ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर

ब्रह्मेंद्रस्वामींच्या शिष्यवर्गात तत्कालीन प्रमुख व्यक्ती असल्याने व सर्वच बाबतीत त्यांचा सल्ला ग्राह्य धरला जात असल्याने त्यांना मोठं मोठ्या दक्षिणाही प्राप्त होत व या दक्षिणांचा वापर ते कर्ज देऊन त्यातून लोकोपयोगी कामे करण्यासाठी करत असत.

ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर
ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर

अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक मोठे धार्मिक प्रस्थ म्हणजे ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर. ब्रह्मेंद्रस्वामी यांचा जन्म १६४९ साली जालना जिल्ह्यातील गणपतीचे राजुरी जवळ असलेल्या दुधेवाडी येथे एका देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव विष्णू असे असून त्यांच्या वडिलांचे नाव महादेवभट व आईचे नाव उमाबाई असे होते.

बाराव्या वर्षीच ब्रह्मेंद्रस्वामी मातृ पितृ प्रेमास पारखे झाले व या घटनेमुळे त्यांना लहानपणीच विरक्ती प्राप्त झाली. विरक्ती प्राप्त झाल्यावर त्यांनी राजुरीच्या गणपतीची आराधना सुरु केली. राजुरी येथे खऱ्या अर्थी त्यांच्या तेजाची ओळख लोकांना झाली व त्यांना विष्णुबुवा असे नाव प्राप्त झाले.

राजुरी येथे काही काळ व्यतीत केल्यावर ब्रह्मेंद्रस्वामींनी काशीस प्रयाण केले व तेथे ज्ञानेंद्र सरस्वती यांच्यापासून परमहंस दीक्षा घेतली व येथे त्यांस ब्रह्मेंद्र स्वामी नामाभिमान प्राप्त झाले. पुढील काळात ब्रह्मेंद्रस्वामींना परमहंस स्वामी या नावाने सुद्धा ओळखले जात असे हे त्यांच्या पत्रांतून समजते. दीक्षा घेतल्यावर त्यांनी भारतातील विविध तीर्थस्थळांची यात्रा केली व १६९० साली ते कृष्णातीरी आले. या काळ म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दाने व्यापलेला काळ होता. कृष्णातीराहून ब्रह्मेंद्रस्वामी यांनी कोकणातील चिपळूण येथे प्रस्थान केले व तेथील पेढे या गावी वास्तव्य केले. पेढे येथील वास्तव्यात त्यांच्यातील दिव्यशक्तीची प्रचिती अनेकांना आली. त्याकाळी चिपळूण प्रांती सिद्दीचा अमल होता व चिपळूणचा सुभा आवजी बल्लाळ यांच्याकडे असून तेथील मीठबंदराचा हवाला बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे होता. स्वामींचा महिमा त्यांना समजल्यावर दोघांनी स्वामींची भेट घेतली व त्यांना गुरुपदी स्थान दिले.

आवजी बल्लाळ आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यासारखे मोठे शिष्य लाभल्यावर साहजिकच स्वामींच्या भक्तांची संख्या वाढू लागली आणि त्यांना पेढे येथील निवास हलवून १६९८ साली परशुराम क्षेत्र अर्थात लोटे परशुराम येथे वास्तव्य करावे लागले.  या ठिकाणी परशुरामाचे जे मंदिर आहे त्याचा १७०७ साली त्यांनी जीर्णोद्धार केला.

छत्रपती शाहू महाराजांनी मोगलांच्या कैदेतून महाराष्ट्रात येऊन जेव्हा राजपद प्राप्त केले त्यापूर्वी ते चंदन वंदन येथून प्रतिपक्षासोबत लढत होते यावेळी स्वामींना हे वृत्त कळून त्यांनी आपले कटिसूत्र आणि कौपिन शाहू महाराजांना पाठवली आणि निरोप दिला की तुम्ही यशस्वी होऊन राज्याराम कराल. शाहू महाराजांना पुढे विजय प्राप्त होऊन त्यांनी सातारा येथे राज्याभिषेक केला मात्र ब्रह्मेंद्रस्वामींनी दिलेला आशीर्वाद त्यांच्या लक्षात असल्याने ते सुद्धा ब्रह्मेंद्र स्वामींना मानू लागले.

