एकोजीराजे भोसले - शिवरायांचे धाकले बंधू

शिवरायांना जसे थोरले बंधू (संभाजीराजे) होते तसेच धाकले बंधूही होते आणि ते म्हणजे एकोजीराजे भोसले. एकोजीराजांना व्यंकोजीराजे असेही नाव होते. एकोजीराजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू. शहाजी महाराजांची द्वितीय पत्नी तुकाबाई या मोहिते घराण्यातील होत्या. त्यांचेच पुत्र म्हणजे एकोजीराजे.

एकोजीराजे भोसले - शिवरायांचे धाकले बंधू

एकोजीराजे यांचा जन्म १६३२ साली झाला त्याअर्थी त्यांचे वय शिवाजी महाराजांपेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान होते. शहाजी महाराज बंगलोर येथे असताना एकोजीराजे हे त्यांच्यासोबत असत.

१६५७ साली विजापूरमध्ये अराजक माजल्याने कर्नाटकातील नायकांनी विजापूरच्या विरोधात बंड उभारले त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूर दरबारने शहाजी महाराजांना ही बंडाळी मोडून काढण्यास रवाना केले यावेळी कनकगिरीच्या परिसरात श्रीशैल मल्लिकार्जुन या ठिकाणी कब्जा घेण्यास शहाजी महाराजांनी व्यंकोजीराजेंना रवाना केले होते.

प्रख्यात कवी जयराम पिंड्ये हे कायम एकोजीराजेंसोबत असायचे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात राज्य निर्माण करण्यास सांगून कर्नाटकाचा कारभार एकोजीराजेंकडे द्यावा असे शहाजी राजांच्या मनात होते पण तंजावरचा लिंगाप्पा नायक शहाजी महाराजांना वश होऊ शकला नाही मात्र शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६७४ साली व्यंकोजींनी तंजावर प्रांत ताब्यात घेऊन तेथे आपले राज्य निर्माण केले.

एकोजीराजे यांना एकूण तीन राण्या व शहाजी, शरफोजी व तुकोजी असे तीन पुत्र होते. स्वतःचे राज्य असूनही व्यंकोजीराजे आदिलशाहाचे अंकित राहण्यात धन्यता मानत होते व याशिवाय शहाजी महाराजांच्या वडिलार्जित संपत्तीचा वाटा भाऊ या नात्याने त्यांना देण्यासही ते कायम विरोध दर्शवित होते. त्यायोगे शिवाजी महाराजांसोबत त्यांचा वैरभाव निर्माण झाला होता. 

हे पाहून महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत व्यंकोजीराजेंचे राज्य व आपली वडिलोपार्जित जहागिरी ताब्यात घेतली. या पराभवाने व्यंकोजीराजे खूप खचले व बैरागी होऊन सन्यास घेण्याचा विचार करू लागले. ही बातमी शिवाजी महाराजांना समजल्यावर त्यांनी वडीलबंधू या नात्याने त्यांना पत्र लिहून उतारवयात सर्वांनाच वैराग्य पत्करायचे आहे मात्र सध्या पराक्रमाचे वय आहे तेव्हा पराक्रमाचे तमाशे दाखवा असा सल्ला दिला व व्यंकोजीराजेंचे जिंकलेले राज्य त्यांना परत केले.

खरं तर पुनर्मीलन झाल्यावर व्यंकोजींनी स्वतःहून आपले राज्य स्वराज्यास जोडायला हवे होते मात्र ते राज्य कायम स्वतंत्र राहिले. पुढे त्यांनी म्हैसूरच्या राजास बंगलोर हे शहर तीन लाखात विकून टाकले. व्यंकोजीराजे यांचा मृत्यू सन १६८७ साली झाला. व्यंकोजीराजे यांच्यानंतर हैदर, टिपू आणि ब्रिटिश हे तीन शत्रू तंजावरच्या राज्याच्या अवतीभवती तयार होऊन त्यांनी कालपरत्वे राज्यावर अनेक आघात केले.