बहिरेवाडीचे ऐतिहासिक जाधव घराणे

सन १७८८ च्या पूर्वीपासूनच्या कागदपत्रातून जाधव घराण्याच्या इतिहासाचे उल्लेख मिळतात. फिरंगोजी जाधव हे घराण्याचे मुळ पुरुष आहेत. फिरंगोजीपुत्र खेत्रोजी जाधव यांनी आपल्या पराक्रमाने करवीर छत्रपतींच्या दरबारी सेवा करीत असताना छत्रपतींचे मन जिंकले आणि बहिरेवाडी हा गाव चंद्रसूर्य असेपर्यंत इनाम मिळविला.- संदीप वसंतराव जाधव

बहिरेवाडीचे ऐतिहासिक जाधव घराणे
बहिरेवाडीचे ऐतिहासिक जाधव घराणे

करवीरच्या शौर्यशाली इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांची कारकीर्द विशेष लक्षात घेण्याजोगी आहे. करवीरकर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी पटवर्धन, निपाणीकर, वाडीकर सावंत, इंग्रज यांचेबरोबर लढा दिला आणि करवीर राज्याचे रक्षण केले. या बाह्य शत्रूंबरोबर लढा देत असताना महाराजांना राज्यांतर्गतही काही शत्रु होते. त्यांचा बंदोबस्त महाराजांनी आपल्या सरदारांच्या बळावर अत्यंत खुबीने केलेला दिसून येतो. याच शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले एक पराक्रमी घराणे म्हणजे बहिरेवाडीकर जाधव (ता.पन्हाळा, जि.कोल्हापुर) घराणे होय. 

या घराण्याने आपली करवीर दरबारशी असलेली निष्ठा वेळोवेळी दाखवून दिली आहे. बहिरेवाडीकर जाधव या घराण्याची माहिती आपणास वंशपरंपरागत वंशावळीच्या नोंदी ठेवणाऱ्या हेळवी लोकांच्या नोंदीवरूनही मिळते . वंशावळीतील नोंदीनुसार हे घराणे मूळचे "मुंगी पैठण" येथील असून साधारण सोळाव्या शतकामध्ये या घराण्यातील पुरुषांनी तेथून स्थलांतर करून कराड जवळील "बड़े सैदापूर" या गावी वास्तव्य केले. कालांतराने तिथून स्थलांतर करून ते आजच्या बहिरेवाडी गावी वास्तव्यास आले व आजही तेथेच वास्तव्यास आहेत.  या घराण्याची एक शाखा येलर (ता. वाळवा, जि. सांगली) गावी आहे. आपल्या कर्तबगारीवर हे घराणे करवीर छत्रपतींच्या दरबारी रुजू झाले

सन १७८८ च्या पूर्वीपासूनच्या कागदपत्रातून जाधव घराण्याच्या इतिहासाचे उल्लेख मिळतात. फिरंगोजी जाधव हे घराण्याचे मुळ पुरुष आहेत. फिरंगोजीपुत्र खेत्रोजी जाधव यांनी आपल्या पराक्रमाने करवीर छत्रपतींच्या दरबारी सेवा करीत असताना छत्रपतींचे मन जिंकले आणि बहिरेवाडी हा गाव चंद्रसूर्य असेपर्यंत इनाम मिळविला. सन १७८८ साली रखमाजी भोसले आनुरकर यांनी राज्यांतर्गत काही बडाळी करून नेसरी, तुरुकवाडी व किल्ले भवानीगड आदी काही महत्त्वाची ठाणी आपल्या ताब्यात घेतली. सर्व बाबी महाराजांना समजताच त्यांनी रत्नाकरपंत राजाज्ञा यांचे बरोबर फौज देऊन सदर ठाणी मोकळी करून घेतली. यावेळी झालेल्या लढाईत रखमाजी भोसले मारला गेला. खेत्रोजी बिन फिरंगोजी जाधव यांच्या पायास जखम लागून पाय अधू झाला म्हणून शिवाजी महाराज (तिसरे) यांनी खेतोजींना त्यांचे कुटुंब चालविणे अगत्याचे आहे हे जाणून बहिरेवाडी हा गाव चंद्रसूर्य असेपर्यंत सरंजाम इनाम करून दिला. अशी माहिती आणि पराक्रमाची थोडक्यात हकीकत घराण्याच्या सनदा पत्रकामधून मिळते. याचबरोबर जाखले गावी गवती कुरणाचा डाग, कसबा कोडोली गावी मळा जमीनही दिली.