१७०७ मध्ये जंजिऱ्याच्या शासकपदी सिद्दी सुरूल आला. यास याकूतखान या नावानेही ओळखले जात असे. हा फारसा धर्मांध नसून हिंदू धर्माचाही आदर करणारा होता. याने स्वामींची कीर्ती ऐकून त्यांना भेटावयास बोलावले आणि त्यांना पेढे आणि आंबडस (अर्धा) ही दोन गावे इनाम करून दिली. कालांतराने परशुराम त्रिंबक प्रतिनिधी आणि कान्होजी आंग्रे यांची सुद्धा स्वामींसोबत भेट होऊन दोघांची स्वामींवर भक्ती जडली.

पुढे प्रतिनिधींनी स्वामींना त्यांच्या मुलुखातील आंबडस गावाचा अर्धा भाग इनाम दिला व पुढे मौजे डोले आणि महाळुंगे ही गावेही इनाम करून दिली. अशा प्रकारे पुढे ब्रह्मेंद्रस्वामी कोकण व घाटमाथ्यावरील एकूण दहा गावांचे जहागीरदार बनले. 

ब्रह्मेंद्रस्वामींच्या शिष्यवर्गात तत्कालीन प्रमुख व्यक्ती असल्याने व सर्वच बाबतीत त्यांचा सल्ला ग्राह्य धरला जात असल्याने त्यांना मोठं मोठ्या दक्षिणाही प्राप्त होत व या दक्षिणांचा वापर ते कर्ज देऊन त्यातून लोकोपयोगी कामे करण्यासाठी करत असत. अनेक राजकीय मोहिमा, जीर्णोद्धार, नवीन देवळे निर्माण करणे, तलाव, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाटरस्ते, अन्नदान इत्यादी अनेक कामे त्यांनी शिष्यांकडून व सावकारीतून प्राप्त झालेल्या द्रव्यातून केली.

पुढील काळात अंजनवेलचा सुभेदार सिद्दी सात व स्वामींचा एका हत्तीवरून मोठा वाद झाला आणि सिद्दी सात याने परशुराम क्षेत्रावर तीनशे सैनिक घेऊन हल्ला केला व प्रचंड नासधूस केली व या प्रकाराने उद्दिग्न होऊन ब्रह्मेंद्रस्वामींनी कोकण प्रांत सोडला व सध्याच्या सातारा जिल्ह्यातील धावडशी येथे प्रस्थान केले.

या काळात त्यांना थोरले बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा इत्यादी शिष्य लाभले व याच काळात शाहू महाराजांनी अत्यंत महत्वाकांक्षी अशी कोकण मोहीम हाती घेऊन आपले सर्व मुख्य सेनापती कोकणात उतरवून सिद्दीकडून बराचसा कोकण मराठा राज्यात घेतला. चिमाजी अप्पानी सिद्दी सात यास ठार मारून स्वामींच्या अपमानाचा बदला सुद्धा घेतला. 

त्याकाळच्या मराठ्यांनी काढलेल्या जंजिरा, वसई इत्यादी मोहिमांमध्ये स्वामींनी विशेष लक्ष घातल्याचे दिसून येते कारण या काळात त्यांच्यात शाहू महाराज, बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांच्यासोबत झालेला पत्रव्यवहार प्रचंड होता. या मोहिमांना लागणारे आर्थिक पाठबळ कर्जाच्या स्वरूपात ब्रह्मेंद्रस्वामींनी पुरवले असल्याचे सुद्धा पत्रांतून दिसून येते. तत्कालीन राजकारणावर नजर ठेवून सल्ला देण्याचे कार्य ते सतत करत आणि अनेक घरगुती तंटे सुद्धा सोडवण्याच्या कामी हे उपयोगी पडत. १७३८ साली ब्रह्मेंद्रस्वामींनी रामनामाचा जप करत समाधी घेतली. छत्रपती शाहू महाराजांनी ब्रह्मेंद्रस्वामींच्या समाधीचे काम सुरु केले ते १७५८ साली पूर्ण झाले. 

अठराव्या शतकातील धार्मिक व राजकीय क्षेत्रावर मोठा प्रभाव असलेली व्यक्ती म्हणून ब्रह्मेंद्रस्वामी यांचे नाव अग्रक्रमी राहील.