महादजी शिंदे - मराठेशाहीतील वीर मुसद्दी

मराठेशाहीतील वीर मुसद्दी म्हणून महादजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. महादजी हे राणोजी शिंदे यांचे पुत्र. त्यांच्या आईचे नाव चिमाबाई असे होते.

महादजी शिंदे - मराठेशाहीतील वीर मुसद्दी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

राणोजी शिंदे यांच्या मृत्यूपश्चात महादजी यांना पेशव्यांच्या पागांची जबाबदारी मिळाली या शिवाय ते सुरुवातीपासूनच अनेक स्वाऱ्यांवर जात असल्याने युद्धकलेचे व मुसद्दीगिरीचे प्रशिक्षण त्यांना अगदी बालवयातच प्राप्त झाले.

तळेगांव उंबरी येथे झालेल्या लढाईत महादजी यांनी पराक्रमाची झलक दाखवली व कालांतराने औरंगाबाद, खर्डा व पंजाब येथील मोहिमांमध्ये भाग घेऊन विजयश्री खेचुन आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. पानिपत येथील लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला व अनेक माणसे मारली गेली यावेळी अब्दालीच्या सैन्यातील एका पठाणाने त्यांच्या पायावर जोरदार वार केला त्यामुळे नाईलाजास्तव महादजी यांना माघार घ्यावी लागली मात्र राणा खान नावाच्या एका सैनिकाने जखमी महादजींना सुखरूप माघारी आणण्यास मोलाची मदत केली. 

१७६६ साली गोहद येथील जाट राजावर रघुनाथरावांनी स्वारी केली त्या स्वारीत महादजी यांनी पराक्रम गाजवला व या पराक्रमानंतर त्यांना सरदारकीची वस्त्रे प्राप्त झाली. यावेळी दिल्ली येथील बादशाही तख्तावर मराठे, जाट व इंग्रज लक्ष ठेवून होते. मिरझा नजबखान मेल्यावर त्याचे अधिकार मिळवण्यासाठी हमदानी व मिरझा शफीनी महादजी यांना भेटून बादशाही तख्ताची व्यवस्था लावण्याची विनंती केली पण मिरझा शफीचा हमदानी याने खून केला. तसेच अफरासियाखान मराठ्यांची मदत घेतो म्हणून हमदानीच्या भावाने त्याचाही खून केला. अशा रीतीने आग्र्याच्या सुभेदाराच्या माणसांकडून मराठ्यांच्या समर्थनात असलेल्या अनेकांचा खून करण्याचा सपाटा सुरु झाला. 

हे पाहून महादजींनी सैन्याची जमवाजमव केली व बादशहाची भेट घेतली. या भेटीत बादशाहने महादजी यांना गिरबक्षगीर हा किताब दिला. यानंतर त्यांनी प्रतापसिंह कछवाह व रणजितसिंग जाट यांचा पाडाव केला. पुढे शीख व मुसलमान सैन्य एक झाले आणि त्यांना शाहजादा जवान बक्ष सामील झाला. यावेळी मोठीच अडचण निर्माण झाली कारण महादजींजवळ पुरेसे सैन्यबळ नव्हते. त्यामुळे त्यांनी सैन्यात उत्तर हिंदुस्तानातील अधिकाऱ्यांची भरती केली आणि मोहिमेकरिता धनाची निर्मिती करावी यासाठी जयपूर जोधपुरवर स्वारी केली. 

लालसोट येथे राजपूत व मुसलमान सैन्य महादजी यांना आडवे आले यावेळी खंडेराव हरी, अंबाजी इंगळे, शिवाजी विठ्ठल व धारराव शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. या लढाईत हमदानी मेला मात्र अचानक उत्तर भारतातील अधिकारी फितूर झाल्याने या लढाईत महादजी यांना अपयश आले. याचा फायदा घेऊन गुलाम कादरने दिल्ली व बादशहास ताब्यात घेतले. बादशाहाच्या रक्षणासाठी ठेवलेल्या लाडोजीने रातोरात पळ काढला अशा वेळी निकड असताना महादजी यांच्या मदतीस कुणीही नव्हते. 

शेवटी त्यांनी उज्जयनी येथील स्वतःच्या वाड्यातील रूपे काढून मोहिमेसाठी पैसे उभे केले व शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. सुरुवातीस मथुरा ताब्यात घेऊन लखबादादांमार्फत गुलाम कादरचाही पराभव केला. मात्र राजपूत अजूनही विरोधातच होते. त्यांनी शाहजादा एहसान बख्त यास गादीवर बसवून महादजी याना विरोध करण्याचे ठरवले. आणि पाटण जवळ राजपूत व महादजी यांच्या सैन्यांत लढाया झाल्या. दुसऱ्या लढाईत मराठ्यांनी राजपुतांचा निकाल लावला व राजपूत पूर्णपणे शरण आले व इस्माईल बेगचाही निकाल लागला. या कृत्याने मराठ्यांच्या पराक्रमाचा गवगवा उत्तर भारतात पसरला. 

१७९२ साली महादजी पुण्यास आले मात्र कालांतराने त्यांना नवज्वराचा त्रास सुरु झाला. या आजारपणात ८ महिने गेले मात्र आजार काही बरा होऊ शकला नाही. या काळात महादजी यांचे वजन मराठेशाहीत सर्वोच्च स्थानी होते मात्र दुर्दैवाने वयाच्या ६७ व्या वर्षी पुण्यातील वानवडी येथे महादजी त्यांचे निधन झाले. महादजी हे वर्णाने सावळे असून कृष्ण भक्त होते. मथुरा वृंदावन त्यांच्या अतिशय आवडीचे ठिकाण होते. यांच्या काळात शिंदेशाहीची राजधानी उज्जैन असून ग्वाल्हेर येथे लष्कराचा तळ असे.