वीर बाजी पासलकर - एक महायोद्धा

शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रितीतल्या बालमित्रांपैकी बाजी पासलकर एक होते. ते आठगावचे देशमुख असून रायगडाखाली छत्री निजामपूरजवळ कुर्डू या नावाचे खेड्यात राहत असत आणि खिंडीचे नाके सांभाळीत.

वीर बाजी पासलकर - एक महायोद्धा
वीर बाजी पासलकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या व एकनिष्ठ सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे बाजी पासलकर. शेडगावकर बखरीत बाजी पासलकर हे मावळे लोकांचे सरदार असल्याचा उल्लेख असून त्यांच्या स्वरूपाची माहिती पुढीलप्रमाणे दिली गेली आहे.

"बाजी पासलकर झणजे मोठा युधी, शूर मर्दाना, ज्याच्या मिशा दंडा एवढया, मिशास पीळ घालोन केसाचे अग्रावर दोहीकडे दोन निबे ठेवावी व मनगटा येवढे नाक, असे त्याचे स्वरूप विक्राळ. त्यास राजे याणी योजून पाठविला."

सभासद बखरीत बाजी पासलकरांचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.

"बाजी पासलकर महायोध्दा, त्याच्या मिशा दंडायेवढया, यांस पीळ घालून वरि केशांच्या आधारे निबें दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला"

चित्रगुप्त बखरीत पुढील प्रमाणे वर्णन आहे

"पासलकर मोठा योद्धा, ज्याच्या मिशांवर मोठी लिंबे ठेवावी एवढ्या मोठ्या."

चिटणीस बखरीत सुद्धा

"बाजीराव पासलकर देशमूख मोसेखोरेकर यांस हषमलोक जमाव देऊन महाराजांनी पाठविले." असा उल्लेख आहे.

बखरींमधील उल्लेखावरून बाजी पासलकर यांचे स्वरूप व पद याबद्दल माहिती मिळतेच मात्र १६४२ साली बाजी पासलकर यांना मोगलांनी मोसे बुद्रुक येथे अटकेत ठेवले असल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी बाजी पासलकर मोसे बुद्रुक व तव या ठिकाणी सात भावांसहित राहत होते. यावेळी फितुरीमुळे बाजी मोगलांच्या हाती सापडले व त्यांच्या हाता पायांत बेड्या लावून त्यांना एका वाड्यात अटकेत ठेवण्यात आले होते. 

एके दिवशी पहाटेच्या समयी बाजींची कुलदेवता श्री वाघजाई देवी हिने बाजींना दृष्टांत दिला व म्हणाली 'बाजी उठ! हात पाय झटक' हे एकून बाजींनी हात पाय झटकले असता एका हातातील व एका पायातील बेडी अकस्मात तुटून पडली. यानंतर बाजी देवीसोबत पश्चिम दिशेस निघाले, पुढे मौजे पाथरशेत येथे देवी आशीर्वाद देऊन गुप्त झाली.

यानंतर घोडदांडा मार्गे बाजी बांबीच्या पाण्यावर गेले या ठिकाणी तोरण माची आहे तिथे यमाजी हळदे यांचा वाडा होता. तेथे यामाजींची सून होती. बाजींचे दाढी मिशा असलेले विक्राळ रूप पाहून ती घाबरली. तेव्हा बाजी तिला म्हणाले की घाबरू नकोस, यामाजीस बोलावं. यमाजी आल्यावर त्यांनी बाजींच्या उरलेल्या दोन बेड्या तोडल्या. यानंतर बाजी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन धामणहोळ मार्गे कोकणातील कुर्डुगडास गेले व तेथेच त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. 

या घटनेत बाजी पासलकरांच्या स्वरूपाचे जे वर्णन आहे ते बखरींतील उल्लेखाशी जुळते आणि बाजी पासलकर यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यातील कुर्डूगड येथे होते हा उल्लेख बाजी पासलकर यांच्या पोवाड्यातही पुढीलप्रमाणे आहे. हा पोवाडा ज्या ग्रंथात प्रकाशित झाला आहे त्यामध्ये बाजी पासलकर यांच्याविषयी पुढील माहिती मिळते.

शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रितीतल्या बालमित्रांपैकी बाजी पासलकर एक होते. ते आठगावचे देशमुख असून रायगडाखाली छत्री निजामपूरजवळ कुर्डू या नावाचे खेड्यात राहत असत आणि खिंडीचे नाके सांभाळीत. तानाजी मालुसऱ्यांप्रमाणे बाजी पासलकर शिवरायांना अनेक युद्धप्रसंगी उपयोगी पडले होते आणि त्यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पायदळाचे सरनोबत नेमिले होते. वाडीच्या सावंतांसोबत शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया झाल्या त्यात महाराजांच्या सैन्याचे मुख्य बाजी पासलकर हे होते व यांच्यामुळे सर्वच युद्धांत महाराजांची सरशी होई. त्यांची एक घोडी होती व ती घेण्यासाठी विजापूरकरांनी खूप खटपटी केल्या होत्या.

बाजी पासलकर यांच्या पोवाड्यात पुढीलप्रमाणे माहिती आहे.

कुर्डूच्या मैदानी नांदे बाजी पासलकर, आठगावचा देसाई त्या बाजीचा धाक थोर।।
दंडा एवढी मिशी बाजी पाच्छाई मजहर।।

पोवाड्यात उल्लेख असल्याप्रमाणे बाजी पासलकर यांच्याकडे यशवंता घोडी, गजली नावाची फिरंग (धोप) आणि अजगर नावाची ढाल या तीन अप्रतिम गोष्टी होत्या.

रायगड जिल्ह्याच्या रोहे तालुक्यात अवचितगड नावाचा किल्ला आहे तिथे एक मूर्ती आहे व शिलालेख आहे. ही मूर्ती अवचितगडाचे किल्लेदार बाजी पासलकर यांची आहे असे मानले जाते. अवचितगडावरील शिलालेखात 'बापूजी पासलकर हवालदार' असा उल्लेख आहे. शिवकाळात किल्लेदार ऐवजी हवालदार हा शब्द वापरला जात असे. मराठी रियासतीत बाजींचे मूळ नाव बापूजी असल्याचा उल्लेख आहे. पासलकर वंशातील बाबुराव पाशिलकर यांचा उल्लेखही अवचितगडा संबंधात सापडतो. पासलकर घराण्याचे वंशज अवचितगडाच्या आसमंतात सध्या पाशिलकर या आडनावाने आजही ओळखले जातात.

बाबुराव पासलकर यांचा उल्लेख पुढीलप्रमाणे,

बाबुराव पासलकर, तालुके अवचितगड, याणीं सरसुभाकडील लोक घेऊन किल्यास वेढे देऊन, रसद बंद केली. ते किल्ले बी तपशील.

शिवरायांचे एकनिष्ठ सहकारी असलेल्या बाजी पासलकर व पासलकर घराण्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे, इतिहासात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या या घराण्याविषयी आणखी माहिती उजेडात आणणे हे त्यांच्या स्वराज्यकार्यास न्याय दिल्यासारखे होईल.