जेव्हा बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी मराठे धावून गेले

छत्रसाल मराठ्यांच्या पराक्रमाविषयी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून जाणून होता व बाजीराव पेशव्यांच्या कर्तुत्वाबद्दलही त्यास माहित होते.

जेव्हा बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी मराठे धावून गेले
जेव्हा बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी मराठे धावून गेले

१७२८ साली मराठ्यांचा गुजरात व माळव्यात मुक्त संचार सुरु झाला आणि या प्रांतातून मुघलांची पीछेहाट सुरु झाली. मराठयांव्यतिरिक्त मुघलांचे दुसरे शत्रू म्हणजे बुंदेलखंडातील बुंदेले राजपूत. त्याकाळी दिल्लीच्या तख्तावर महंमदशाह होता व बुंदेलखंडाचे नेतृत्व छत्रसाल यांच्याकडे होते. छत्रसालांनी तरुण वयातच छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन बुंदेलखंडाचे राज्य मुघलांपासून आपल्या पराक्रमाच्या बळावर स्वतंत्र ठेवले होते त्यामुळे मोगलांसमोर मध्य भारतात  मराठे व राजपूत बुंदेले हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते.

छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली पेशवे बाजीराव बल्लाळ यांनी उत्तर भारतातील मुलुख स्वराज्यात घेणे सुरु केले होते त्यामुळे मोगलांना मराठ्यांच्या उत्तरेतील आव्हानास रोखण्याची खूप मोठी आवश्यकता निर्माण झाली होती.

मराठ्यांबरोबरच बुंदेले राजपुतांनी सुद्धा मोगल साम्राज्यातील बराचसा मुलुख ताब्यात घेतला होता त्यामुळे सर्वप्रथम बुदेल्यांचा समाचार घेऊन मग मराठ्यांकडे लक्ष देण्याचा विचार महंमदशाह याने केला आणि अलाहाबाद सुभ्याचा एक प्रबळ पठाण सरदार महंमदखान बंगश याच्यावर बुंदेल्यांचा समाचार घेण्याची जबाबदारी सोपवली. 

अलाहाबाद सुभा हा बुंदेलखंडास लागून होता व या सुभ्यातील काही प्रदेश बुंदेल्यानी ताब्यात घेतला होता याचा राग बंगश यास होताच त्यामुळे या मोहिमेचे नेतृत्व मिळतात बंगश तातडीने मोहिमेच्या तयारीस लागला. सुरुवातीस बुंदेलखंडावर मोर्चा नेऊन मग मराठ्यांच्या ताब्यातील माळव्यावर स्वारी करण्याचा विचार त्याने केला.

या मोहिमेच्या वेळी छत्रसाल ७९ वर्षाचा म्हणजे अत्यंत वयोवृद्ध झाला असून साहजिकच स्वतःहून युद्धभूमीत उतरून मोगलांचा प्रतिकार करण्यास असमर्थ झाला होता. छत्रसालास दोन पुत्र होते मात्र मोगल सत्तेशी दोन हात करण्याएवढा त्यांच्याकडे अनुभव नव्हता. त्यामुळे महंमदखान बंगशच्या आक्रमणाबद्दल समजून छत्रसाल फार चिंताग्रस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूचनेनुसार आपण मोगलांच्या ताब्यातून बुंदेलखंड सोडवून त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले तेच बुंदेलखंड परत मोगलांच्या हाती गेल्याचे पाहणे आपल्या वृद्धपकाळात आले आहे हा विचार करून छत्रसाल अतिशय दुःखी झाला.

दरम्यान बंगश याने आपल्या पठाण सैन्यासहित बुंदेलखंडावर स्वारी करून बुंदेल्यानी मोगलांचे जे मुलुख मिळवले होते ते झपाट्याने परत घेण्यास सुरुवात केली. हे मुलुख मिळवल्यावर संपूर्ण बुंदेलखंड सुद्धा मोगलांच्या ताब्यात जाण्यास वेळ लागणार नाही हे छत्रसालाच्या लक्षात आले व यावेळी त्याच्या डोळ्यासमोर एकच नाव उभे राहिले व ते म्हणजे बाजीराव पेशवे.

छत्रसाल मराठ्यांच्या पराक्रमाविषयी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून जाणून होता व बाजीराव पेशव्यांच्या कर्तुत्वाबद्दलही त्यास माहित होते. गुजरात व माळव्याचा प्रदेश बुंदेलखंडास लागून असल्याने मराठे हेच आपली मोगलांविरुद्ध मदत करू शकतील अशी खात्री छत्रसालाची होऊन त्याने अत्यंत वेगाने बुंदेलखंडी भाषेत शंभर दोह्यांचे एक काव्यरूप पत्र बाजीरावांना लिहिले.

