सिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू

स्वराज्यासाठी उपद्रवी ठरलेला असाच एक शत्रुपक्षातील सरदार म्हणजे सिद्दी जौहर. सिद्दी जौहर हा मूळचा हबशी होता. हबशी हे मूळचे आफ्रिका खंडातील ऍबसिनिया येथील निवासी. त्यांना सिद्दी या नावानेही ओळखले जाते.

सिद्दी जौहर - स्वराज्याचा एक शत्रू
सिद्दी जौहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांना प्रामुख्याने दोन बलाढ्य शत्रूशी टक्कर द्यावी लागली. हे शत्रू म्हणजे दिल्लीचे मोगल व विजापूरची आदिलशाही. शिवरायांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांना आदिलशाही राज्याशी दोन हात करावे लागले. मोगलांसारखेच आदिलशाहच्या दरबारी असलेले बलाढ्य सरदार स्वराज्याचा घात करण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत मात्र शिवाजी महाराजांनी कधी सामर्थ्याने तर कधी चतुराईने या शत्रुंना कायमच पराभवाची धूळ चारली.

स्वराज्यासाठी उपद्रवी ठरलेला असाच एक शत्रुपक्षातील सरदार म्हणजे सिद्दी जौहर. सिद्दी जौहर हा मूळचा हबशी होता. हबशी हे मूळचे आफ्रिका खंडातील ऍबसिनिया येथील निवासी. त्यांना सिद्दी या नावानेही ओळखले जाते. सय्यद या शब्दावरून सिद्दी या शब्दाची निर्मिती झाली आहे. सिद्दी हे निजामशाही काळात भारताच्या पश्चिम भागातून अरबी समुद्रामार्गे व्यापार अथवा धार्मिक कारणासाठी जो प्रवास होत असे त्या प्रवाशांचे इतर समुद्री चाच्यांपासून रक्षण करण्यासाठी निजामशहाने खास तैनात केलेले दर्यावर्दी होते.

कालांतराने सिद्दींनी अरबी समुद्रावरील राज्यव्यवस्थेतही आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवल्यामुळे त्यांना उत्तरोत्तर बढती मिळत गेली व त्यांची काही स्वतंत्र राज्ये सुद्धा स्थापन झाली. जंजिरा-राजपुरी येथील सिद्दी हे त्यापैकीच एक.

सिद्दी जौहर हा दंडाराजपुरी येथील सिद्दींपैकी नसला तरी तो मूळचा हबशीच होता. त्याची सुरुवातीची कारकीर्द ही गुलाम म्हणून गेली मात्र त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे पाहता पाहता तो आदिलशाही राज्यातील एक प्रबळ सरदार झाला. त्याच्या सरदार होण्यामागे एक कथा आहे. 

सुरुवातीस सिद्दी जौहर याने आदिलशाही राज्याच्या अंतर्गत कर्नुल हा प्रदेश आदिलशाही सत्तेविरोधात विद्रोह करून ताब्यात घेतला होता व या प्रांताचे सुभेदार पद त्याने स्वतःकडे ठेवले होते. आदिलशहा सिद्दी जौहर व त्याच्यासारख्या इतर बंडखोरांवर या कृत्याने नाराज झाला होता व या सर्वांचे पारिपत्य करण्याचा विचार त्याच्या मनात कायम घोळत असे.

याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्याच्या वल्गना करून स्वराज्यावर चालून गेलेला बलाढ्य आदिलशाही सरदार अफजलखान जावळीच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांकडून मारला गेल्याने आदिलशाही साम्राज्यास खूप मोठा हादरा बसला. 

अफजलखानानंतर आदिलशाही साम्राज्यात शिवाजी महाराजांना तुल्यबळ असा एकही सरदार उरला नव्हता त्यामुळे संपूर्ण आदिलशाही सत्ता चिंतेत बुडाली होती व या संधीचा फायदा घेऊन सिद्दी जौहरने आदिलशाही राज्यात मोठे स्थान मिळवण्याचा विचार केला यामुळे त्याचे दोन फायदे होणार होते, एक म्हणजे त्याने आदिलशाह कडून जबरदस्ती बळकावलेली कर्नुलची जहागीर सुद्धा त्याच्याच ताब्यात राहिली असती व आदिलशाही राज्यात त्यास सरदार हे मोठे पदही मिळाले असते. 

