अमृतराव पेशवे - एक उपेक्षित व्यक्तिमत्व

पेशवे घराण्यातील असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे अमृतराव पेशवे. अमृतराव हे रघुनाथराव उर्फ राघोबा पेशवे यांचे दत्तक पुत्र. १७६८ साली रघुनाथराव यांनी अमृतराव यांना भुस्कुटे घराण्यातून दत्तक घेतले.

अमृतराव पेशवे - एक उपेक्षित व्यक्तिमत्व
अमृतराव पेशवे

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ज्या घराण्याने पेशवेपदाची जबाबदारी पार पडली त्या श्रीवर्धनच्या भट अथवा पेशवे घराण्यातील अनेक व्यक्तींबद्दल आपण परिचित आहोत मात्र याच घराण्यातील काही व्यक्ती अशाही आहेत ज्यांच्याबद्दल आपल्यास फारशी माहिती नाही. 

पेशवे घराण्यातील असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे अमृतराव पेशवे. अमृतराव हे रघुनाथराव उर्फ राघोबा पेशवे यांचे दत्तक पुत्र. १७६८ साली रघुनाथराव यांनी अमृतराव यांना भुस्कुटे घराण्यातून दत्तक घेतले. त्यांच्या जन्मदात्या वडिलांचे नाव होते गोविंद नारायण भुस्कुटे व हे घराणे वसई प्रांतातील पापडी या गावाचे होते. या घराण्यास गाडगीळ या आडनावाने सुद्धा ओळखले जात असे. दत्तकविधानावेळी अमृतराव यांचे वय साडे तीन वर्षे होते.

अमृतराव यांना दत्तक घेण्यापूर्वी रघुनाथरावांना दोन पुत्र झाले होते मात्र ते दोनही लहानपणीच वारले. यानंतर रघुनाथराव यांना मुलगी झाली त्यामुळे रघुनाथरावांनी दत्तक घेण्याचा विचार केला आणि ११ एप्रिल १७६८ साली नाशिक येथे विधिपूर्वक दत्तकविधान करून दत्तकविधानावेळीच मुलाचे अमृतराव असे नामकरण केले. मात्र अमृतरावांना दत्तक घेतल्यावर राघोबा दादांना बाजीराव व चिमणाजी हे दोन औरस पुत्र झाल्यामुळे अमृतरावांचा पेशवाईच्या गादीवरील हक्क समाप्त झाला. 

लहानपणापासूनच रघुनाथराव अमृतराव यांना आपल्या सोबतच ठेवत त्यामुळे यांनी रघुनाथरावांचे राजकारण अनुभवलेच मात्र त्यांची कैद सुद्धा अनुभवली.

रघुनाथरावांविरोधात निर्माण झालेल्या बारभाईंच्या कारस्थानात त्यांना पुण्याहून परागंदा व्हावे लागले तेव्हा अमृतराव हे रघुनाथराव यांच्यासोबतच असत. या काळात त्यांचा मुक्काम इंग्रजांच्या आश्रयाखाली सुरत अथवा मुंबई येथे होत असे. या काळात अमृतरावांच्या नशिबी इंग्रजांकडे आश्रितासारखे राहणे अथवा कैदेत राहणे हेच प्रसंग दुर्दैवाने आले.१७८३ ते १७९२ पर्यंत त्यांना कोपरगाव, १७९२ ते १७९४ मध्ये आनंदवल्ली, १७९४ ते १७९६ मध्ये शिवनेरी व काही दिवस जांब असा मोठा काळ अमृतराव यांना कैदेतच काढावा लागला.

१७९६ साली त्यांचे सावत्र बंधू दुसरे बाजीराव यांना छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली तेव्हा अमृतराव यांनाही उंची पोशाख देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे १७९७ साली दुसऱ्या बाजीरावांनी नाना फडणीस यांना अटक करण्याचा कट केला व या कटात अमृतराव सुद्धा सहभागी होते. नाना फडणीस यांना कैद झाल्यावर दुसऱ्या बाजीरावांनी अमृतराव यांना आपले मुख्य कारभारी केले आणि आपल्या विश्वासातील दोन माणसे अमृतराव यांच्या मदतीस दिली.

