बापू गोखले - मराठी राज्याचे अखेरचे सरदार

बापू गोखले यांचा जन्म कोकणातील राजापूर जवळ तळे खांजण नावाच्या गावात झाला. त्यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले असे होते.

बापू गोखले - मराठी राज्याचे अखेरचे सरदार

यांचे आजोबा बल्लाळपंत गोखले हे आपल्या वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्न घेऊन आपला चरितार्थ सांभाळत असत. त्यांना धोंडोपंत व गणेशपंत नावाचे दोन पुत्र होते. बापू गोखले हे गणेशपंतांचे पुत्र. बापूंचे काका धोंडोपंत हे सुद्धा अतिशय कर्तबगार असल्याने त्याच्या छत्रछायेखाली बापूंनी पराक्रमाचे धडे गिरवले. 

धोंडोपंतांसोबतच बापू हे कोकणातून पुण्यास येऊन पेशवे दरबारात रुजू झाले. धोंडोपंत हे पूर्वी विजयदुर्गावर काम करत असत मात्र कालांतराने त्यांना परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या हाताखाली सरदारकी प्राप्त झाली. धोंडाजी वाघ विरुद्ध धारवाडच्या मोहिमेवर असताना धोंडोपंतांचा मृत्यू झाला व याच लढाईत बापू गोखले यांच्या भावाचाही मृत्यू झाला. यानंतर धोंडोपंत यांची सरदारकी बापूंना प्राप्त झाली. 

आपल्या काकांच्या व भावाच्या मृत्यूचा वचपा यांनी पुढे घेतला व इंग्रजांच्या मदतीने धोंडाजी वाघ यांना ठार मारले. पुढे राज्यात निर्माण झालेली बारभाई व बावन पावग्यासारखी प्रकरणे यांनीच हाणून पाडली. वासोट्यास ताई तेलीण व पंतप्रतिनिधींचे बंड यांनी हाणून पाडले. मात्र पुण्यास गेल्यावर त्यांच्या विरोधात कोणीतरी कागाळी केल्याने यांची सरंजामीची वस्त्रे पेशव्यांनी मागून घेतली. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वस्त्रे परत केल्याने पेशवे खुश झाले व त्यांना १२ लाखांचा सरंजाम दिला. 

बापू गोखले हे स्वामिनिष्ठतेचे एक उत्तम उदाहरण होते. त्यांचे स्वामी म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांची अनेक धोरणे चुकली तरीही अनेकदा बापूनी स्वामिनिष्ठतेपुढे नेमस्त धोरण स्वीकारले मात्र आपल्या धन्याची साथ सोडली नाही कारण त्यांच्यासाठी व्यक्तीपेक्षा त्या पदाचे महत्व मोठे होते. एकदा गणेश खिंडीच्या लढाईत यांचा घोडा ठार झाला तरी ते घोड्यावरून उतरून मैदानात लढत होते. 

इंग्रजांनी पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरे बाजीराव वेगवेगळ्या ठिकाणी आपले मुक्काम बदलत होते. इंग्रजांनी त्यांना गाठू नये म्हणून त्यांची पिछाडी बापू सांभाळत व इंग्रजांशी लढाई करून आपल्या धन्यास निसटून जाण्यास मदत करीत. याच काळात बापूच्या मुलाचे लढाईत निधन झाले व त्याची बायको सती गेली. मात्र बापू याचे दुःख न मानता लढत राहिले. 

२० फेब्रुवारी १८१८ रोजी अशाच एका ठिकाणी दुसऱ्या बाजीराव चा तळ पडला असताना इंग्रजांनी तेथे छापा टाकला यावेळी श्रीमंत जेवण करत असताना बापूंनी त्यांना लवकर निघण्यास सांगितल्यावरून बाजीरावाने त्यांनाच सुनावले एवढे दिवस दाखवलेल्या स्वामिनिष्ठतेची शेवटी ही किंमत मिळाल्यावर बापू उद्वेगाने त्यांना म्हणाले की 'जय झाल्यास परत येऊ नाहीतर हे शेवटचे दर्शन' आणि इंग्रजांचा सामना करण्यास निघून गेले. फक्त ५० लोकांसह त्यांनी ब्रिटिश अधिकारी स्मिथ याच्या बलाढ्य सैन्यावर हल्ला केला. त्यातच बापू यांना वीरमरण प्राप्त झाले. आपल्या धन्याच्या चुकीच्या धोरणामुळे त्याजवर वाईट काळ आला असूनही त्याला सोडून न जाता सहकार्य करणे हे  स्वामिनिष्ठतेचे  वेगळे उदाहरण त्यांनी दाखवून दिले म्हणून मैदान सोडून कधीही पळ न काढणाऱ्या वीरांमध्ये त्यांचा समावेश होतो.