बाळाजी आवजी - स्वराज्याचे चिटणीस

बाळाजी वयाने सज्ञान झाले त्याकाळात जंजिऱ्याचे सिद्दी यांची आवजी यांच्यावर काही कारणाने इतराजी झाली आणि सिद्दींनी आवजी व त्यांचे मोठे भाऊ खंडोबा यांना समुद्रात बुडवून ठार मारले आणि आवजी यांची पत्नी व तिघे पुत्र यांना अटक करून अरब देशातील मस्कत येथे गुलाम म्हणून विकण्यासाठी पाठवले.

बाळाजी आवजी - स्वराज्याचे चिटणीस
बाळाजी आवजी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील चिटणीस म्हणून ज्यांनी मोठा लौकिक संपादन केला ते म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस. बाळाजी आवाजी यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. 

बाळाजी आवजी यांचे पूर्ण नाव बाळाजी आवजी चित्रे असे असून त्यांचे मूळ गाव सध्याच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हे होते. बाळाजी आवजी यांच्या वडिलांचे नाव आवजी हरी चित्रे व मातेचे नाव रखमाबाई असून त्या राजापूरच्या तुंगारे घराण्यातील होत्या. बाळाजी आवजींना दोन लहान भाऊ होते त्यांची नावे चिमणाजी व शामजी अशी होती. त्याकाळी हा भाग जंजिराच्या सिद्दी शासकांच्या अधीन होता व बाळाजी यांचे वडील हे सिद्दीच्या राज्यात दिवाण व मुजुमदार होते. मोठे पद असल्याने अर्थात घराण्यात आर्थिक सुबत्ताही उत्तम होती. मुरुड येथे घराण्याचे चिरेबंदी जोत्याचे घर व घरासमोर मोठी विहीरही होती.

बाळाजी वयाने सज्ञान झाले त्याकाळात जंजिऱ्याचे सिद्दी यांची आवजी यांच्यावर काही कारणाने इतराजी झाली आणि सिद्दींनी आवजी व त्यांचे मोठे भाऊ खंडोबा यांना समुद्रात बुडवून ठार मारले आणि आवजी यांची पत्नी व तिघे पुत्र यांना अटक करून अरब देशातील मस्कत येथे गुलाम म्हणून विकण्यासाठी पाठवले. जहाज मस्कतच्या दिशेने रवाना होत असताना रखमाबाईंनी देवाची करुणा भाकली आणि म्हणाली की दोन जीव गेले, आता फक्त चार राहिले ते सुद्धा दुसरा धर्म स्वीकारायला नेत आहेत. तुझे वरदान काय कामाचे? खरोखर तू आमच्यासोबत असशील तर तुझा चमत्कार दाखव. 

जहाज जंजीऱ्यातून निघून एक दोन दिवस झाले असताना अचानक अरबी समुद्रात जोरदार वादळ सुटले आणि जहाजाच्या शिडात ते वारे शिरून जहाजाने दिशा बदलली आणि ते जहाज पुन्हा भारताच्या दिशेने येऊन राजापूरच्या बंदरात शिरले. राजापूर हे रखमाबाई यांचे माहेर असल्याने त्यांचे भाऊ विसाजी शंकर हे तेथेच राहत होते व मोठे व्यापारी होते. विसाजी आपले भाऊ आहेत हे त्या खलाशांना रखमाबाईंनी कळू दिले नाही आणि विसाजींना आपल्या बहीण व भाच्यांबद्दल समजले तेव्हा त्यांनी खलाशांची भेट घेतली खलाशांना पैसे देऊन रखमाबाई व मुलांना विकत घेतल्याचे नाटक केले व चौघांची सुटका झाली.

पुढे बाळाजी आवाजी व त्यांचे दोन भाऊ राजापूर येथेच काहीकाळ राहिले. विसाजींनी सर्वांना चांगले शिक्षणही दिले. शिक्षण झाल्यावर बाळाजी यांनी एका कसबेदाराच्या हाताखाली कारकुनाची नोकरी धरली. पुढे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापुरास स्वारी काढली त्यावेळी बाळाजींना शिवाजी महाराजांना भेटण्याची ओढ निर्माण झाली. शिवाजी महाराजांची कीर्ती त्याकाळी सर्वत्र पोहोचली होती. 

शिवाजी महाराज राजापुरास आले आहेत हे जाणून १६४८ साली बाळाजी आवजींनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात महाराजांना एक पत्र पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पत्र वाचले व त्यातील बाळाजी यांचे अत्यंत वळणदार अक्षर वाचून ते खुश झाले व बाळाजी यांना आपल्या पदरी कारकून म्हणून रुजू होण्यास सांगितले.

