विश्वासराव - एक शिवकालीन घराणे

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेले कल्हे हे एक सुंदर गाव. कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या या  कल्हे गावातील विश्वासराव घराणे हे आद्य शिवकालीन घराण्यांपैकी एक.

विश्वासराव - एक शिवकालीन घराणे
विश्वासराव

विश्वासरावांच्या घराण्यातील शिवपूर्वकालीन नाव म्हणजे सिद्धपाल विश्वासराव आणि त्यांचे पुत्र विजयराज विश्वासराव जे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. शहाजी महाराज व विजयराज विश्वासराव त्या काळी निजामशाहीमध्ये असल्याने दोघांचेही मैत्रीपूर्ण संबंध होते.

पुढे या मैत्रीचे रूपांतर नात्यात होऊन विजयराज यांची कन्या जयंती यांचे लग्न शहाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र व शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यासोबत झाले. या लग्नापासून विश्वासराव व भोसले घराण्यातील दृढ संबंधांचा सिलसिला पुढेही कायम राहिला कारण शिवाजी महाराजांनी आपली कन्या दिपाबाई बाळीबाई उर्फ यांचे लग्न विश्वासराव घराण्यातील विसाजी विश्वासराव यांच्यासोबत करवून दिले होते. बाळीबाई या महाराणी सोयराबाई यांच्या कन्या व छत्रपती राजाराम यांच्या सख्ख्या भगिनी.

विजयराज हे शंकरभक्त, कर्तृत्ववान, सुप्रसिद्ध व वैभवशाली असल्याचा उल्लेख जुन्या साधनात मिळतो. विश्वासराव हे बिरुद दृढ विश्वासाचे प्रतीक होते.

मात्र इतिहासातील इतक्या महत्वाच्या घराण्याची योग्य दखल इतिहास लेखनात घेतली गेली नाही. शिवोत्तरकाळातही विश्वासराव घराण्यातील अनेक पुरुषांनी आपल्या कर्तबगारीने इतिहासात आपले नाव कोरले.

१६५७ मध्ये उत्तर कोकण मोहिमेच्या वेळी कर्नाळा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला व त्या किल्ल्यावर विश्वासराव घराण्याची नेमणूक केली. शाहू महाराजांच्या काळात विश्वासराव घराण्यातील पुरुषांनी कर्नाळा प्रांतातील माणिकगड व इतर काही किल्ल्यांवर हवालदार या नात्याने जबाबदारी पहिली होती.  

ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब यांनी आपल्या शिवरायांच्या अष्टराज्ञी या ग्रंथात शिवकन्या दिपाबाई या विश्वासरावांच्या घराण्यात दिल्या होत्या असा उल्लेख केला आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण जेव्हढा माझा अनुभव आहे तो पाहता अनेकांचा अप्पांच्या पुस्तकातील शब्दन शब्द खरा असतो.

आजही गावात पाहावयास मिळणारी शिवकन्या दिपाबाई यांची समाधी याचा खूप महत्वाचा पुरावा आहे. मध्यंतरी समाधीस्थळाची डागडुजी करण्यात आली त्यावेळी काही शिवराया समाधीस्थळाजवळ सापडल्या होत्या.

अशावेळी अप्पांनी लिहिलेल्या संदर्भाचा धागा पकडून अधिक प्रयत्न केल्यास अनेक पुरावे सापडू शकतात हा माझा स्वानुभव आहे. 

शिवोत्तर काळात विश्वासराव घराण्यातील पुरुषांचे उल्लेख किल्ल्याचे हवालदार असे येतात त्याअर्थी हवालदार हे पद किल्लेदार या पदाखालील आहे का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो यावर एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की शिवकाळात किल्लेदार या पदाचा उल्लेख सापडत नाही आणि असेलच तर तो तुरळक असेल कारण राजकोषात हवालदारास किल्ल्याचा प्राण म्हटला आहे. 

तो उल्लेख पुढीलप्रमाणे 'त्यास आधी किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार, तैसाच सरनोबत. हे निःस्पृह असावेत आणि कोणाचे निसबती अथवा आर्जवामुळे ठेवावेत असे नाही. जे कुलवंत मराठे आणि शिपाई.

अतिशय विश्वासू, काबिलदार, अनिद्र, सकल लोकांचे समाधान रक्षून स्वामीकार्य करणारे आणि हा किल्ला म्हणजे आपल्या स्वामीने आपल्याला परम प्रिय भेट दिली आहे असा विचार करून रात्रीचा दिवस व दिवसाची रात्री करून किल्ल्यास रक्षणारे असावेत. 

यावरून हे स्पष्ट होते कि हवालदार हाच किल्ल्याचा किल्लेदार त्याबरोबरीचा सरनोबत ज्याकडे लष्कराची जबाबदारी असते. ज्या कर्नाळा किल्ल्याची विश्वासराव घराण्याने निस्पृह सेवा केली आणि त्या किल्ल्याच्या तळाशीच नांदले त्या कर्नाळ्याच्या इतिहासामध्ये विश्वासराव घराण्याचे नाव अग्रक्रमाने येणे खूप गरजेचे आहे.