मराठ्यांकडून चितोडगड काबीज

मराठे उत्तर भारतात राज्य करीत असताना मारवाड प्रांतात जी बंडाळी झाली तिचा बिमोड करून मराठ्यांनी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेला राजपुतांचा पराभव ही इतिहासातील खूप मोठी घटना मानली जाते.

मराठ्यांकडून चितोडगड काबीज
मराठ्यांकडून चितोडगड काबीज

मराठा साम्राज्यात एकेकाळी भारताचा खूप मोठा भूभाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन साम्राज्याच्या शिलेदारांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा उत्कर्ष सर्वोच्च बिंदूपर्यंत नेला होता. मराठे उत्तर भारतात राज्य करीत असताना मारवाड प्रांतात जी बंडाळी झाली तिचा बिमोड करून मराठ्यांनी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेला राजपुतांचा पराभव ही इतिहासातील खूप मोठी घटना मानली जाते.

१७८९ साली मराठा साम्राज्यातर्फे उत्तर हिंदचा कारभार पाहणारे महादजी शिंदे आजारी पडले, याच काळात गोसावी प्रकरण उत्पन्न झाले. या प्रकरणाचा निकाल लावण्यात उत्तर भारतातील मराठी सैन्याची शक्ती बरीच खर्ची पडली. महादजी शिंदे यांना अंतर्गत राजकारणासहित बाहेरील शत्रूंकडेही लक्ष ठेवणे भाग पडत होते. जयपूर, जोधपूर येथील राजे आणि इस्माईल बेग हे उत्तरेतील शत्रू महादजी शिंदे यांच्याविरोधात होते.

याकाळात महादजी, तुकोजी होळकर आणि अलिबहादूर यांच्यात थोडा बेबनाव सुरु होता. याचा फायदा घेऊन जयपूरच्या राजपुतांनी या दुहीचा फायदा घेऊन मराठयांचे वर्चस्व झुगारून देण्याचा कट केला. महादजी शिंदे यांच्या लष्करातील कपड्याचे व्यापारी (बजाज) आणि सराफ जयपूर मारवाडातील होते. यांना फोडून महादजींसोबत दगा करण्याचा डाव करून त्यांच्यावर जयपूरच्या राजपुतांनी मारेकरी घातले. मात्र हा कट फसला, कटात गोहदच्या राण्याकडील मोरामल नावाचा माणूस असल्याचे उघडकीस आले व यानंतर महादजींनी जयपूरच्या राजांकडून दरसाल १५ लाख खंडणीचा ठराव करून घेतला.

अलिबहादूर आणि तुकोजी होळकर जयपूर हद्दीवर असताना महादजी बावांनी जयपूरचे प्रकरण संपवले आणि दुराणी बादशाह तैमूरशहाशी समेट केला. जेणेकरून अफगाण आक्रमणाची चिंता कमी झाली. कोटा, जयपूर आणि मारवाड या राजपूत राज्यांनी महादजी यांच्या विरोधात आघाडी उभारली मात्र याची चाहूल महादजींना लागली आणि त्यांनी राजपुतांचा समाचार घेण्याचे ठरवले. राजपुतांना इस्माईल बेगचा पाठिंबा होता. त्यामुळे इस्माईल बेगची वासलात लावणेही गरजेचे होते.

परस्परातील वाद सोडण्यापूर्वी इस्माईल बेगसारख्या शत्रूचा नाश करणे महत्वाचे समजून महादजींनी तुकोजीरावांना इस्माईल बेगचा समाचार घेण्यास सांगितले. मुनीमकशर येथील इस्माईल बेगचे ठाणे तुकोजी होळकरांनी उठवले,याची तक्रार इस्माईल बेगने महादजींकडे केली. मात्र महादजींनी ऐकले नाही, त्यामुळे इस्माईल बेगने स्वतः हल्ला करून ठाणे उठवले त्यामुळे खुश होऊन जयपूर व जोधपूरच्या राजांनी इस्माईल बेगचा सन्मान केला.

