तानाजी मालुसरे यांची यशवंती घोरपड
इतिहासातील एक उपेक्षित पात्र म्हणजे तानाजी मालुसरे यांची यशवंत घोरपड. यशवंतीस काल्पनिक पात्र म्हणून घोषित करताना शिवकालीन प्रसिद्ध शाहीर तुळशीदास यांचा पोवाडा व त्यातील उल्लेख दुर्लक्षित केला जातो.
इतिहास एक चमत्कारिक विषय आहे. शेकडो वर्षांचा इतिहास काही पानांच्या पुस्तकात वाचता नक्कीच येतो मात्र तो वाचण्यापेक्षा अनुभवणे जास्त महत्वाचे. इतिहासात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यांची अस्सल साधने नोंद घेऊ शकले नाहीत व तत्कालीन परिस्थितीचा विचार न करता इतिहास हा वर्तमानातील नजरेतून जास्त पहिला जात असल्याने इतिहासात वेळोवेळी बदल झालेले दिसून येतात.
इतिहासातील एक उपेक्षित पात्र म्हणजे तानाजी मालुसरे यांची यशवंत घोरपड. सिंहगड मोगलांकडून घेताना तानाजी मालुसरे यांनी मावळ्यांसोबत जीवाची बाजी लावली व सिंहगडावर मराठ्यांचा जरीपटका फडकावला. या मावळ्यांसोबत जिचे मूक योगदान तानाजी मालुसरे व पर्यायाने शिवरायांच्या स्वराज्यास लाभले ती यशवंती घोरपड मात्र कायम उपेक्षित राहिली.
यशवंती घोरपडीस अशी उपेक्षा प्राप्त का झाली याचा विचार केला तर ही कारणे दिलेली दिसून येतात की एकतर समकालीन पत्रांत अथवा बखरीत यशवंतीचा उल्लेख मिळत नाही आणि घोरपडीच्या साहाय्याने कडा चढून जाणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. या दोन कारणांमुळे यशवंती घोरपड हे इतिहासातील काल्पनिक पात्र होऊन बसले.
मात्र यशवंतीस काल्पनिक पात्र म्हणून घोषित करताना शिवकालीन प्रसिद्ध शाहीर तुळशीदास यांचा पोवाडा व त्यातील उल्लेख दुर्लक्षित केला जातो. तुळशीदास हे मूळचे पुण्याचे व तेथील प्रसिद्ध अशा मंडईत ते राहत असत. तानाजी मालुसरे यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र रायबा राजगडावर आले त्यावेळी पंतोजी यांनी तेथून एकास पुणे येथे तुळशीदासास राजगडावर घेऊन येण्यासाठी पाठवले.
महाराजांचे बोलावणे आल्यावर तो त्वरित आपले डफ व तुणतुणे घेऊन राजगड किल्ल्याच्या सदरेवर हजर झाला. तिथे जाऊन तानाजी मालुसरे यांचा पोवाडा सर्व माहिती घेऊन कटिबद्ध केला. पोवाडा ऐकून महाराजांनी हजार रुपयाचा सोन्याचा तोडा तुळशीदासास बक्षीस दिला.
हा उल्लेख स्वतः तुळशीदास शाहीर करतो यावरून हे समजून येते की तानाजी मालुसरेंचा पोवाडा हा समकालीन असून शिवाजी महाराजांसमोर गायला गेला होता. पोवाडा लिहिताना तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा सुद्धा गडावर हजर होते त्यामुळे तो पोवाडा हा पूर्ण माहितीवर आधारित होता.
तुळशीदास आपल्या पोवाड्यात यशवंत घोरपडीचा पुढीलप्रमाणे उल्लेख करतो.
