पर्यटनातून निसर्ग शिक्षण
मानव आणि निसर्ग यांचे एक अतूट असे नाते आहे. निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांच्या मिश्रणाने मानवी शरीराची निर्मिती झालेली आहे. त्यामुळेच 'माती असशी-मातीस मिळशी' अशी मानवी जीवनची इतिश्री मानली जाते. मानवी जीवन जगवायला आणि समृद्ध करायला निसर्ग विवीध अंगांनी मदत करत असतो.

माणसाची प्रगल्भता वाढायला 'केल्याने देशाटन्...पंडित मैत्री सभेत संचार' उपयोगी पडतात असे म्हणतात. निसर्गपर्यटन हा देशाटनाचाच एक भाग आहे. संतसाहित्यामध्येही निसर्ग हा मानवाचा सखा, सोयरा आहे आणि तो अनेक अंगांनी मानवी जीवन समृद्ध करत असतो. तो या निसर्गाच्या विरुद्ध गेला, निसर्गाचा कोप झाला तर मात्र या माणसाचे काहीही चालत नाही आणि या पृथ्वीतलावर माणसाचे स्थान किती दुय्यम आहे हे लक्षात येते. अशा या निसर्गाचा सर्वांगिण अभ्यास करण्यासाठी निसर्ग पर्यटन आवश्यक आहे. मग ते 'कैलास-मानस' सरोवर यात्रेच्या रुपाने, व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा आनंद लुटण्यासाठी किंवा विवेकानंद शीला स्मारकावर घटकाभर बसून स्वामींचे चिंतन करण्यासाठी असो, नेहमीच चैतन्यमय होते.
पर्यटनाचे महत्त्व
आदिमानव हा टोळ्यांनी आणि गुहेमध्ये राहत असे. हळूहळू त्याला निसर्गातील विविधतांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट होत गेला. आर्थिक, सांस्कृतीक प्रगतीबरोबरच निसर्गातील नव्या सत्यांचा शोध घेण्यासाठी तो स्थलांतरित होत राहिला. आधुनिक भाषेत त्यालाच पर्यटन म्हणतात. या पर्यटनामुळे त्या परिसरातील भौगोलिक स्थितीची आणि मानवी जीवनाची ओळख माणसाला होत गेली. यालाच निसर्ग शिक्षण म्हणतात येईल. भारतासारख्या खंडप्राय देशात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत निसर्गाची विविध रुपं माणसाला आकृष्ट करायला लागली आणि पर्यटनाचा विकास झाला. रोजच्या धकाधाकीतून विरंगुळा, त्याचबरोबर निसर्गाच्या विविध रुपांमधून मिळणारे ज्ञान आत्मसात करण असा दुहेरी उद्देश या निसर्ग पर्यटनाने साध्य झाला.
भारताचे भौगोलिक स्थान आणि अतिविशाल आकारामुळे सुदैवाने भारतातच निसर्गाचे वैविध्य माणसाला अनुभवायला मिळाले. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि जगातील इतर राष्ट्रांमधील निसर्गही माणसाला खुणावू लागला. अतिउष्ण प्रदेशापासून अति थंड प्रदेशापर्यंत, निष्पर्ण आणि वाळवंटी प्रदेशापासून सदाहरित प्रदेशापर्यंत, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशापासून पाण्याचा सुकाळ असलेल्या या प्रदेशात केलेल्या पर्यटनामुळे मानवी जीवनाचे विविध पैलू आपल्याला पहायला, अनुभवायला मिळतात. याचा व्यापारी अविष्कार म्हणजे 'पर्यटन संस्था' किंवा यात्रा कंपन्या. सरकारनेही ही लोकशिक्षणाची गरज ओळखून शासकीय पातळीवरच्या पर्यटन संस्था सुरु केल्या (एम.टी.डी.सी., के.टी.डी.सी., जी.टी.डी.सी. वैगेरे)
निसर्ग शिक्षण
निसर्ग या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे. एका अर्थाने निसर्ग आणि माणूस यांच्यामधील भेद अभिप्रेत असतो. दुसर्या अर्थाने निसर्ग म्हणजे जे काही आहे ते सर्व , ह्या सर्वांचा समुदाय किंवा व्यवस्था या अर्थाने पाहता निसर्ग म्हणजे विश्व ठरते. निसर्गापलीकडे काहीच असू शकत नाही हे एक तार्किक सत्य ठरते निसर्ग आणि निसर्गातील पदार्थ यांचे मिळून एक विश्व बनते असे म्हणतात आणि त्या सत्याचा शोध पर्यटनाने शक्य होतो. याबाबतीत आता समाजजागृती होऊन निसर्गमंडळे स्थापन झाली आहेत. ही मंडळे निसर्गसहली आयोजीत करतात. इनसर्च ज्येष्ट नागरिक मंडळातर्फे 'रेहकुर' अभयारण्य सहल ही एक खास योजना आहे. अशा संस्थांच्या / माध्यमांच्या मदतीने आपल्याला निसर्गनियमांची, निसर्गाच्या विविधतेची आणि निसर्गाने अनंत हस्ताने दिलेल्या देणगीची जाणीव होते आणि आपण निसर्गपूजा करायला शिकतो.