महादजींनी याचा जाब विचारल्यावर इस्माईल बेगने माझी राजपुतांसोबत युती झाल्याने आता आम्ही तुमच्याशी युद्ध करू असे सांगितले ते पाहून महादजींनी आपले सैन्य इस्माईलवर पाठवले. यावेळी इस्माईल बेग व जयपूर आणि जोधपूरचे सैन्य जयपूरच्या ५० मैल उत्तरेस पाटण येथे आश्रय घेऊन राहिले. यानंतर मराठी फौजेने डोंगराच्या आत घुसून हल्ला केला चारही बाजूने शत्रूस घेरून त्यांना पळवून लावले.

यानंतर राजपुतांचा निकाल लावणे गरजेचे आहे असे समजून महादजी स्वतः १७९० मध्ये मोहिमेत उतरले. महादजी यांचे सैन्यातील गोपाळराव रघुनाथ, जीवबा बक्षी, काशीराव होळकर यांनी जोधपूरचा बराच मुलुख काबीज केला. १५ ऑगस्ट ला मराठ्यांनी अजमेर ताब्यात घेतले. मराठी सैन्याचा तोफखाना अधिकारी डी बॉयनने खूप चांगली कामगिरी बजावल्याने तोफखान्यापुढे चार हजार राजपूत ठार झाले. मारवाड्यांचा या युद्धात मोठा पराभव झाला.

अजमेरनंतर पुष्कर तीर्थ महादजींनी ताब्यात घेतले. उदेपूरच्या राज्यात होळकरांचा अमल होता. मात्र येथील कारभारी भीमसिंग याने महादजी आणि होळकर यांचे महालात उपद्रव करून ठाणी उठवून लावली. उदेपूरचा राणा एक लहान मुलं असल्याने कारभार भीमसिंग पाहत होता. भीमसिंगने चितोड किल्ला आपले आश्रयस्थान केले व त्याने मराठ्यांना खंडणी पाठवणे बंद केले. मराठ्यांनी मग चितोडच्या ६ मैल अंतरावर छावणी करून चितोडकडे खंडणी मागितली असता चितोडहून उत्तर आले की आमच्याकडे दारुगोळा आहे, प्रांतातील पैसे तुम्ही घेतले तेव्हा आता बऱ्या बोलाने परत जावे. हे पाहून महादजींनी साम, दाम, दंड व भेद आदी नीतींचा वापर करून राण्यास भेटीस बोलावून चितोडचा मुलुख महादजींनी घेतला. मुलुख आला असला तरी किल्ला राण्याकडे होता. यामुळे महादजी यांनी चितोड किल्ल्याजवळ दोन कोस अंतरावर गडाला मोर्चे लावल्याने १७ नोव्हेंबर मध्ये किल्ला मराठ्यांचे ताब्यात आला.

राजपुतांना नामोहरम केल्यावर इस्माईल बेग हा शेवटचा शत्रू उरला होता. राजपुतांच्या पराभवानंतर इस्माईल बेग फरार झाला होता व लपून छापून फिरत होता. इस्माईल बेग सोबत नजफकुली खान हा सरदार सुद्धा फरार होता. १७९० मध्ये नजफकुली खान मरण पावला. इस्माईल बेगने कनोड प्रांत घेऊन तो विजेसिंग यास मिळाला आणि दोघांनी मिळून मराठ्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. पुढे विजेसिंग आणि मराठ्यांचा तह झाला तेव्हा इस्माईल बेग गुजरातला निघून गेला. येथे गायकवाडांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केल्याने तो कनोड येथे नजफकुली खान याची पत्नी होती तिच्याकडे आश्रयास गेला. खंडेराव हरी यांना ही बातमी मिळताच त्यांनी कनोडवर तोफा डागल्या. या हल्लयात कनोड पडले आणि इस्माईल बेग मराठ्यांच्या हाती लागला. कैदेत असतानाच आग्रा येथे १७९९ मध्ये त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे मारवाड प्रांतातल्या राजपूत आणि इस्माईल बेग सारख्या शत्रूंना कायमचे नामोहरम करून मराठ्यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.