महाराष्ट्र राज्याचा प्राचीन इतिहास
महाराष्ट्राचे रामायणकालीन नाव म्हणजे दंडकारण्य. दंडकारण्य हे दक्षिणपथातील एक दाट अरण्यांनी युक्त असा प्रदेश होता.
महाराष्ट्राचे रामायणकालीन नाव म्हणजे दंडकारण्य. दंडकारण्य हे दक्षिणपथातील एक दाट अरण्यांनी युक्त असा प्रदेश होता. मत्स्य व मार्कंडेय पुराण महाराष्ट्राबद्दल रामायणातील पुढील माहिती देते.
सह्याद्रीच्या उत्तर भागात जिथे गोदावरी आहे व गोवर्धन नावाचे नगर आहे तेथे संपूर्ण पृथ्वीतलावरील अतिशय सुंदर प्रदेश आहे. त्या ठिकाणी दिव्य वनस्पतींनी युक्त असे सुंदर उद्यान राम व सीता यांच्यासाठी भारद्वाज ऋषींनी निर्माण केले.
दंडाकारण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रास जुन्या साहित्यात दक्षिणापथ असेही म्हटले गेले. कौटिल्य अर्थशास्त्र, महाभारत, रामायण, नाणेघाट शिलालेख, रुद्ररामन गिरनार शिलालेख इत्यादीमध्ये महाराष्ट्राचा दक्षिणापथ असा उल्लेख येतो.
नाणेघाटातील सातवाहन कालीन शिलालेखात 'महारठी गनकयीरो' असा उल्लेख आहे. त्या काळात रथी व महारथी असे मोठमोठे अधिकारी महाराष्ट्रात वावरत असत. महारथी या शब्दावरून मराठी हा शब्द प्रचलित झाला असेही म्हटले जाते. पूर्वी या प्रांतातील प्रमुख भाषा ही महाराष्ट्री होती जिचे नंतर मराठी या भाषेत रूपांतर व नामकरणही झाले.
सातवाहन काळात भारताचा आफ्रिका, युरोप, रोम, ग्रीस, इजिप्त, अरब इत्यादी पश्चिमी राष्ट्रांशी व्यापार भरभराटीत होता. सातवाहन काळात पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रीक नावाचे अधिकारी सातवाहनांच्या अखत्यारीत अधिकार गाजवत होते तसेच कोकणावर महाभोज हे प्रांताधिकारी अधिकार गाजवत होते.
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिल्या गेलेल्या भारतकृत नाट्यशास्त्र या ग्रंथात महाराष्ट्राचा एक देश म्हणून उल्लेख येतो याशिवाय वायुपुराण, ब्रह्मपुराण व मार्कंडेय पुराणात सुद्धा महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख आहे.
कामसूत्राचा निर्माता वात्सायन लिहितो 'नर्मदा कर्नाटविषयार्मध्ये महाराष्ट्रविषय' यामध्ये विषय या शब्दाचा अर्थ प्रांत या अर्थी घ्यावयाचा आहे. याचसोबत तो कोकण विषयांचाही उल्लेख करतो याचा अर्थ कोकण हा पूर्वी महाराष्ट्रासारखाच दक्षिणापथाचा एक वेगळा देश होता.
इसवी सन ४५९ ते ४७४ च्या सुमारास महावंश हा ग्रंथ लिहिण्यात आला. या ग्रंथात अशोकाने काश्मीर, वनवासी आणि महाराष्ट्र देशात बौद्ध धर्म प्रचारक पाठवल्याचा उल्लेख आहे.
बृहत संहिता १० व्या अध्यायात वराहमिहिराने लिहिले आहे "भाग्ये रसविक्रयण: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र:"
चिनी प्रवासी ह्युएनस्तंग याने इसवी सनाच्या ६ व्या शतकात महाराष्ट्रास भेट दिली तेव्हा तो देशाचा विस्तार १ सहस्त्र मैल इतका असल्याचा उल्लेख करतो.
इसवी सन ७७७ साली कुवलयकथा हा ग्रंथ लिहिला गेला त्यामध्ये महाराष्ट्रीय लोकांचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.
महाराष्ट्रीय लोक ठेंगणे, मजबूत व सहनशील तसेच किंचित काळे आहेत. ते गर्विष्ठ व भांडखोर असून किंचित मोठ्याने बोलतात.
मुरारीच्या अणार्ध राधव या ग्रंथात तो म्हणतो की महाराष्ट्र देशातील कुंडीन नगर हे एक अतिशय सुंदर शहर आहे. दहाव्या शतकातील नाटककार राजशेखर विदर्भ व महाराष्ट्र एकच असून विदर्भ ज्ञानाचे माहेरघर आहे असे लिहितो.
अल्बेरुनी हा अरबस्थानातून फिरत फिरत भारतात आला तेव्हा त्याने म्हटले की
'धारेकडून दक्षिणेस जात असताना वाटेत मरहट्ट (महाराष्ट्र) देश, कोकण देश व त्याची राजधानी ठाणे लागते'
इसवी सनाच्या पाचव्या शतकातील रविकीर्ती या कवीचा एक शिलालेख कर्नाटकातील ऐहोले येथे आहे. त्यामध्ये त्याने तीन प्रकारचे महाराष्ट्र असल्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो
"ज्याने तिन्ही शक्ती विधियुक्त रित्या वाढवल्या आहेत आणि त्यामुळे तो इंद्रांतुल्य दिसत आहे त्याच्या उच्च घराण्यातील जन्मामुळे त्याने ९९ हजार खेड्यांचा समावेश असलेल्या तीन महाराष्ट्रकांचे अधिपत्य मिळवले."