सुरतेच्या स्वारीत शिवाजी महाराजांवर झालेला जीवघेणा हल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वाऱ्या विख्यात आहेत. सुरत म्हणजे मुघलांच्या राज्यातील एक अतिशय संपन्न असे व्यापारी शहर होते.

सुरतेच्या स्वारीत शिवाजी महाराजांवर झालेला जीवघेणा हल्ला

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

अनेक भलेमोठे आर्थिक तसेच पेढीचे व्यवहार सुरत शहरातून चालत असत. सुरत हे एक बंदरही असल्याने या शहरात इंग्रज, डच आणि फ्रेंच इत्यादी युरोपीय सत्तांच्या वखारी सुद्धा होत्या.

या सर्व वखारींना मुघलांचा आश्रय होता. मोहिमे अगोदर एक वर्षांपूर्वी मुघल सरदार शाईस्तेखानाने स्वराज्याचा मुलुख बळकावला होता त्याची लालमहालात बोटे छाटून महाराजांनी मुघलांना धडा शिकवला होता मात्र त्या अगोदर काही वर्षांत स्वराज्याचे शत्रूराष्ट्राच्या आक्रमणामुळे विपुल नुकसान झाले होते व ही तूट भरून काढणे गरजेचे होते. 

स्वराज्यातील जनता ही महाराजांना अतिशय प्रिय असल्याने स्वराज्याचे झालेले नुकसान त्यांच्याकडून कधीही भरून न काढण्याचा आदर्श शिवाजी महाराजांनी निर्माण केला तो आजच्या राज्यकर्त्यांनी शिकण्यासारखं आहे.

याउलट आधी झालेल्या नुकसानीमुळे स्वराज्यातील जनतेला हाल सोसावे लागू नयेत म्हणून त्यांनी शत्रूराष्ट्रावर मोहीम काढून तेथून स्वराज्याचे नुकसान भरून काढण्याची योजना बनवली. यासाठी त्यांच्या नजरेसमोर उभे होते बलाढ्य मुघल साम्राज्यातील अतिसंपन्न असे सुरत शहर.

मोहिमेसाठी सुरतेचा विचार करण्यामागे महत्वाचे कारण होते कि स्वराज्याचे जेवढे नुकसान झाले त्यास मुघल साम्राज्यच जबाबदार होते त्यामुळे जशास तसे या तत्वाचा वापर करून मोगली मुलुखावर हल्ला करून ही तूट भरून काढणे अत्यंत गरजेचे व स्वीकारार्ह होते.

यापूर्वी शाईस्तेखान पराभूत होऊन दिल्लीस परतला असताना मोगल सरदार जसवंतसिंग याने सिंहगडास वेढा घातला यामागे त्याचा महाराजांना त्रास देण्याचा हेतू होता मात्र महाराजांनी या वेढ्यास फारसे महत्व न देता आपले लक्ष सुरतेकडे वळवले आणि अचानक सुरतेवर हल्ला केला.

हा हल्ला सर्वांसाठी अनपेक्षित असल्याने मोगल सैन्यात गोंधळ माजला. मोगलांच्या प्रांतात शिरून कोणी हल्ला करेल अशी अपेक्षा मुघलांचीच काय तर त्यांच्या आश्रयाखाली सुरतमध्ये असलेली इंग्रज, डच आणि फ्रेंच लोकांचीही नव्हती. 

१६६४ च्या जानेवारी महिन्यात महाराजांनी आपल्या सैन्यासह सुरतेवर स्वारी केली व तब्बल ४ दिवस त्यांनी सुरतेची लूट करून स्वराज्याची झालेली हानी भरून काढली.

महाराज सुरतेपासून १२ मैल दूर असताना ब्रिटिश प्रेसिडेंटला बातमी लागली यानंतर त्याच्या मागणीनुसार १० हत्यारबंद शिपाई वखारीच्या रक्षणास ब्रिटिशांकडून पाठविण्यात आले. पुढे १० माणसे ठेऊन बाकीची सर्व माणसे पाठवा अशी मागणी त्याने केली मात्र ब्रिटिशांकडून फक्त ४२ माणसे धाडण्यात आली. 

शिवाजी महाराज सुरतेत आल्याचे कळतात सुरत शहराचा मोगल सुभेदार भीतीने सुरतेतील लोकांना वाऱ्यावर सोडून पळून गेला आणि एकच गोंधळ उडाला. इंग्रज अधिकाऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अटक करून दंड घेऊन त्याची सुटका करण्यात आली.

या मोहिमेत डच वखारीचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले तर ब्रिटिशांचे १००० पौंड नुकसान झाले. मुघलांचे मात्र अतोनात नुकसान झाले.

जानेवारीच्या १० तारखेला शिवाजी महाराज मोहीम आटपून स्वराज्यात परतले मात्र त्याआधी सुरत शहरात त्यांच्यावर एक जीवघेणा हल्ला झाला याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.

इंग्रज अधिकारी अँटनी स्मिथ याला कैद करून ठेवल्यावर प्रतिकार केल्याबद्दल त्याला देहांत शासन झाले असते मात्र याच काळात मुघलांच्या एका सरदाराने शिवाजी महाराजांवर थेट शस्त्र उचलून हल्ला केला मात्र महाराजांनी वरच्यावर त्याच्या हाताचे तुकडे केले मात्र हा हल्ला अत्यंत वेगवान असल्याने तो मोगल आपल्या तुटलेल्या हातासह शिवाजी महाराजांच्या अंगावर जाऊन कोसळला.

त्याच्या भारामुळे शिवाजी महाराजही जमिनीवर कोसळले. शिवाजी महाराजांच्या शरीरावर कोसळलेल्या मोगल सैनिकाचे रक्ताने शिवाजी महाराजांचे कपडे भरून गेल्याने मावळ्यांना महाराजांना घाव बसला की काय अशी शंका वाटली व संतापाच्या भरात मावळ्यांनी मोगल सैन्याची कापाकापी सुरु केली मात्र थोड्याच वेळात त्या जखमी मोगल सैनिकास बाजूला करून महाराज उठून बसले तेव्हा सैन्यास हायसे वाटले. यानंतर त्या मोगल सैनिकाचा शिरच्छेद करण्यात आला.

यानंतर महाराज १० जानेवारीस १५ लाखांची लूट घेऊन महाराज आपल्या सैन्यासह स्वराज्याकडे रवाना झाले.

१७ जानेवारीला औरंगजेबाचे बादशाही सैन्य सुरतमध्ये आले मात्र तोपर्यंत मोगलांची सुरत बदसुरत झाली होती. सुरतेतल्या लोकांनी पळून गेलेल्या मोगल सरदाराची हेटाळणी केली मात्र प्रतिकार करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे कौतुक केले आणि हे कौतुक पाहून संताप अनावर झालेल्या मोगल सुभेदाराच्या मुलाने सुरतेतील एका व्यापाऱ्याचा जीव घेतला.