निसर्गपूजा
निसर्गातील विशिष्ट पदार्थ, घटना, अवस्था किंवा एकत्रितपणे समग्र निसर्ग यांची देवता मानून केलेली पूजा ही निसर्ग्पूजा होय, ती सर्व लोकांत आढळते. आदिम मानवाला आगळी अशी प्रत्येक निसर्गघटना देवता वाटे व तो तिच्यापुढे नम्र होई. भयापोटी अनेक देवता निर्माण होत. उषेसारख्या देवता विस्मयामुळे तर अग्नी, पृथ्वी, आप इ. देवता उपयुक्त म्हणून पूज्य ठरल्या. निसर्गाची निर्मिती व नियंत्रण करणार्या शक्तींच्या रुपाने वा पदार्थातील अधिष्ठात्या देवतेच्या रुपाने निसर्गदेवता मानल्या जात. पूर्वजांचे मृत आत्मे त्यात राहतात. निसर्ग देवता आहे. साधू वा एखाद्या पवित्र वस्तूशी त्याचा संबंध आहे अशा अनेक समजूती निसर्ग पूजेला प्रेरित करतात. मनातला हा भाव पूर्ण करण्यासाठी माणूस अनेक वेळा पर्यटनाला जातो. निसर्गाशी, आपले सगे, सोयरे, आप्तेष्ट, पूर्वजांचे आत्मे यांच्या सहवासात रहून संतुष्ट होतो. निसर्गातून मिळणारी प्रेरणा त्याला नवचैतन्य प्रदान करते आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाला तोंड द्यायला माणूस सिद्ध होतो.
निसर्गपूजेमागे वस्तुनिष्ठ दृष्टी असत नाही. श्रद्धा आणि कल्पना यांचेच प्राबल्य त्यात जास्त असते. निसर्ग पर्यटनात खर्च होणारा पैसा, श्रम, वेळ हा खर्च नसून भविष्यकाळासाठी केलेली गुंतवणूक आहे हे माणसाला पटले की तो निसर्गपर्यटनाला सिद्ध होतो. 'एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस' या उच्च अध्यात्मिक आनंदासाठी किरकोळ नैतिक सुखाचा त्याग करावा लागतो असे तुकोबा म्हणतात ही एक निसर्गपूजाच आहे.
निसर्गघटकांचे मानवीकरण होऊन त्यांच्याविषयी अनेक पुराणकथा, लोककथा व काव्ये निर्माण झाली. निसर्गपूजा हेच सर्व धर्मांचे मूळ रुप होय असे काही अभ्यासकांचे मत आहे. निसर्गपूजेचा देवकपूजा, पितृपूजा यांच्याशीही काही बाबतीत संबंध आहे. निसर्गाकडे जाणं म्हणजे सर्वभूतात्मैक्याकडे जाणं आहे. विश्वात्मकतेकडे जाणं आहे, आपल्या सर्वांना आणि सर्वांत आपल्याला पाहणं आहे या भावनेतून मानवाने निसर्गपूजा सुरु केली आणि प्रसंगी आपल्या इष्टदेवतांच्या पूजेसाठी पर्यटनही केले. त्यामुळेच भारतात ऋग्वेद काळापासून आजतागायत निसर्गपूजा मोठ्या प्रमाणात चालत आली आहे.
