पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
इतिहासात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म सन १७२५ साली झाला. आहिल्याबाई या मूळच्या बीड येथील चौंढे गावाच्या कन्या.

महाराष्ट्राच्या इतिहासात पुष्कळ अमूल्य अशी स्त्रीरत्ने होऊन गेली. काहींनी आपल्या पराक्रमाने, काहींनी आपल्या बुद्धी व औदार्याने तर काहींनी आपल्या लोकोत्तर गुणांमुळे इतिहासात आपले नाव कायमचे कोरून ठेवले.
असेच एक स्त्रीरत्न म्हणजे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंना जनमानसात पुण्यश्लोक या पदवीने ओळखले जाते व ही पदवी त्यांनी आपल्या सात्विक वृत्तीने मिळवली. इतिहासात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म सन १७२५ साली झाला. आहिल्याबाई या मूळच्या बीड येथील चौंढे गावाच्या कन्या. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंढे गावचे पाटील होते. १७३३ साली आहिल्या बाई यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्यासोबत संपन्न झाला. खंडेराव हे तसे स्वतंत्र वृत्तीचे असले तरी आहिल्यादेवी यांच्या शब्दाबाहेर ते कधीही नसत. १७४५ साली अहिल्याबाईंनी मालेराव या मुलास देपालपूर येथे जन्म दिला व तीन वर्षांनी मुक्ताबाई नावाचे कन्यारत्न त्यांना प्राप्त झाले.
१७५४ साली कुंभेरीच्या किल्ल्यास मराठ्यांनी वेढा घातला होता त्यावेळी खंडेराव होळकर यांना गोळी लागून हौतात्म्य प्राप्त झाले. खंडेराव यांचे जाणे आहिल्याबाई यांच्यासाठी अतिशय मोठा धक्का होता. त्यांनी आपल्या पतीसोबत सहगमन करण्याचे ठरवले मात्र अहिल्याबाईंचे सासरे मल्हारराव यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून प्रवृत्त केले व म्हणाले.
"तू आम्हाकडे पाहून मागे राहिलीस तर खंडू राहिला व अहल्या गेली "
मल्हारराव व इतरांनी खूप समजावल्याने अहिल्याबाईंनी सहगमन गेले नाही. यानंतर मल्हाररावांनी आपल्या संस्थानाचा सर्व कारभार अहिल्याबाईंच्या स्वाधीन केला.
१७६६ साली मल्हारराव मरण पावले यानंतर संस्थानाची व कुळाची सर्व जबाबदारी आहिल्याबाई यांच्यावरच येऊन पडली. त्यांनी आपला २१ वर्षीय पुत्र मालेराव यास गादीवर बसवून त्याच्या नावाचा शिक्का सुरु करून राज्यकारभार पाहू लागल्या मात्र दुर्दैवाने पुढील १ वर्षभरातच मालेरावाचा मृत्यू झाला.
मालेराव यांच्या मृत्यूनंतर त्यांनी होळकर घराण्यातील मुलगा दत्तक घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली. कालांतराने त्यांनी जानोजी होळकर यांचा पुत्र तुकोजी यास दत्तक घेतले.
मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव पेशवे यांनी होळकर संस्थानाचा कारभार स्वतःच्या ताब्यात घ्यावा असा विचार केला. होळकरांचे कारभारी गंगोबा चंद्रचूड हे राघोबाचे समर्थक होते त्यानुसार दत्तक घेऊन गंगोबाने कारभार चालवायचा असा बेत तयार करण्यात आला. मात्र ज्यावेळी हा बेत अहिल्याबाईंना समजला तेव्हा त्यांनी राघोबादादास स्पष्ट सांगितले कि जहागिरी व फौजेची जबाबदारी सांभाळण्यास मी समर्थ आहे. इतर कुणीही त्यात ढवळाढवळ करू नये. माधवराव पेशवे यांना हा बाणेदारपणा खूप आवडला मात्र राघोबादादांना हे रुचले नाही.
