सिद्दी व मराठे संबंध

जंजिऱ्याचे सिद्दी हे सुरुवातीस निजामशहा, नंतर आदिलशहा आणि आता मोगलांचे मांडलिक होते आणि त्यांना इंग्रजांचीही मदत होती.

सिद्दी व मराठे संबंध
सिद्दी व मराठे संबंध

तसेच सिद्दीचा शिवाजी महाराजांच्या ताब्यातील गावांना नेहमी उपद्रव होत असे. १६७३ च्या ऑक्टोबरमध्ये सिद्दीने ब्रिटीश व मराठ्यांना एकाच वेळी त्रास देण्यासाठी करंजा, नागोठणे व पेण नद्यांच्या मुखाशी ठाणी बांधून सर्व महत्त्वाचे मार्ग बंद केले.

सिद्दीच्या या कृत्याविरोधात कारवाई करण्यासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल ३००० जणांचे सैन्य सिद्दीवर धाडले ज्यामध्ये सिद्दीची अनेक माणसे प्राणास मुकली व जखमी झाली. १० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि त्याने कुर्ला विभागातील  स्वराज्याची ठाणी उद्ध्वस्त केली आणि अनावश्यक रक्तपात करून माणसे, स्त्रिया व मुले गुलाम बनवून मुंबईस नेली. 

शिवाजी महाराजांना हे वृत्त कळल्यावर त्यांनी रायगडावरून शंभर सैनिक धाडले आणि त्यांनी सिद्दीच्या माणसांना चकित करून कापून काढले .

२३ ऑक्टोबरला मुंबईहून ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यालयाला सिद्दीच्या कारवायांबद्दल सांगण्यात आले. ज्या प्रामुख्याने ब्रिटिशांविरोधातल्याच होत्या. 

यासंदर्भात कंपनीस असे सांगण्यात आले की,

"मुंबईत शांतता असली तरी सिद्दीबद्दल आमची तक्रार आहे, सुरत किंवा बंगाल येथील व्यापाराला आमच्या कृत्याने धोका उत्पन्न होईल असे वाटले नसते तर सिद्दीला आम्ही पक्का पायबंद घातला असता. कारण मुंबईची प्रगती होऊ नये म्हणून सुरतच्या सुभेदाराने सिद्दीला चिथावले असावे. तरी सर्व बंदरावर तुमचाच हक्क आहे; हे लक्षात घेऊन काय ती आज्ञा आम्हाला द्या. लढाऊ गलबतांना बंदरात स्थान देऊन आपल्याच व्यापारास धोका उत्पन्न होतो. करंजा व साष्टी यांचे प्रभुत्व पोर्तुगीजांकडे आहे. तथापि या बंदरावर आपले काही हक्क ते सांगत असले तरी इंग्रजांच्या द्वेषाने नागोठण्याजवळ जो किल्ला सिद्दी बांधत आहे त्याला पोर्तुगीज विरोध करणार नाहीत. मराठे आमच्याशी सलोख्याने वागतात. आम्हीही त्यांच्याशी स्नेह ठेवला आहे. आमच्यात तह चांगला झाला असून शिवाजी महाराजांच्या मुलुखात व्यापार करण्याने आम्हाला किफायत होईल असा विश्वास आहे."

१५ डिसेंबर १६७३ रोजी मुंबईने इंग्लंडला एक पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की,

"जुन्नर, औरंगाबाद, रायबाग, हुबळी, विजापूर या ठिकाणी कंपनीचा व्यापार परत थाटण्याचा विचार सिद्धीस जाईल असे वाटते. पण सिद्दीने नागोठण्याच्या खाडीवर ठाणे बसवल्याने तेथून मजूर मिळणे अशक्य झाले असून पाण्याखालची जमीन भराव टाकून दुरुस्त करण्याचे काम अद्यापि यशस्वी झालेले नाही."

या प्रकरणानंतर शिवाजी महाराजांचा सिद्दीला मुंबई बंदरात आश्रय देण्याने ब्रिटिशांवर रोष उत्पन्न झाला. या संदर्भात त्यांनी १८ एप्रिल १६७३ रोजी इंग्रजांना एक खडखडीत निरोप पाठवला की,

"सिद्दीला बंदरात जागा दिल्यास मी तुमच्याशी युद्ध करुन बादशाही (सिद्दीचे) आरमार जाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करेन, आणि मुंबई बेट घेण्याकरिता डचांना 10000 सैन्याची कुमक करेन. याकरिता सिद्दीला अजिबात थारा देऊ नये."

