मराठेशाहीतील तोफांची व तोफगोळ्यांची निर्मिती

स्वराज्यात स्वदेशी तोफांचा प्रयोग प्रथम केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुरंदर किल्ल्यावर त्यांनी प्रथम तोफांची निर्मिती सुरु करून स्वराज्याच्या युद्धसज्जतेचा पाया उभारला.

मराठेशाहीतील तोफांची व तोफगोळ्यांची निर्मिती
मराठेशाहीतील तोफांची व तोफगोळ्यांची निर्मिती

मराठेशाहीतील तोफांची निर्मिती या विषयावर फार कमी प्रमाणात चर्चा केली जाते. त्याकाळी तोफखाने हे युद्धात प्रमुख कामगिरी बजावत असत मात्र या तोफखान्यांसाठी लागणार्‍या तोफा व गोळे हे कुणाकडून तयार केले जात असत याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. या लेखात आपण मराठ्यांच्या युद्धसज्जतेमध्ये महत्वाची कामगिरी बजावणार्‍या तोफखान्यातील बहुतांशी तोफा व गोळे कसे व कुठे तयार झाले या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

स्वराज्यात स्वदेशी तोफांचा प्रयोग प्रथम केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुरंदर किल्ल्यावर त्यांनी प्रथम तोफांची निर्मिती सुरु करून स्वराज्याच्या युद्धसज्जतेचा पाया उभारला. मिर्झा राजा जयसिंग याने स्वराज्यावर स्वारी केल्यावर स्वराज्याच्या पूर्वीच्या पराभूत शत्रूंसोबत युतीची बोलणी चालवली. यामध्ये अफझलखानाचा मुलगा तसेच चंद्ररावाचे नातलग होते. यासंदर्भात १६६५ साली जयंसिंगाने औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात तो लिहीतो की,

'जावळीचा जुना जमिनदार चंद्रराय व त्याचा भाऊ यांना मी बोलावणे पाठविले आहे. त्यांना पुष्कळ अभिवचने देऊन पाथेयांचिही तजवीज केली आहे. अंबाजी, खारकुली व त्यांचे दोन भाऊ हे सर्व पुरंदरावर शिवाजीराजे यांनी तोफा ओतण्याकरिता ठेवले असून त्यांना ३००० ची मनसबदारी आहे.'

यावरून हे समजते की पुरंदरावर महाराजांनी तोफा ओतण्याचा कारखाना सुरु केला होता. शिवाजी महाराजांजवळ फक्त युद्धासाठीच २०० तोफा होत्या याशिवाय प्रत्येक किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेल्या तोफांची तर गणतीच नव्हती याशिवाय प्रत्येक तोफेचे हत्ती व गोलंदाज कायम तैनात असत.

उत्तर मराठेशाहीमध्ये सन १७६० सालचे नानासाहेब पेशवे यांनी लक्ष्मण कोन्हेर यांस लिहीलेले पत्र आहे यामध्ये ते म्हणतात की, आपाजी कोकीळ कासार यांना साल गुदस्ता चिरंजीव सदाशीव भाऊंनी गोळे तोफांचे तयार करावयास सांगितले होते. त्यापैकी पाच हजार गोळे कासार मजकूर यांजकडे राहिले आहेत. ते गोळे खरेदी करणे.

याच काळातील एका नोंदीप्रमाणे एका तोफेचा दुमाला जाया झाला असताना तो नवा करण्यास ५४-८ रुपये इतका खर्च आला होता. हे काम कासारांनी केले होते.  त्यावेळी एका कासाराचा दरमहा पगार ३० रुपये असून दुसऱ्याच्या १२ रुपये होता. या कामास १ महिना व ९ दिवस लागले. काम झाल्यावर त्यांना २५ रुपये बक्षीस मिळाले असल्याची नोंदही सापडते. याशिवाय सरनागिन नावाच्या तोफेच्या चोडशी  साठी लागणारी माती अलिबाग येथून मागवण्यात आली होती. ती माती पुरंदर किल्ल्यावरील केदारनाथ मंदिरात असलेलया  सरनागिन तोफेचा बुंधेरा ओतण्यास वापरली होती याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या काळात सुरु झालेला पुरंदर वरील तोफांचा कारखाना उत्तर मराठेशाहीतही कार्यरत होता. 

