शिवजन्म - अंधःकार नाहीसा करणाऱ्या स्वराज्य सूर्याचा उदय

स्वराज्य अर्थात स्वकीयांचे राज्य स्थापणारे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज. जुन्नर प्रांतातील शिवनेरी या किल्ल्यावर महाराष्ट्रातील अंधःकार नाहीसा करणाऱ्या शिवभास्कराचा जन्म होऊन या वर्षी तब्बल ३९१ वर्षे पूर्ण झाली मात्र इतक्या वर्षांनंतरही हा स्वराज्य सूर्य तुम्हा आम्हा सर्वांच्याच मनात अखंड तळपतो आहे.

शिवजन्म - अंधःकार नाहीसा करणाऱ्या स्वराज्य सूर्याचा उदय
शिवजन्म - अंधःकार नाहीसा करणाऱ्या स्वराज्य सूर्याचा उदय

शिवरायांच्या जन्माचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय उत्थानाचा काळ. या काळात शहाजी महाराजांवर खूप मोठे राजकीय संकट कोसळले होते. उत्तरेतील बलाढ्य सत्ता असलेल्या मोगलांनी दक्षिणेतील अहमदनगर येथील निजामशाहीवर स्वारी केली असताना निजामशाहीतील अनेक सरदार हे मोगलांना जाऊन मिळाले मात्र शहाजी महाराजांनी अहमदनगराचा पक्ष धरून निजामशाहीचे रक्षण केले. पुढे शहाजी महाराजांनी खान जहान लोदीचा पक्ष धरून मोगलांशी लढाई केली मात्र खान जहानचा दारुण पराभव होऊन पूर्ण नाश झाल्याने नाईलाजास्तव शहाजी महाराजांना मोगलांसोबत तह करावा लागला. 

शहाजी महाराजांच्या पराक्रमावर खुश होऊन शाहजहानने त्यांना पुणे व सुपे भागाची जहागिरी दिली तसेच अहमदनगरचा वजीर फत्तेखान याच्या प्रांतापैकी काही मुलुखही तोडून दिला. कालांतराने फत्तेखान निजामशाही सोडून मोगलांस शरण गेला. त्यामूळे मोगलांनी त्याचा जो मुलुख शहाजी महाराजांना दिला तो परत फत्तेखानास देण्यात आला. हे पाहून शहाजी महाराजांनी मोगलांचा पक्ष सोडला व विजापूरचा सरदार मुरार जगदेव याच्या सहकार्याने विजापूरच्या आदिलशहाचा पक्ष धरला. 

शहाजी महाराजांनी मोगलांचा पक्ष सोडल्याने मोगलांचा त्यांच्यावर राग होताच त्यामुळे पुढे जेव्हा आदिलशाही व मोगल अशी युती झाली तेव्हा त्या करारामध्ये शहाजी महाराजांना आदिलशहाने आपल्या दरबारातून काढून टाकावे असा मुख्य मुद्दा होता. आपल्यासोबत झालेल्या दग्यानें शहाजी महाराज अत्यंत संतप्त झाले व त्यांनी संपत आलेल्या निजामशाहीचे पालकत्व स्वीकारून मोगल आणि आदिलशाह या बलाढ्य सत्तांवर तडाखे देणे सुरु केले. 

हाच तो काळ जेव्हा शहाजी महाराज आदिलशाह व मोगल या दोन बलाढ्य शत्रुंना एकाकी टक्कर देत होते तेव्हा त्यांनी सुरक्षिततेसाठी जिजाबाई यांना शिवनेरी या किल्ल्यावर ठेवले होते. 

याच किल्ल्यावर जिजाबाईंनी सन १६२३ साली संभाजीराजे यांना जन्म दिला व सन १६३० साली शिवाजी महाराजांना जन्म दिला. शहाजी महाराजांच्या या धामधुमीच्या काळात शहाजी महाराजांवर जी संकटे सारखी कोसळत होती त्याने जिजाबाई यांना अतिशय दुःख होत असे. आपला प्रांत असूनही शत्रूंच्या सावटाखाली कायम असुरक्षित वातावरणात राज्याच्या संपूर्ण जनतेला राहावे लागते याची खंत त्यांना कायमच असे यामुळे स्वकीयांचे राज्य या भूमीवर पुन्हा निर्माण होणे ही काळाची गरज आहे अशी धारणा त्यांची होऊन शहाजी महाराजांना शंत्रुंशी लढताना जो त्रास सहन करावा लागत आहे याचा वचपा आपल्या मुलांनी शत्रूंचा कायमचा पराभव करून घ्यावा असा दृढनिश्चय केला आणि सन १६३० मध्ये याच शिवनेरीवर आई शिवाईच्या साक्षीने जिजाऊंनी एका गोंडस राजपुत्रास जन्म देऊन या पुत्रामार्फत शत्रूंच्या ताब्यात गेलेली मायभूमी परत घेऊन जनतेच्या स्वराज्याची निर्मिती करण्याचा निर्धार केला व शिवाजी महाराजांच्या साथीने तो प्रत्यक्षातही आणला.

जिजाबाईंच्या मनात स्वराज्याची संकल्पना येण्यास अनेक कारणे होती कारण ऐन बाळंतपणात व शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरही त्यांच्या व लहानग्या शिवरायांच्या जीवास अनेक धोके निर्माण झाले होते. ऐन बाळंतपणात आपले पिता लखुजीराव व पती शाहजी महाराज यांच्यातील युद्ध पाहण्याचा प्रसंग त्यांच्या नशिबी आला. सन १६३३ साली मोगल सरदार मालदारखान याने जिजाबाईंना कैद केले मात्र जिजाबाईंनी बालशिवाजींना लपवून ठेवल्याने ते सुरक्षित राहिले. जिजाबाईंना मात्र कोंडाणा किल्ल्यावर कैदेत राहावे लागले. शहाजी महाराजांनी जिजाबाई व आपली दोन्ही मुले सुरक्षित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले कोकणात माहुली तसेच चौल येथील पोर्तुगीजांसोबत बोलणी करून आपल्या कुटुंबास काही काळासाठी आश्रय द्यावा अशी विनंती केली मात्र शहाजी महाराजांना मदत करून मोगलांशी वैर पत्करणे कुणालाही शक्य नव्हते. 

या काळात शिवाजी महाराजांच्या शोधासाठी मोगलानी खूप प्रयत्न केले मात्र जिजाबाईंच्या युक्तीने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी शहाजी महाराजांनी सन १६३६ साली मोगलांसोबत तह केला व आपल्या कुटुंबास निर्भय केले. मात्र त्यापूर्वी जे कठीण प्रसंग जिजाबाईंनी व बालशिवाजी महाराजांनी पाहिले ते कायम त्यांच्या मनात कोरले जाऊन दोघांनीही शत्रुंवर कायमची जरब बसेल असे स्वराज्य स्थापित करण्याचा निर्धार केला. यासाठी शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक, जिजाबाईंना स्वराज्य जननी आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हटले जाते. 

शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेस रात्री शुभ लग्नावर जिजाबाईंनी अलौकिक अशा पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते. कपाळावर सुंदर कुंतलाग्ने पडल्यामुळे ते मोहक दिसत होते. नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हसरे, स्वर मेघासारखे गंभीर, विशाल छाती आणि मोठे बाहू असलेल्या स्वराज्यसूर्याचा उदय झाला. महाराष्ट्रभूमी धन्य झाली.