच पश्चिम भागात जंगलातील उत्पन्नासाठी कोठार व आयुधागार असावे.

राजवाड्याच्या पश्चिमेस दक्षिण भागात गाढव व उंटें यांचे गोठे व उत्तर भागात गाड्या व रथ यांसाठी तबेले असावेत व त्यापलीकडे लोकर व सूत कारागीर, बुरुड काम, चामड्याचे काम करणारे, चिलखते, शस्त्रे व तत्सम आवरणे बनवणारे कारागीर व शूद्र यांची वस्ती असावी.

राजवाड्याच्या उत्तरेस पश्चिम भागात पण्यगृह व औषधोपचार केंद्र तर पूर्व भागात कोषागार, गोशाळा व अश्वशाळा असावी.

वस्ती नसलेल्या भागात ताटाला लागून श्रेणी व परदेशी व्यापारी यांचे संघ राहावेत.

नगराच्या मध्यभागी देवी-देवतांची मंदिरे असावीत. याशिवाय कौटिल्य, दिगपाल मंदिरे, चैत्यगृहे, सेतुबंध यांची स्थाने व इतर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी कुठे कशा असावयत याबद्दल देखील खूप मौलिक मार्गदर्शन करतो. पुढील भागात मौर्य काळ ते मध्ययुगीन काळात दुर्ग रचना कशी बदलली हे जाणून घेऊयात. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)