तानाजी आपल्या सैन्यासहित सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले व त्यांनी आपला पेटारा उघडून आपली पाळीव यशवंत घोरपड बाहेर काढली. यशवंत म्हणजे मोहिमेत कायम यश देणारी. सोबत असलेला सात शेर शेंदूर तिच्या मस्तकी फासला व मोत्यांनी गुंफलेला भांग हा दागिना भरला. यानंतर साखळी आपल्या कमरेस बांधली. आणि यशवंत घोरपडीस किल्ल्यास लावली. यशवंत घोरपड मग किल्ला चढू लागली मात्र अचानक अर्धा किल्ला चढून ती माघारी फिरली. ते पाहून तानाजी म्हणाले इतक्या मोहिमांमध्ये ही माझ्या सोबत होती पण कधी माघारी फिरली नव्हती. आज तिला काय झाले? त्यांना समजून चुकले मात्र ते त्वेषाने म्हणाले..मी मराठ्याचा पोर आहे, मरणास नाही भिणार, मागे फिरलीस तर एक हात टाकून तुझी खांडोळी पाडीन. हे पाहून यशवंत घोरपड परत वर जाण्यास निघाली आणि कड्यात आपली नखे रोवून बसली. यानंतर सुभेदार तानाजी मालुसरे कडा चढून वर गेले.
तर हा झाला यशवंत घोरपडीचा समकालीन अशा तुलसीदासांच्या पोवाड्यातील उल्लेख, हे पाहता समकालीन साधनांत तिचा एक तरी उल्लेख येतो हे मान्य करायला हवे आता घोरपडीचा वापर करून चढणे अशक्यप्राय आहे असा दुसरा आक्षेप आहे त्यावर विचार करू.
तर यासाठी आपण थोडे मागील काळात जाऊ. घोरपडे हे शिवकालीन प्रसिद्ध घराणे. मुळात ते शिवाजी महाराजांच्याच वंशातील होते मात्र घोरपडे हे आडनाव त्यांना मिळाले ते सुद्धा एका घोरपडीवरूनच. आपल्या कैफियतीमध्ये ते लिहितात की..
घोरपडे हे उपनाव पाडण्याचे कारण की, पूर्वी आमचे उपनाम सिसोदे भोसले होते. नंतर औरंगजेब बादशहाचे समक्ष हापशी लोकांच्या राज्यात स्वारी करून किल्ल्यावर हल्ला केला. हल्ला करताना किल्ल्याच्या नांगीत घोरपड म्हणून जंगली जनावर राहते ते बसले होते. त्यास धरून पूर्वजाने किल्ला चढला आणि हस्तगत केला. त्या दिवसापासून घोरपडे हे उपनाव व निशाण बंडी म्हणजे काळी पांढरी मिश्रित वागवणेस बादशहाचा हुकूम होऊन त्याप्रमाणे आजपावेतो वहिवाट चालली आहे.
आता या संदर्भावरून हे सुद्धा स्पष्ट होते की घोरपड या प्राण्याची पकड एवढी मजबूत आहे की तिने एकदा नखे रोवली की किमान एक माणूस तरी तिला धरून वर चढू शकतो.
तानाजी मालुसरे हे मूळचे कोकणातील उमरठ गावाचे. आजही कोकणात अजस्त्र घोरपडी पाहावयास मिळतात. पूर्वी कदाचित त्यांना पाळले जात असावे व त्यांच्या अंगीभूत गुणधर्मानुसार कडे चढण्याच्या कामी त्यांचा वापर केला जात असावा असा निष्कर्ष काढता येऊ शकतो आणि वर दिलेली दोन उदाहरणे तर हे स्पष्ट करतात की घोरपडीचा वापर युद्ध मोहिमांमध्ये केला जात होता.
तुळशीदासाच्या पोवाड्यानुसार यशवंती घोरपड ही तानाजी मालुसरे यांची लाडकी घोरपड होती जी आपल्या धन्याच्या जीवाचे बरेवाईट होऊ नये या चिंतेने अर्धा कडा चढून मागे फिरली. ती जर खरोखर असेल तर तिचे इतिहासातील योगदान नाकारणे तिच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.