सरनोबत नेतोजी पालकर

सरनोबत माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी त्यांचे सरनोबत हे पद नेतोजी यांना दिले. १६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचे सरनोबत केले.

सरनोबत नेतोजी पालकर
सरनोबत नेतोजी पालकर

शिवकाळात ज्यांस प्रतिशिवाजी अशी उपमा मिळाली ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेतोजी पालकर. नेतोजी पालकर यांचे मूलस्थान कुठले याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. काहींच्या मते ते रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील चौक येथील होते तर काहींच्या मते ते सातारा जिल्ह्यातील खंडोबाच्या पाली येथील होते. 

सरनोबत माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी त्यांचे सरनोबत हे पद नेतोजी यांना दिले. १६५५ साली महाराजांनी नेताजी पालकर यांना गडाचे सरनोबत केले. नेतोजी पालकरांचा मुख्य गुण म्हणजे त्यांची नेतृत्वक्षमता. ठिकठिकाणच्या शिलेदारांवर त्यांचे चांगलेच वजन होते. याशिवाय गनिमीकावा या तंत्राचा वापर करण्यात नेतोजी तरबेज होते.

१६५९ साली अफजलखानचा वध झाल्यावर नेतोजी अफजलखानाच्या सैन्यावर तुटून पडले होते व त्यांची खूप कत्तल केली. आदिलशाह व मोगलांच्या मुलुखात थेट घुसून मोहीम यशस्वी करून पावसाळा सुरु होण्यापूर्वी स्वराज्यात दाखल होण्याची कला नेतोजी यांच्याकडे होती. एका प्रसंगी मोगलांनी त्यांचा पाठलाग केला असता एकदा दिवसात ५० मैल मजल नेतोजींनी मारली होती यावरून त्यांच्या चपळ हालचालींचा अंदाज येतो. 

अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी आदिलशाहीप्रदेश स्वराज्यात घेण्याचा धडाका सुरु केला त्यावेळी नेतोजी पालकर यांनी विजापूरकरांचा बराच प्रदेश उध्वस्त करून रायबाग लुटून महाराजांची पन्हाळ्यास भेट घेतली. पन्हाळा पुन्हा घेण्यासाठी आदिलशहाने फाजलखान आणि रुस्तुमे जमान यास धाडले त्यावेळी सुद्धा नेतोजी पालकर यांच्या आघाताने फाजलखानास पळ काढावा लागला होता. 

आदिलशाही साम्राज्यावर आघात करताना नेतोजी यांनी मुक्तपणे आपले कार्य करावे यासाठी शिवाजी महाराजांनी मिरजेचा वेढा आपल्याकडे घेतला आणि नेतोजींना मोकळे केले. यानंतर नेतोजींनी कवठे, बोरगाव, मालगाव, कुंडल, धोगाव, सत्तीकिर, आड, मिरज, गोकाक, दोंदवाड, मुरवाड, धारवाड गढी, क्षुर्द्रवंद्यपुर, सांगावं, मामील, पारगाव, सांगली, कणाद, कुरुंदवाड, कागल, हेवाळ, हनुवल्ली, हुनवाड, रायबाग, हुकेरी, कांडगाव, हळदी, घाणिक, किणी, आरग, तेलसंग, केरूर, अम्बुप, कमलापूर, अथणी, तिकोटे इत्यादी विस्तृत प्रदेश जिंकून आदिलशाही ठाणी उध्वस्त केली.