ऋग्वेदात इंद्र, अग्नी, सूर्य, वरुण, मरुत, सोम, पृथ्वी इ. निसर्गदेवताच होत्या. अजूनही भूमी-हिमालयादी पर्वत, गंगादी नद्या, सूर्य, चंद्र, शनी, मंगळादी ग्रह, देवांचे मत्स्यकुर्मादी अवतार व गरुडादी वाहने. तुळस, वड, पिंपळ, उंबर, गाय, बैल, हंस, नाग इत्यादी असंख्य निसर्ग पदार्थांची पूजा होते. या धार्मिकतेमधूनही चारधाम यात्रा, नर्मदा प्रदक्षिणा, हिमालय भ्रमण सारख्या निसर्ग पर्यटनाची योजना मानवाने केली. वृत्र, राक्षस इ. दुष्ट शक्तींची आणि नदीचा भोवरा, डोह, गावाची शीव इत्यादी ठिकाणच्य देवतांचीही पूजा होते. विशिष्ट दगड, खडक, स्वयंभू आकृती इत्यादींचीही पूजा होते. बायबलच्या 'जुन्या करारात' मेघगर्जना हा देवाचा आवाज, प्रकाश हे त्याचे दूत मानले गेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या मते देव आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला आदेश देतो असे मानले जाते. पृथ्वी, जल, अग्नी इ. महाभूतांचे मानवीकरण न करता त्यांची पूजा करण्याची पद्धत पारसी लोकांमध्ये आहे. अशा प्रकारे सर्व धर्म-वंश-जातीच्या आणि पंथाच्या लोकांमध्ये निसर्ग ही देवता मानून, त्याला भक्तीभावाने पूजण्याची आणि त्याचे आशीर्वाद घेण्याची वेगवेगळी पद्धत आहे. सर्व धर्मांनी आणि मानव जातीने अशा प्रकारे निसर्गपूजा मान्य केली आहे. अर्थातच त्यासाठी पर्यटन आले आणि शिक्षणही मिळाले.
निसर्गपर्यटन आणि निसर्गशिक्षणाला बराचसा धार्मिकतेचा मुलामा आपल्या पूर्वजांनी दिला असला तरी या सगळ्यामागे मूळ हेतू निसर्गरक्षण, पर्यावरण संरक्षण आणि वातावरणाचे संतुलन राखण्याचा आहे.
सारांश
निसर्ग ही परमेश्वरी प्रयोगशाळा आहे. असं म्हणतात की परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना आधी गोड्या पाण्यापासून खारे पाणी वेगळे केले, जमीन कोरडी केली, एक बाग म्हणजे वनस्पतींची निर्मिती केली. प्राणि आणि माशांची निर्मिती केली आणि सर्वात शेवटी माणसाची निर्मिती केली. याचाच अर्थ मानवी जीवनाला आवश्यक सर्व गोष्टी निर्माण करुन मगच परमेश्वराने त्या निसर्गाचा वापर आणि संवर्धन करण्यासाठी मानवाला निर्माण केले. अशा निसर्गाशी मैत्री करुयात! निसर्गपर्यटन धर्माधिष्ठीत असण्यापेक्षा कर्माधिष्टीत असेल तर निसर्गात दडलेल्या खजिन्याचा मानवाच्या प्रगतीसाठी नक्कीच उपयोग होईल. पर्यटनासाठी प्रवासाचं नुसतं तिकिट काढल तर फक्त देहाचा प्रवास होईल, पण संवेदन, संशोधक वृत्ती आणि उत्सुकता जागी ठेवली तर संवेदनांचा प्रवास होईल. मनात एक इवलासा टिपकागद ठेवला तर तो नेहमी आतूर असतो टिपायला, नव्या गोष्टी शिकायला, ज्याच्याकडे हा उस्तुकतेचा टिपकागद आहे त्याल नव्या भूमीचा नवा रंग, मातीचा सुवास आणि निसर्गाची विविधता वेड लावेल. मग त्यांना निसर्गाच्या सानिध्यातली कोणताही क्षण, कुठलाही परिसर रटाळ वाटत नाही. कारण..
जाणू सृष्टी, करु निसर्गाशी मैत्री!
आरोग्य, जीवन आणि सुखी जीवनाची ही खात्री!
सगळे जागू या वचनाला!
जाऊ निसर्ग पर्यटनाला!
- डॉ. प्रमोद जोगदेव
७२०/१८, नवी पेठ, पुणे ४११ ०३०
९९६०१४५४४५