यानंतर सिद्दी जौहरने आदिलशाहास पत्र लिहिले व म्हणाला की आजवर माझा हातून बरेच गुन्हे झाले आहेत मात्र आपण ते गुन्हे माफ करून मला पुन्हा आपल्या राज्यात सामील करून घेत असाल तर तुमचा प्रबळ शत्रू शिवाजी यांचा निःपात करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन.

आदिलशाहच्या दृष्टीने शिवाजी महाराज व सिद्दी जौहर हे दोनही बंडखोरच होते त्यामुळे हे दोघे एकमेकांबरोबर लढून त्यामध्ये कोणाचाही पराभव झाला तरी फायदा आदिलशाहाचाच होणार होता त्यामुळे त्याने सिद्दी जौहरची विनंती स्वीकारून त्याचे सर्व अपराध माफ केले आणि त्यास 'सलाबतखान' ही पदवी दिली व शिवाजी महाराजांविरोधातील मोहिमेचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवले.

सिद्दी जोहरच्या हाताखाली त्यावेळी रुस्तुमेजमा, फाजलखान, सादतखान, बाजी घोरपडे, पिऊ नाईक, भाईखान, सिद्दी मसूद असे सेनानी देण्यात आले होते. २ मार्च १६६० मध्ये शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले असता सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला. याचवेळी दिल्लीहून आणखी एक संकट स्वराज्यावर चालून येत होते ते म्हणजे मोगल साम्राज्याने दक्षिणेस नेमलेला सुभेदार शाईस्तेखान हा एक लाख सैन्यसह स्वराज्याच्या दिशेने कूच करीत होता.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांनी आपली सुटका कशी करून घेतली हा इतिहास आपण सर्वांनाच माहित आहे मात्र या मोहिमेत आलेल्या अपयशामुळे आदिलशहाची सिद्दी जोहरवर गैरमर्जी झाली. आदिलशाहास हेच वाटू लागले की सिद्दी जोहरने महाराजांकडून लाच घेऊन त्यांना या वेढ्यातून निसटून दिले असावे. यानंतर आदिलशाह हा शिवाजी महाराजांनी तुला दिलेले द्रव्य आम्हास दे अशी मागणी सिद्दी जोहरकडे करू लागला मात्र शिवाजी महाराज हे स्वतःच्या व मावळ्यांच्या पराक्रमाने पन्हाळगडाचा वेढा तोडून बाहेर पडले होते अशावेळी आधीच फजिती झालेल्या सिद्दी जोहरकडे द्रव्य तरी कसे असणार?

आदिलशाह हा सरळ सांगून ऐकत नाही हे पाहून सिद्दी जोहरने पुन्हा एकदा आदिलशाहविरोधात बंड उभारले व तो पुन्हा एकदा आपली सुरक्षित जागा म्हणे कर्नुळच्या किल्ल्यात जाऊन आदिलशाह विरोधात लढायची तयारी करू लागला. 

आदिलशहाला लक्षात होते की सिद्दी जोहरला सरळ पणे जिंकणे अशक्य आहे त्यामुळे आदिलशहाने कट कारस्थान करून त्याला संपवण्याचा निश्चय केला. गुप्तरित्या सिद्दी जोहरच्या मद्यात त्याने त्याच्या माणसांकरवी विष घालून सिद्दी जोहरचा प्राण घेतला. या कृत्यामुळे आदिलशहाचा फायदा झाला नाहीच पण स्वराज्याच्या एका शत्रूच्या हातून स्वराज्याचा दुसरा शत्रू मारला जाऊन आदिलशाही राज्य आणखी कमकुवत होण्यास हातभार लागला. कारण आदिलशहाच्या मनात आपल्या दोन शत्रुंना एकमेकांसोबत लढवून संपवण्याचे इरादे सुरु होते मात्र त्याच्याच संशयी वृत्तीमुळे त्याच्या त्याच्या गोटात आलेला सिद्दी जोहर संपला व अनायासे शिवाजी महाराजांचेच दोन शत्रू एकमेकांसोबत लढून निष्प्रभ झाले.