ज्याचे आरमार त्याचा समुद्र

शिवछत्रपतींचे राजकारण, कामाचा वेग, प्रतिस्पर्ध्याच्या क्षमता ओळखून केलेला विस्तार, डावपेच, शह, प्रतिशह, तह, करार, मदत, रक्षण आदी गोष्टी अक्षरशः वारंवार अभ्यासण्याजोग्या आहेत.

ज्याचे आरमार त्याचा समुद्र
ज्याचे आरमार त्याचा समुद्र

प्रत्येक घडामोडीतून नवनवीन शिकता येते. आपल्याला वाटत असलेल्या गंभीर समस्या शिवछत्रपतींच्या अभ्यासाने शुल्लक वाटू लागतात. याच अभ्यासाने क्षणभरात कोणत्याही समस्यांवर ठोस उपाययोजना करता येतात.

सन १६५८ रोजी कल्याणच्या खाडीत शिवाजी माहाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची पताका रोवली.

१. कल्याण, भिवंडी व पेण येथील खाडीत शिवाजी राजे यांनी वीस युध्दनौका बांधल्या आहेत.

संदर्भ - दिनांक १९ जुलै सन १६५९ रोजी गोवा किल्यातील सभेत वसईचा पोर्तुगीज कॅप्टन याच्या पत्रावर गोव्याच्या व्हाईसराॅयच्या सल्लागार सभेच्या कामकाजातील महत्वपूर्ण विषय.

२. शिवाजी राजे यांनी पन्नास युध्दनौका बांधायले घेतल्या आहेत.

संदर्भ - दिनांक २३ ऑगस्ट सन १६६४ रोजी गोवा किल्यातील सभेत चौलचा पोर्तुगीज कॅप्टन याच्या पत्रावर गोव्याच्या व्हाईसराॅयच्या सल्लागार सभेच्या कामकाजातील महत्वपूर्ण विषय.

एकुणच शिवाजी राजांच्या आरमार उभारणीचा वेग पहाता सन १६६५ पर्यंत निश्चितपणे स्वराज्याच्या आरमारात ७० युध्दनौका तयार असल्या पाहिजेत. उथळ पाण्यात तरंगणारी तारवे, बाज व होड्या यांची संख्या अतिरिक्त. अर्थात स्वराज्याच्या आरमाराने अवघ्या सात वर्षात बर्‍यापैकी बाळसे धरले होते.

पश्चिम किनारपट्टीवरील नवी बलाढ्य शक्ती म्हणून स्वराज्याच्या आरमाराची ओळख निर्माण होत होती. इतर जलचरांच्या आरमाराला जमीनीची जोड कमी होती. त्यामुळे त्यांची ताकद मर्यादित ठरत होती. हे लक्षात घेऊन स्वराज्याच्या

आरमाराला माहाराजांनी जलदुर्ग, भुईकोट, किनारपट्टीवरील किल्ले यांचे कवच घातले. केवढी ती दूरदृष्टी!!! माहाराजांच्या या दूरदृष्टीला त्रिवार मुजरा..

या सर्व गोष्टींचा परिणाम कसा होत गेला ते पहा..

शिवाजी माहाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी दिनांक ५ जून सन १६७२ रोजी "जव्हार" घेतले. पुढील काळात "गुजरातेतील बलसाड" पर्यंतचा व्यापार माहाराजांच्या ताब्यात आला. येथपर्यंत पोर्तुगीज चौथाई हा कर स्थानिक कोळी राजांना देत होते. सदर प्रदेश शिवाजी माहाराजांच्या ताब्यात आल्यानंतर माहाराजांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली. या बाबत दमण शहराचा पोर्तुगीज कॅप्टन मानुएल फुर्ताद याने गोव्याचा पोर्तुगीज व्हाईसराॅय यास पत्रातून कळविले होते.

दिनांक २८ मे सन १६७७ रोजी गोव्याच्या व्हाईसराॅयच्या सल्लागार सभेच्या कामकाजातील महत्वपूर्ण विषय हाच होता.

संदर्भ - पोर्तुगीज कागदपत्रे { शिवशाही काळ }

- श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.