खेत्रोजी व त्यांचे पुत्र हनुमंतराव, सुभानजी, नाथाजीराव, फिरंगोजीराव व गणपतराव जाधव यांचेकडे गावची  वहिवाट चालू झाली. बहिरेवाडीकर जाधव घराण्याकडे फडनाईक, सरनाईक, नाईक, पाटील, इनामदार अशा हुद्देदर्शक पदव्या चालू झाल्या. करवीरकर छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या काळात जाधव घराण्याकडील गावची वहीवाट कशी असावी, याबाबत ही काही आज्ञा दिल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. जुन्या काही मोडो दस्तऐवजांवरुन घराण्यातील काही पुरुष हे शिलेदार असल्याचे व हुजूर आज्ञा येताच स्वारीसहित दरबारी हजर राहत असल्याचेही दिसून येते. हनुमंतराव जाधव यांनी आपल्या पराक्रमाने घुणकी या गावी पन्नास बिघे जमीन संपादन केल्याचेही समजते. याचबरोबर घराण्यातील पुरुष बडोद्याला स्वारीबरोबर गेले असल्याचेही उल्लेख सापडतात. सन १८२७ च्या एका यादीमध्ये फिरंगोजी जाधव फडनाईक यांनी छत्रपतींना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख आहे.

कोल्हापूरच्या प्रशासनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी इंग्रजांनी मेजर ग्रॅहम यांची कोल्हापूरला नेमणूक केली, ग्रॅहम यांनी कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक इत्यादी विविध बाजूंचा सूक्ष्म अभ्यास करून इंग्रज सरकारला एक विस्तृत अहवाल सादर केला. या अहवालामध्ये छत्रपतींचे सरंजामदार म्हणून गणपतराव बिन खेलोजीराव जाधव यांना १०५४ रुपयांचा सरंजाम असल्याची नोंद सापडते. करवीर दरबाराशी सदैव एकनिष्ठ असणाऱ्या जाधवांचे वंशज आज बहिरेवाडी गावामध्ये वास्तव्यास आहेत, बाहिरेवाडी गावामध्ये जाधवांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या काही खाणाखुणा कालौघात तग धरून उभ्या आहेत. त्यामध्ये जाधवांच्या तट बुरुजांनीयुक्त बाड्याचे भव्य प्रवेशद्वार, लढाईवेळी डोक्यात घालावयाचे शिरस्त्राण, तलवारी, काही समाध्या, सती नावाचे ठिकाण (याठिकाणी जाधव घराण्यातील तीन स्त्रिया सती गेल्याचे उल्लेख मिळतात) आदी गोष्टी आहेत.

आपल्या पूर्वजांचा पराक्रमी वारसा या घराण्यातील वंशजांनी अभिमानाने पुढे जपला आहे. या घराण्यातील श्री रामचंद्र लक्ष्मण जाधव हे पहिल्या महायुद्धामध्ये सामील झाले होते तर श्री राघ भैरु जाधव हे गावचे पोलीस पाटील असूनही १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभागी झाले होते. त्याबद्दल इंग्रजांनी त्यांचा जमीनजुमला, घरदार जप्त केले होते. असा हा दैदिप्यमान इतिहासाचा वारसा लाभलेले घराणे म्हणजेच "बहिरेवाडीकर जाधव घराणे" होय.

- संदीप वसंतराव जाधव (रा.बहिरेवाडी, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर)