सरखेल कान्होजी आंग्रे - स्वराज्याच्या आरमाराचे विस्तारक
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व संभाजी महाराजांनी दिगंत केलेल्या बलाढ्य आरमाराचा विस्तार केला सरखेल कान्होजी आंग्रे यांनी.
आरमार म्हणजे येक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवल आरमार त्याचा समुद्र. या करितां आरमार अवस्यमेव करावे. आरमाराचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी या शब्दांत प्रतिपादित केले व हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना करून पश्चिमेकडील सत्तांवर वचक कायम केला. संभाजी महाराजांनी या आरमाराची कीर्ती दिगंत केली. सिद्दी, ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच या परकीय सत्ता मुळात समुद्रमार्गे भारतात दाखल झाल्या व पश्चिम किनाऱ्यावरील काही टापूंना आपले आश्रयस्थान करून हळू हळू हात पसरण्याचा प्रयत्न करू लागल्या मात्र शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या काळात त्यांच्यावर स्वराज्याच्या आरमाराचा कायम वाचक असे व मराठ्यांच्या परवानगीविना त्यांना एक जिन्नस देखील इकडून तिकडे नेता येत नसे.
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या व संभाजी महाराजांनी दिगंत केलेल्या बलाढ्य आरमाराचा विस्तार केला सरखेल कान्होजी आंग्रे यांनी. संभाजी महाराजांनंतर आरमाराची पकड सैल पडेल हा परकीय सत्तांचा गैरसमज धुळीस मिळवण्याचे काम कान्होजी यांनी केले इतकेच नव्हे तर परकीय सत्तांवर अशा पद्धतीने दहशत बसवली की ते असेपर्यंत परकीय सत्ता कायम धाकाखालीच समुद्री व्यापार करीत होत्या.
कान्होजी आंग्रे हे तुकोजी संकपाळ यांचे पुत्र. आंग्रे घराण्याचे मूळ आडनाव संकपाळ असून पुणे प्रांतात आंगरवाडी या गावचे असल्याने त्यांना आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. तुकोजी हे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत शके १५८० च्या सुमारास चाकरीस लागले. सुरुवातीस त्यांना २५ लोकांची सरदारी प्राप्त झाली मात्र आपल्या कर्तृत्वाने त्यांना सरनोबत हे पद मिळून कालांतराने २०० आसामी हाताखाली येऊन सुवर्णदुर्गाची जबाबदारी मिळाली.
कान्होजी आंग्रे यांचा जन्म कोकणातील याच सुवर्णदुर्गावर झाला. सुरुवातीस त्यांनी सुभेदार अचलोजी मोहिते यांच्या हाताखाली काम केले. अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली होती मात्र पुढे एक अशी घटना घडली ज्याने कान्होजी आंग्रे यांची कर्तबगारी अगदी संभाजी महाराजांच्या नजरेस पडली. त्या वेळी जंजिरेकर सिद्दीने सुवर्णदुर्गावर चढाई करून किल्ल्यास चहू बाजुंनी वेढा दिला. अशावेळी बाहेरील माणूस आत जाऊ शकत नव्हता व आतील माणूस बाहेर येऊ शकत नव्हता. त्यामुळे किल्ल्यावर अन्नपाण्याची टंचाई पडू लागली. यावेळी सुभेदार सिद्दीसोबत तह करण्याचा विचार करू लागले. ही गोष्ट कान्होजींना पटली नाही व त्यांनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घालून सुवर्णदुर्गाचा ताबा स्वतःकडे घेतला व किल्ल्यातून सैन्यासह सिद्दीवर चाल केली. यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत सुरुवातीस सिद्दीच्या तावडीत कान्होजी सापडले मात्र अटकेत असताना रात्री त्यांनी स्वतःची सुटका केली व पोहोत जाऊन ते सुवर्णदुर्गात परत दाखल झाले व परत एकदा प्रचंड शक्तीनिशी हल्ला करून त्यांनी सिद्दीचा वेढा तेथून उठवला. यानंतर सुवर्णदुर्गाची सुभेदारी कान्होजी यांच्याकडे आली.