पानिपत युद्धात झालेली मराठी साम्राज्याची हानी भरुन काढण्याचे काम माधवराव पेशव्यांनी केले. त्यांनी हे करताना प्रशासकिय व्यवस्था बळकट करण्यासोबत युद्धसज्जता व शस्त्रास्त्रसज्जता ही प्रमुख ध्येये समोर ठेवली.  १७६५ साली नागोठण्याचे देवशेट कासार यांनी स्वराज्यासाठी देशी तोफगोळे बनवण्याचे काम केले होते. हा काळ माधवराव पेशवे यांच्या कर्नाटक स्वारीचा काळ होता व या स्वारीसाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याची गरज होती. यासाठी माधवरावांनी देवशेट यांना तोफगोळे तयार करुन देण्यास सांगितले. त्यासाठी आधी देवशेट यांनी पंधरा गोळे प्रायोगिक तत्वावर तयार करुन त्यांचा दर्जा माधवरावांना दाखवला व त्या गोळ्यांचा दर्जा पाहून माधवरावांनी आणखी गोळे तयार करुन आणण्यास देवशेट यांना सांगितल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात येतो. सदर गोळे गरनाळ्याचे होते. नागोठण्याच्या कारखान्यात देवशेट यांच्यासोबत एकूण दहा आसामी काम करत होते.

सन १७६७ सालच्या राघोबादादांच्या रोजनिशीमध्ये त्यांनी लिहीले आहे 'आनंदवल्लीस तोफांचे गोळे तयार करण्याचा नवीन कारखाना सुरु केला. अशाच प्रकारचा कारखाना पूर्वी नागोठण्यास होता.' पुढे नागोठण्याच्या कारखान्यात स्वराज्यासाठी गोळ्यांसोबत तोफाही तयार केल्या ज्यांचा वापर मराठ्यांच्या तोफखान्यात केला गेला व कर्नाटक मोहीमेत या तोफा शत्रुंवर आग ओकत होत्या. माधवरावांच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या मानकर्‍यांना ते गेल्यावर काही उणे पडू नये म्हणून इनामे दिली त्यामध्ये नागोठण्यातील घराण्याचा समावेश होता. 

सन १७७१ सालचे एक माधवराव यांचे पत्र आहे ज्यामध्ये ते सांगतात की मोरशेट व सदाशिवशेट कासार आसामी सात यांनी सरकारात तोफांचे काम चांगले केले तेव्हा त्यांना नागोठणे परिसरातील काही गावे त्यांच्या या कामगिरीबद्दल इनाम म्हणुन दिली, तो उल्लेख पुढीलप्रमाणे..

"सदाशिवशेट व मोरशेट वैगेरे कासार आसामी सात यांनी सरकारात तोफांचे काम चांगले केले सबब दोन गांव पाचशे रुपयांचे कमाल आकाराचे द्यावयाचा करार त्याप्रमाणे तर्फ नागोठणे तालुके अवचितगड पैकी दोन गावे नेमिले"

एवढेच नव्हे तर शुक्रवार पेठेतल्या तोफखान्यात तोफांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नागोठण्याचे सदाशिवशेट यांना पुण्यास माधवरावांनी तोफखान्याजवळच घर दिले होते व घराचा सारा त्यांच्याकडून बिलकूल घेण्यात येवू नये म्हणून त्यांच्या शिवराम रघुनाथ या अधिकार्‍यास सक्त आदेश दिला होता. सदर नोंद १७७२ सालचीच आहे ती अशी..

"सदाशिवशेट कासार यांचे घर पुण्यातल्या तोफखान्याच्या बाजुस आहे तेव्हा त्यांच्याकडून कर वसुल करु नये"

तोफा व तोफगोळ्यांच्या कामात लागणारी चोडशी नामक जातीची जी माती होती ती साष्टी येथून आयात केली जात असे असेही उल्लेख मिळतात..मराठेशाहीतील तोफांच्या व गोळ्यांच्या निर्मितीवर अधिक साधन परिपुर्ण अभ्यास होण्याची गरज आहे कारण शस्त्र व अस्त्र निर्मितीच्या बाबतीत आपण मराठे कमी नव्हतो!