त्यांनी सरळ अहिल्याबाईंना इंदुरवर हल्ला करण्याची धमकी दिली. आहिल्याबाई सुद्धा लढण्यास तयार झाल्या त्यांनी त्वरित तुकोजी होळकर यांना फौजेचे मुख्य केले आणि राघोबा समर्थक गंगोबा यांना कारभारावरून काढून टाकले. आहिल्याबाई येथे तयारी करत असताना रघुनाथराव यांनी शिंदे, नागपूरकर भोसले, गायकवाड आणि दाभाडे इत्यादी सरदारांसह तयारी सुरु केली.
अहिल्याबाईंना हे समजताच त्यांनी आपले दूत माधवराव पेशवे यांच्याकडे रवाना केले व भोसले, गायकवाड आणि शिंदे यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. महादजी शिंदे यांनीही इंदुरवर स्वारी करण्यास नकार दिला. यानंतर आहिल्याबाई यांनी रघुनाथरावांना पुढील संदेश पाठवला.
"माझा पराभव झाला तर मी अबलाच आहे, पण आपणावर तो प्रसंग आला तर जग काय म्हणेल याचा विचार करून युद्धास तयार व्हावे."
अहिल्याबाईंच्या या पत्राने रघुनाथराव थंड पडले व त्यांना युद्धाचा बेतही गुंडाळावा लागला.
१७७१ च्या सुमारास मेवाडचा राणा अरिसिंह यांच्याकडून महादजी शिंदे यांनी काही परगणे घेतले त्यावेळी अहिल्याबाईंनी सुद्धा काही मुलुख राणाकडून मिळवला होता याशिवाय रामपुऱ्याच्या जहागीरदाराचे बंड मोडण्याच्या कामात अहिल्याबाईंचा मुख्य सहभाग होता. अहिल्याबाईंनी होळकरांच्या सैन्याचे अधिपत्य तुकोजी यांच्याकडे दिले असले तरी मुख्य कारभार त्याच पाहत. गोविंदपंत गानू हे अहिल्याबाईंचे मंत्री होते. विविध ठिकाणी होळकर दरबारातील जे प्रतिनिधी असत त्यांची नेमणूक स्वतः अहिल्याबाईच करीत. दीर्घ मुदतीच्या कराराने जमीन भाड्याने देण्याची पद्धत प्रथम अहिल्यादेवींनी सुरु केली असे माल्कम म्हणतो.
आपल्या राज्यात लोकहिताची अनेक कामे अहिल्याबाईंनी केली अन्नछत्रे, धर्मशाळा, विहिरी, रस्ते व घाट विपुल प्रमाणात उभारले. काशी येथील विश्वेश्वराचे मंदिर आहिल्याबाई यांनी पुन्हा बांधले याशिवाय गया येथील विष्णुपदाच्या मंदिराचा सुद्धा त्यांनी जीर्णोद्धार केला. कलकत्ता ते काशी रस्ता, काशीचा मणिकर्णिका घाट, दशाश्वमेघ घाट, सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही मोठं मोठी धर्मकृत्ये त्यांनी केली.
आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत त्यांनी आपल्या मुलाचा शिक्काच कायम ठेवला होता. त्यांच्या मुलीचे लग्न यशवंतराव फणशे यांच्यासोबत झाले होते. १७९० साली त्यांच्या मुलीचा मुलगा नथ्याबा फणशे याचे निधन झाले त्यानंतर एकच वर्षात जावई यशवंतराव फणशे हे सुद्धा वारले. यशवंतराव फणशे यांचे निधन झाल्यावर आहिल्याबाई यांच्या कन्या मुक्ताबाई सुद्धा सती गेल्या.
दि. १३ ऑगस्ट १७९५ साली आहिल्याबाईचे निधन झाले. आपले औदार्य, न्यायप्रियता, भूतदया व सदाचरण या गुणांमुळे त्यांना पुण्यश्लोक हा बहुमान मिळाला. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या कारकिर्दीत राज्यात बंडे झालीच नाहीत याशिवाय अनेक राजे राजवाडे त्यांना खूप मान देत त्यामुळे राज्यावर आक्रमण करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नसे. अशा या चारित्र्यवान पुण्यश्लोक देवीस शतशः नमन.