सिद्दीचे आरमार मुंबईत राहिल्यामुळे शिवाजी महाराजांनी संतप्त होऊन आपल्या मुलुखातल्या नागोठणे इत्यादी भागांतून सरपण व धान्याच्या निर्यातीस बंदी केली. त्यामुळे इंग्रजांना पोर्तुगीज मुलुख तसेच भटकळ व इतर शहरांतून अन्न सामग्री आणणे भाग पडले. शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांविरोधात विरोधात युद्ध जाहीर केल्यावर ब्रिटिशांवर चांगलेच संकट आले. कल्याण, भिवंडी व नागोठणे या भागाचे सुभेदार दादाजी यांना शिवाजी महाराजांकडून युद्धाचे आदेश गेले. 

एकीकडे सिद्दी व दुसरीकडे शिवाजी महाराज अशा दुहेरी पेचात सापडल्याने ब्रिटिशांची चांगलीच गोची झाली. ब्रिटिशांची मराठ्यांबरोबर तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्येही सुरुच होती. शिवाजी महाराजांच्या कोकणातल्या प्रदेशामध्ये व्यापार वाढवणे, राजापूर वखारीचे नुकसान भरुन काढणे व नव्या सवलती मिळवणे असा ब्रिटिशांचा उद्देश होता तसेच शिवाजी महाराजांनी पूर्वी झालेल्या तहावर शिक्कामोर्तब केले नव्हते त्यामुळे तो तह कायम झाला नव्हता. त्यामुळे हा तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास रायगडावर पाठवावे व त्याचे मुखत्यार वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन याला रायगडावर पाठवण्याचे ठरले. 

१६७७ च्या नोव्हेंबर महिन्यात सिद्दी कासिम परत एकदा नागोठणे आणि पेणच्या खाडीत उतरला आणि त्याने रहिवाशांना पकडून भंगीकाम आणि अंगमेहनतीचे काम करायला लावले. १६७८ मध्ये तो विश्रांतीसाठी मुंबईस परत आला. तेव्हा महाराजांनी आपल्या प्रजेवर होत असलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आरमार प्रमुख दौलत खान याला ४००० सैन्याच्या तुकडीसह पनवेलला पाठवले. परंतु प्रतिकुल हवामानामुळे दौलत खान खाडी ओलांडू शकला नाही.  

सन १६७९ मध्ये मराठ्यांनी ब्रिटिशांची मुंबईच्या आसपासच्या बंदरात लाकूड, सरपण व भात इत्यादी सामान आणण्यासाठी गेलेली १५ गलबते पकडून नागोठण्याच्या बंदरामध्ये ठेवून दिली. त्यामुळे ब्रिटिशांचे २० हजारांचे नुकसान झाले. ते नुकसान भरुन काढण्यासाठी पुढल्या वर्षाच्या उन्हाळ्यात नागोठणे खाडीत छोट्या होड्यांवरुन सैन्य पाठवून गलबते हस्तगत करण्याचा कट ब्रिाटिशांनी रचला. मात्र १६७८ च्या नोव्हेंबर महिन्यात निकल्स याने नागोठण्यात जप्त केलेल्या पंधरा गलबतांपैकी चार गलबते वगळता उरलेली गलबते पळवून नेली.  

या संदर्भात मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने चौल प्रांताचे सुभेदार बहिरोपंत यांना विचारणा केली. तेव्हा बहिरोपंत यांनी असे कळविले की,

तुमच्या बेटावरील व्यापाऱ्यांच्या गलबतांबाबत तुम्ही विचारणा केली, नेहमीप्रमाणे सरपणाकरिता तुमची गलबते आमच्या परिसरात येतात तशीच ती आली व आमच्या अधिकाऱ्यांनी ती पकडली व मला सांगितले. त्याबद्दल आम्हाला असे सांगायचे आहे की इंग्रज व मराठे यांचा सलोखा चालतो; या सबबीखाली आमच्याकडून जाणारे सरपण, धान्य इत्यादी मालाचा फायदा आमचा शत्रू सिद्दी याला राजरोसपणे मिळतो हे चमत्कारिक वाटते. हा सिद्दी आमच्या मुलुखात हल्ले करुन आमच्या जनतेला पकडून नेऊन आम्हाला फार त्रास देतो. त्याच्याशी युद्ध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मला या भागाचा सुभेदार म्हणून नेमले आहे. दौलतखानाच्या आरमाराशी सहाय्य करण्याकरिता ५००० सैन्य तुमच्या बेटावर (मुंबई) पाठविण्याचा माझा विचार होता. आणि सिद्दीला तुम्ही ज्याप्रमाणे सारखा आश्रय देता त्याप्रमाणे दौलतखानासही तुमच्या बेटावर आश्रय मिळण्यास काहीच हरकत नव्हती. पोर्तुगीजांनीदेखील सिद्दीला इंग्रजांसारखी सामुग्री व रसद पुरवून किंवा त्याचे रक्षण करुन मदत केली नाही हे मला तुमच्या लक्षात आणून देणे भाग आहे. सिद्दीला तुमच्याकडे आश्रय मिळाल्याने त्याला आमच्या मुलुखात म्हणजे नागोठणे व पेण परिसरात शिरुन त्रास देणे सुलभ जाते. तरी तुम्ही त्याला आश्रय देता कामा नये, याबद्दल तुमच्याकडून जे उत्तर येईल ते शिवाजी महाराज व अण्णोजीपंत यांच्याकडे पाठवून देईन. त्याप्रमाणे ते सिद्दीला तुमच्या बेटातून काढून लावण्याबाबत काय तो विचार करतील.