पुढल्या काळात स्वराज्यावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला व संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत कान्होजी यांनी कोकणपट्टीत अनेक किल्ले मोगलांकडून घेतले. पुढे स्वराज्यावर अनिष्ट संकट कोसळून संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले. झुल्फीकारखानाने व सिद्दीने रायगडास वेढा घातला असताना राजाराम महाराज तेथून निसटून चंदावर प्रांती गेले यावेळी त्यांच्यासोबत स्वतः कान्होजी आंग्रे सुद्धा होते. रायगड किल्ल्याचा वेढा काही महिने चालल्यावर मुघलांनी शाहू महाराज व येसूबाई यांस कैद केले व कोकणपट्टी सिद्दीच्या ताब्यात दिली.
चंदावर प्रांतातून राजारामांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी स्वातंत्र्यलढा उभारला व मुघलांना जेरीस आणले कालांतराने राजाराम महाराज तेथून रांगण्यास दाखल झाले. आणि मुघलांच्या ताब्यात गेलेला मुलुख परत स्वराज्यात आणण्याच्या प्रयत्नांस लागले. कान्होजी आंग्रे यांच्याकडे तेव्हा कोकण प्रांत सोडवण्याची जबाबदारी दिली गेली. कोकणचे सुभेदार या नात्याने त्यांनी प्रथम विजयदुर्ग व सुवर्णदुर्ग हे किल्ले ताब्यात घेतले. पुढे राजाराम महाराजांचे निधन झाले व औरंगजेबही मृत्यू पावला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली.
या काळात स्वराज्यातील बहुतेक मुलुख ताराराणी यांनी मुघलांच्या ताब्यातून मिळवला व कोकण प्रांत आंग्रे यांनी सोडवला. विजयदुर्गास संस्थान करून त्यांनी सुवर्णदुर्ग व रत्नागिरी हे किल्ले घेतले. मात्र रायगड व जंजिरा किल्ला सिद्दीकडे, कर्नाळा व राजकोट मोगलांकडे तर रेवदंडा व वसई पोर्तुगीजांकडे राहिली. शाहू महाराज परत आल्यावर ताराराणी व शाहू महाराज यांच्यात थोडासा कलह निर्माण झाला. यावेळी कान्होजी आंग्रे यांनी कुलाब्याचे कारभारी भिवजी गुजर यांच्याकडून कुलाबा प्रांत घेतला व कुलाबा किल्ल्याची तटबंदी मजबूत केली. कर्नाळा प्रांतात माणिकगड किल्ला तयार केला. याशिवाय विकतगड, राजमाची, कोथळीगड, लोहगड व विसापूर हे किल्ले सुद्धा ताब्यात घेतले.
कालांतराने शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली व त्यांची व ताराबाईंची पन्हाळ्यास लढाई झाली व ताराराणींचा पराभव होऊन त्यांनी रांगण्यास आश्रय घेतला. यावेळी कान्होजी आंग्रे ताराराणींच्या पक्षात होते. कोकणावर कान्होजींचा अंमल असल्याने शाहू महाराजांनी आपले पेशवे बहिरोजी पिंगळे यांना कोकणात रवाना केले मात्र त्यांचा पराभव होऊन कान्होजी यांनी त्यांना अटक केले. पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना कान्होजींवर पाठवले. दोघांचाही जन्म कोकणातील असल्याने त्यांची लहानपणापासून ओळख होती. बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजींना शाहू महाराजांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.
ही बोलणी यशस्वी होऊन कान्होजींच्या ताब्यातील घाटावरील लोहगड विसापूर इत्यादी किल्ले शाहू महाराजांकडे येऊन कोकण प्रांत कान्होजींकडेच राहील असा ठराव संमत झाला व बहिरोजी पिंगळे यांची कान्होजी यांनी सुटका केली. यानंतर कान्होजी शाहू महाराजांच्या भेटीस गेले यावेळी शाहू महाराजांनी त्यांना विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा, विकटगड असे एकूण २७ किल्ले देऊन ३४ लाखांचा मुलुख, आरमाराचा सुभा व सरखेल हे पद दिले व बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिले.
कान्होजी आंग्रे यांना एकूण सहा पुत्र होते. त्यांची नावे अनुक्रमे सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसाजी व धोंडाजी अशी आहेत. सन १७२९ च्या दरम्यान कान्होजी यांचे निधन झाले. आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आरमाराचा प्रचंड विस्तार करून मराठ्यांची जरब शत्रूंवर बसवली. त्यामुळेच त्यांना मराठा आरमाराचे विस्तारक असेही म्हटले जाते.