काही दिवसांनी महाराज राजापुरास गेले असता त्यांनी तेथील लोकांना बाळाजी यांना भेटायला घेऊन येण्याचा निरोप दिला. महाराजांची माणसे बाळाजींच्या घरी गेली व बाळाजींना घेऊन महाराजांकडे गेली. ज्यावेळी ही बातमी त्यांच्या आईस समजली तेव्हा ती खूप घाबरली आणि महाराजांना भेटून त्यांच्या पायावर लोटांगण घातले व आपली सर्व कैफियत कथन केली. एका मोठ्या कुटुंबाची अशी वाताहत झालेली पाहून महाराज गहिवरले आणि म्हणाले की जसे तुम्हाला तीन पुत्र आहेत तसाच मी चौथा आहे असे समजा व तिघांनाही माझ्याकडे पाठवून द्या. मी त्यांचा चांगला उत्कर्ष करेन. 

यानंतर बाळाजी व त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांसोबत गेले. महाराजांनी बाळाजी आवजी यांना सुरुवातीस कारकुनी सांगितली. बाळाजी आवजी यांचे अक्षर सुरेख होतेच मात्र ते एक उत्तम लेखक आणि मजकूर जुळवणारे सुद्धा होते त्यामुळे महाराजांना पत्रात नक्की काय सांगायचे आहे हे फक्त मायन्यावरूनच त्यांना समजत असे व महाराजांच्या मनातील शब्द ते कागदावर अत्यंत सुसंगत व मुद्देशीरपणे उतरवत. स्वभावात प्रामाणिकपणा व स्वामिनिष्ठता असल्याने बाळाजी आवजींवर महाराजांची खूप मर्जी असे व अनेक गुप्त गोष्टींवर महाराज बाळाजींसोबत चर्चा करीत. त्यांची हुशारी पाहून महाराजांनी १६६२ साली त्यांना चिटणीस हे पद दिले. हे पद अष्टप्रधान मंडळाच्या अखत्यारीत येत नसले तरी त्याचे महत्व त्याकाळी खूप होते.

लेखन करण्याच्या बाबतीत बाळाजींचा जो हातखंडा होता त्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे, एकदा शिवाजी महाराज स्वारीवर गेले असता बाळाजींना निरोप पाठवून एक खलिता तातडीने लिहावयास सांगितला मात्र त्या दिवशी चिटणिशीची अनेक कामे निघाल्याने रात्र झाली तरी बाळाजींना खलिता लिहायला जमले नाही. रात्री महाराज आल्यावर खलिता लिहिला का? असे बाळाजींना विचारले असता बाळाजी घाबरून गेले. खलिता लिहिला नाही असे महाराजांना सांगितले तर हुकूम मोडल्याबद्दल शिक्षा होणार हे बाळाजींना माहित होते मग त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी खलिता लिहिल्याचे खोटेच सांगितले तेव्हा महाराजांनी काय मजकूर लिहिला आहे तो आम्हाला वाचून दाखवा असे बाळाजींना सांगितले तेव्हा बाळाजींनी दफ्तर उघडून एक कोरा कागद समोर धरला आणि अजिबात न अडखळता सर्व मजकूर वाचून दाखवला.

उत्तम खलिता लिहिल्याबद्दल महाराजांनी बाळाजींना शाबासकी दिली मात्र बाजूला एक दिवटीवाला उभा होता त्याला बाळाजींनी ही शक्कल दिसून तो हसू लागला तेव्हा महाराजांनी त्यास हसण्याचे कारण विचारले तेव्हा घाबरून त्याने बाळाजींनी वाचून दाखवलेला खलिता कोरा होता असे महाराजांना सांगितले. बाळाजींनी मग महाराजांची क्षमा मागितली आणि खलिता लिहायला का जमला नाही याचे कारण सांगितले मात्र कोरा कागद असूनही आपल्याला हवा तसा खलिता वाचून दाखवल्याने महाराजांनी बाळाजींना माफ केले व त्यांचे कौतुकही केले.

बाळाजी आवजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चिटणिशीची जबाबदारी सांभाळलीच मात्र नाजूक अशा वकिलातीची कामेही त्यांनी प्रसंगानुरूप उत्तमपणे पार पाडली. १६७३ साली शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी यांना पालखीचा मान दिला होता. 

बाळाजी आवजी यांना एकूण तीन पुत्र होते पहिले आवजी बाळाजी, दुसरे खंडो बल्लाळ उर्फ अप्पा आणि तिसरे अण्णाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर बाळाजींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली मात्र संभाजी महाराजांविरोधात अष्टप्रधान मंडळातील काहींनी जो कट केला त्यामध्ये यांना नाहक गुंतवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली व बाळाजी आवजी व त्यांचे थोरले पुत्र आवजी यांना परळी येथे १६८१ साली हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. बाळाजी आवजींसारखा एक कर्तबगार पुरुष नाहक मारला गेल्याचे दुःख महाराणी येसूबाई यांना झाले व कालांतराने संभाजी महाराजांनाही गोष्टीचा खेद वाटून त्यांनी बाळाजी आवजी यांचे द्वितीय पुत्र खंडो बल्लाळ यांना आपल्या सेवेत कायम ठेवले व खंडो बल्लाळ यांनीही अगदी शेवटपर्यंत संभाजी महाराजांची सेवा केली.