१६७८ च्या ऑक्टोबरमध्ये महाराजांनी परत एकदा जंजिऱ्यावर तोफा डागल्या. शिवाजी महाराजांना हे कळून चुकले की, सिद्दी मराठ्यांच्या नागोठणे, पेण, पनवेल इत्यादी मुलुखांमध्ये मुंबईमार्गे हल्ला करतो याचे कारण त्याला इंग्रजांनी मुंबई बंदरात दिलेला थारा होय. त्यामुळे त्यांनी इंग्रजांना परत एकदा तंबी दिली आणि सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी नागोठणे खाडीच्या समोर असलेले खांदेरी हे बेट काबीज केले. खांदेरी बेट १६७९ मध्ये काबीज केल्यानंतर मायनाक भंडारी व दर्यासारंग यांनी माती व दगड यांची मजबूत भिंत बेटाभोवती बांधण्यास सुरुवात केली पण सिद्दीला हे खपले नाही.  

त्याने आपले आरमार खांदेरी येथे नेऊन खांदेरीवर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरु केला. तेव्हा मराठ्यांचे आरमार नागोठणे बंदरात आश्रयास गेले. मराठ्यांचे खांदेरीवरील वर्चस्व हे इंग्रजांनासुद्धा धोकादायक होते. कारण हे बेट मुंबईच्या समोर असल्याने मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी मराठ्यांना सोयीचे होते. म्हणून परत एकदा खांदेरी ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी खांदेरीवर काही जहाजे घेऊन हल्ला केला. या मोहिमेचे नेतृत्व केगविन आणि गेप नामक कप्तानांकडे होते आणि डोवर आणि रिव्हेंज ही इंग्रजांची जहाजे तैनात केली गेली होती. या जहाजांनी खांदेरीवर मुंबईच्या दिशेने हल्ला केला. तेव्हा शिवाजी महाराजांच्या सैन्याची कुमक चौलवरून खांदेरीवर धाडली गेली. यामध्ये डोवर हे जहाज मराठ्यांच्या हाती लागून कॅ. गेप ठार झाला मात्र रिव्हेंज या जहाजाने मराठ्यांच्या गुराबांचा नागोठण्यापर्यंत पाठलाग केला.  

दोनच दिवसांनी मराठा आरमाराने नागोठणे खाडीतून परत इंग्रजांवर हल्ला केला. स्वत: केगविनने तक्रार केली होती की, मराठ्यांची गलबते चलाख असल्याने आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरतात. यानंतर सिद्दीचे आरमार इंग्रजांना येऊन मिळाले आणि खांदेरीवर दोघांच्या सैन्याने मिळून तोफा डागल्या पण मराठ्यांच्या सैन्याने दोघांच्याही आरमारांचा अक्षरश: धुव्वा उडवला. मात्र जरी सिद्दींबरोबर एकत्रित लढून आपण खांदेरी जिंकून घेतला तरी सिद्दी आपणास तो न देता स्वत:च्याच ताब्यात ठेवणार आहे हा सिद्दीचा डाव लक्षात आल्यावर इंग्रजांनी खांदेरीचा नाद सोडून दिला.

पुढे शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामध्ये तह झाल्याचे आढळून येते. महाराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण हाताळत होता. त्याच्यासोबत अण्णाजी दत्तो यांनासुद्धा धाडण्यात आले होते. इंग्रजांकडून राम शेणवी मध्यस्थी करत होता. या तहातली कलमे महाराजांनीच तयार केली व इंग्रजांना ती मान्य करावी लागली.

मराठ्यांनी खांदेरी काबीज केल्याने सिद्दीने उंदेरी ताब्यात घेऊन किल्ला बांधायला सुरुवात केली. कालांतराने सिद्दीच्या उंदेरीतल्या तोफांनी थळच्या मराठ्यांच्या तोफांना उत्तर द्यायला सुरुवात केली. तेव्हा शिवाजी महाराजांनी आरमारप्रमुख दौलतखान यास नागोठण्याहून उंदेरीवर हल्ला करण्यास आरमारासहित कुच करायला सांगितले होते.