जो गती ग्राह गजेंद्रकी सो गत भई है आज। बाजी जात बुंदेलकी राख बाजी लाज।

या पत्रात वरील ओळीत छत्रसालाने पौराणिक काळातील गजेंद्र मोक्षाच्या प्रसंगाची आठवण बाजीरावांस करून दिली व ज्याप्रकारे इंद्रद्युम्न नामक राजावर वृद्धपकाळात गजेंद्र होऊन वावरण्याची वेळ आली आणि त्याच्यावर पाण्यात एका (ग्राह) मगरीने हल्ला केला त्यावेळी गजेंद्रचा धावा ऐकून जसे विष्णू धावून आले तसाच वृद्धापकाळाने हतबल झालेल्या माझ्या मदतीस तू येऊन बुंदेलखंडाची रक्षा कर असा अर्थ या दोह्यांचा होता.

यावेळी बाजीराव पुण्यात असून शनिवार वाड्याचे बांधकामात व्यग्र होते मात्र छत्रसालाचे पत्र वाचून त्यांनी वेगाने बुंदेलखंडास जाण्याची तयारी केली आणि मल्हारराव होळकर, पिलाजी जाधवराव, विठ्ठल शिवदेव दाणी (विंचूरकर) असे एकूण मुख्य बारा सरदार आणि सत्तर हजाराची फौज घेऊन नर्मदा नदी ओलांडून बुंदेलखंड गाठले. बुंदेलखंडातील धामोरा येथे छत्रसालाने बाजीरावांची भेट घेतली आणि मराठी सैन्य व बुंदेले सैन्य घेऊन बाजीरावांनी बंगशच्या मोगल सैन्यावर चाल केली.

उभय सैन्याची १७२९ साली जैतपूर येथे गाठ पडली आणि दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. बंगश हा पराक्रमी होता मात्र मराठ्यांपुढे त्याची मात्रा चालेनाशी झाली आणि मराठ्यांच्या जोरामुळे मोगल सैन्य उधळले आणि पळापळ झाली. खुद्द बंगश हतबल होऊन पळून गेला. अशा प्रकारे पहिल्या लढाईत मराठ्यांची सरशी झाली. 

यानंतर अनेक दिवस हे युद्ध सुरु होते व मोगलांचे बळ हळूहळू कमी होऊ लागले होते. मोहिमेचे दिवस वाढल्याने मोगलांची रसद कमी पडू लागली व सैन्यास दाणापाणी मिळणे कठीण झाले त्यामुळे बंगश हतबल झाला. बंगशची पीछेहाट झाल्याची बातमी समजल्यावर त्याचा पुत्र कायमखान बंगश मदतीस धावून आला. बाजीरावांना ही बातमी समजल्यावर त्यांनी कायमखानावर जोरदार हल्ला केला आणि त्याच्या सैन्यास मराठ्यांनी मागे रेटले. या लढाईत कायमखानाच्या सैन्यातील हत्ती मराठ्यांच्या हाती लागले. पराभव झालेल्या कायमखानास पकडण्यासाठी मराठे धावून गेले मात्र कायमखान शंभर स्वारांसहित पळून गेला.

मराठे कायमखानाविरुद्ध लढाईत गुंतले असताना महंमदखान बंगश याने जैतपूरच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन तेथून मराठ्यांवर हल्ला करू लागला. जैतापूरचा किल्ला हा बळकट असून त्याची तटबंदीही मजबूत असल्याने थेट हल्ला करून किल्ला घेणे कठीण होते त्यामुळे मराठ्यांनी किल्ल्यास वेढा देऊन महंमद बंगशची रसद तोडली. हा वेढा काही महिने चालला आणि किल्ल्यातील मोगल सैन्याची उपासमार होऊ लागली. दाणागोटा संपल्याने मोगल सैन्यावर किल्ल्यातील प्राण्यांवर आपली गुजराण करून जीव वाचवणे भाग पडले मात्र काही काळाने हे सुद्धा कमी पडू लागल्याने मोगलांसमोर मोठा पेच निर्माण झाला.

दिल्लीहून काही रसद येईल अशी वाट पाहून थकल्याने एके दिवशी बंगश किल्ल्यातून गुप्तपणे फरार झाला आणि अशाप्रकारे जैतपूरचा किल्ला मराठ्यांच्या हाती लागलाआणि बुंदेलखंडावरील मोगली संकट मराठ्यांनी नाहीसे केले. छत्रसाल मराठ्यांच्या पराक्रमाने अत्यंत आनंदी झाला व त्याने बुंदेलखंडाची राजधानी पन्ना येथे बाजीरावांचा मोठा सत्कार केला आणि बुंदेलखंडातील झांशी आणि झांशीला लागून असलेला अडीच लाखांचा मुलुख भेट म्हणून दिला.

पुढे १७३१ साली छत्रसाल जेव्हा मरणासन्न अवस्थेत होता त्यावेळी आपण गेल्यावर मोगल पुन्हा आपल्या राज्यावर येऊ नये म्हणून बुंदेलखंडाच्या व तेथोल जनतेच्या रक्षणाची जबाबदारी बाजीरावांकडे सोपवली आणि "जसे हे माझे दोन पुत्र (जगतराज आणि हिरदेसा) तसेच तुम्ही तिसरे" असे सांगून बाजीरावांना बुंदेलखंडाचा तिसरा हिस्सा दिला व आपली उपकन्या मस्तानी बाजीरावांना दिली.