चोलांची राजधानी – गंगैकोंडचोलपुरम

चोलांचा सम्राट राजराजा चोल याने तंजावर इथे अतिभव्य अशा बृहदीश्वर मंदिराची उभारणी केली. याचाच पराक्रमी मुलगा राजेंद्रचोल पहिला याने पुढे इ.स. १०२५ मधे, पाल राजावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गंगैकोंडचोलपुरम नावाचे नगर वसवले. पुढची जवळजवळ २५० वर्षे इथेच चोल राजवंशाची राजधानी होती.

चोलांची राजधानी – गंगैकोंडचोलपुरम

राजेंद्रचोलाने आपल्या विजयाप्रित्यर्थ आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत इथे एक बृहदीश्वर नावाचेच भव्य शिवमंदिर बांधले. हे मंदिर इ.स. १०३५ मध्ये पूर्णत्वाला गेले. अत्यंत देखणे, सुंदर आणि विविध शिल्पांनी युक्त असे हे मंदिर तंजावर पासून ७२ कि.मी. अंतरावर आहे. भव्य नंदी आणि त्याच्यासमोर उभे असलेले डौलदार शिवालय.

मंदिराचे शिखरसुद्धा निरनिराळ्या सुंदर मूर्तींनी नटलेले आहे. त्यातली गणपती, अग्नी यांच्या मूर्ती तर फारच सुंदर दिसतात. मंदिराच्या बाह्यांगावर नटराज, अर्धनारीश्वर, लिगोद्भव शिव, दक्षिणामूर्ती, अशा शिवाच्या विविध मूर्तींचे शिल्पांकन केलेले आहे. त्यातली सर्वात देखणी आणि सुंदर असलेली मूर्ती म्हणजे ‘चंदेशानुग्रह मूर्ती’. भगवान शिव, चंदेश या आपल्या शिष्यावर अनुग्रह करून आपल्या गळ्यातील फुलांचा हार त्याच्या डोक्याला गुंडाळत आहेत असे हे शिल्प.

अतिशय सुडौल, देखणे आणि अप्रतिम. चोल सम्राट राजेंद्र चोल स्वतःला या चंदेशाच्या जागी समजतो. आणि त्यानुसार शिव जणू आपल्यावरच कृपावर्षाव करत आहेत असे समजून हे शिल्प कोरले गेलेले आहे. या मंदिराचे स्थापत्य अगदी तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरासारखेच आहे. रमणीय परिसर, प्रशस्त आवार आणि त्यात उठावलेले हे खास द्राविड शैलीत बांधलेले मंदिर, भारतीय शिल्प आणि स्थापत्यकलेचा एक अनमोल दागिना म्हणावा लागेल.

- आशुतोष बापट