रघुनाथरावांसोबत कैदेत असताना त्यांनी सुरत व मुंबई येथील ब्रिटिशांच्या कवायती फौजा जवळून पहिल्या होत्या त्यामुळे याच पद्धतीने पेशव्यांची सुद्धा कवायती फौज व्हावी म्हणून त्यांनी एम. आर. विल्यमटोन या ब्रिटिश अधिकाऱ्याची पेशव्यांची कवायती फौज तयार करण्याच्या कामी नियुक्ती केली.

अमृतराव हे राजकारण जाणणारे होते व तेवढेच धाडसीही होते मात्र बाजीराव त्यांच्या अगदी विरुद्ध होते. थोरले बंधू म्हणून बाजीराव त्याना मान देत असत मात्र स्वभावातील व निर्णयातील विरोधाभासांमुळे १७९८ सालापासून दोघांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली कारण अमृतराव कर्तृत्वाने आपल्याहून सरस असल्याने भविष्यात ते आपले प्रतिस्पर्धी होऊ शकतात अशी भीती बाजीरावांच्या मनात निर्माण झाली.

अमृतरावांच्या विरोधात असुरक्षितता निर्माण झाल्याने बाजीरावांनी दौलतराव यांच्यासोबत सख्य मांडले. याच काळात करवसुलीसाठी बाजीराव यांच्याकडून पुण्यातील जनतेवर प्रचंड अत्याचार करण्यात आले मात्र याची कल्पना अमृतरावांना आल्यावर ते खूप संतप्त झाले. पुढे बाजीराव यानी थेट दौलतराव यांना कैद करण्याचा सल्ला अमृतराव यांना दिला मात्र अमृतरावांना ही चाल माहित असल्याने त्यांनी दौलतरावांना या कटाची माहिती दिली.

यशवंतराव होळकर हे बाजीरावांनी आपल्या बंधूंच्या केलेल्या निर्घृण हत्येमुळे संतप्त होऊन पुण्यावर चाल करून आले तेव्हा दुसरे बाजीराव पुण्यातून पळून सिंहगडावर गेले. यशवंतरावांनी पुण्यात विजय मिळवल्यावर त्यांनी दुसऱ्या बाजीरावांना परत पुण्यास बोलावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र यशवंतरावांच्या भीतीने बाजीराव पुण्यास येण्यास तयार झाले नाहीत तेव्हा यशवंतराव यांनी अमृतराव यांना पुण्यास येऊन पेशवाईचा कारभार हाती घेण्याची विनंती केली. यशवंतरावांच्या विनंतीनुसार अमृतराव पुण्यास आले मात्र त्यांनी पेशवाईची वस्त्रे न स्वीकारता भांबुर्डा येथे तंबू ठोकून कारभार पाहू लागले.

मात्र ज्यावेळी बाजीराव महाड येथे पळून गेले त्यावेळी नाईलाजाने अमृतराव यांनी आपले पुत्र विनायकराव यांना पेशवेपदावर बसवण्याची तयारी केली मात्र १८०२ मध्ये बाजीरावांनी इंग्रजांशी मैत्री करून पुन्हा एकदा पेशवाई मिळवली त्यामुळे अमृतराव यांना नाशिक येथे जावे लागले. 

पेशवाई संपल्यावर अमृतराव हे काशी येथे जाऊन राहू लागले व जनरल वेलस्लीच्या पथकात सामील होऊन आठ लाखाचे वेतन प्राप्त करून तिथेच कायम निवास केला. काशीत असताना त्यांनी पुष्कळ दानधर्म करून अन्नछत्र, घाट आणि मंदिरे बांधली. काशी येथे असतानाच १८२४ साली अमृतराव यांचा मृत्यू झाला व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विनायकराव यांनी काशी येथील अमृतराव यांचा वारसा सांभाळला.

अमृतराव यांच्याबद्दल लॉर्ड वेलस्ली पुढील उल्लेख करतो

अमृतरावांबद्दल महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांना आदर वाटतोच याशिवाय राज्यकारभार करण्याची कलाही त्यांना अवगत आहे. ब्रिटिश सैन्य ज्यावेळी बाजीरावासहित पुण्यात आले त्यावेळी इतरांनी पुण्यातून लगेच पलायन केले असताना अगदी शेवटपर्यंत लढा देऊन अमृतराव यांनी पुणे सोडले ही गोष्ट निश्चितच भूषणावह आहे.