पन्हाळ्यास नंतर सिद्दी जौहरचा वेढा बसला आणि शिवाजी महाराज आत अडकून पडले. नेताजी यावेळी आदिलशाह विरोधातील मोहिमेत होते. या मोहिमेत त्यांना पन्हाळ्यास वेढा पडल्याची बातमी मिळाली. यावेळी नेतोजींनी विचार केला की आपण जर थेट विजापूरवर हल्ला केला तर केंद्रस्थानावरील संकट पाहून पन्हाळ्याचा वेढा ढिला पडेल. नेतोजींनी गदग वरून विजापूरचा मार्ग पकडला. विजापूरजवळील शहापूर येथे स्वारी करून त्यांनी तो मुलुख मारला. विजापूरवर आलेले नेतोजी नावाचे संकट पाहून आदिलशहाने खवासखानास नेतोजींवर धाडले. यापूर्वीच नेतोजींच्या सैन्याची बरीचशी शक्ती आदिलशाही मुलुख मारण्यात खर्ची झाली होती यावेळी खवासखानाचे ताज्या दमाचे सैन्य एकदम चाल करून आल्यास आत्मनाश करण्यासारखे आहे असा विचार करून नेतोजींनी माघार घेतली.

यावेळी पन्हाळ्यास येण्याचा महाराजांचा गुप्त संदेश नेतोजींना मिळाला.  'तुम्ही लष्कर घेऊन उपराळ्यास येणे आणि सिद्दी जोर मारून चालवणे'

पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी नेतोजी राजगडावर गेले व त्यांनी जिजामातांची भेट घेतली. यावेळी नेतोजींच्या सोबत सिद्दी हिलाल होता. राजमाता यावेळी स्वतःच पन्हाळ्यावर चाल करून जाण्याच्या तयारीत होत्या. नेतोजींना पाहताच राजमातांची नाराजी त्यांच्यावर प्रकट झाली. नेतोजींनी राजमातांचे समाधान केले आणि सिद्दी हिलाल यास सोबत घेऊन ते पन्हाळ्यास गेले.

सिद्दी जौहरला नेतोजी चालून येत असल्याची बातमी समजली व त्याने एक सैन्य दल नेतोजींना अडवण्यास दूरवर पाठवून दिले. महाराजांचे पन्हाळ्यावरुन दूरवर सुरू असलेल्या नेतोजी व सिद्दी जौहरच्या सैन्याच्या युद्धावर लक्ष होते. या युद्धात नेतोजी विजय प्राप्त करून त्वरित पन्हाळ्यास येतील असा विश्वास महाराजांना होता मात्र दुर्दैवाने सिद्दी हिलाल याचा पुत्र सिद्दी वाहवाह याच्यावर आघात होऊन तो घोड्यावरून खाली कोसळला. सिद्दी हिलालने प्रयत्न करूनही सिद्दी जौहरच्या सैन्याने जखमी वाहवाहला आपल्या छावणीत नेले. हे पाहून सिद्दी हिलालचे सैन्य पळू लागले. सैन्यात पळापळ सुरु झाल्यावर नेतोजींसोबतचे सैन्यही बिथरले व माघार घेऊ लागले आणि नाईलाजास्तव नेतोजींना माघार घ्यावी लागली.

१६६६ साली महाराजांनी पन्हाळ्यावर पुन्हा एकदा स्वारी केली. यावेळी त्यांनी सेनापती नेतोजी पालकर यांना मागून आपल्या सैन्यास मिळण्यास सांगितले. पन्हाळ्यात सैन्य बेसावध असेल असा महाराजांचा अंदाज होता मात्र आतील सैन्यास खबर लागली होती व त्यांनी जोरदार प्रतिकार केल्याने स्वराज्याच्या अनेक सैनिकांना प्राणास मुकावे लागले. यावेळी नेतोजी पालकर यांना येण्यास उशीर झाल्याने महाराजांना माघार घ्यावी लागली. या प्रसंगानंतर महाराजांची नेतोजींवर नाराजी झाली आणि त्यांचे पद काढून घेण्यात आले.

या प्रसंगानंतर नेतोजी अतिशय दुःखी झाले व कालांतराने त्यांनी आदिलशहाचा पक्ष स्वीकारला. याकाळात मिर्झाराजा जयसिंग दक्षिणेच्या मोहिमेवरच होता. नेतोजी पालकर यांचे आदिलशहास जाऊन मिळणे मोगलांसाठी धोक्याचे होते. मग जयसिंगाने नेतोजींना अडीच हजारांचे वतन देऊन पंचहजारी मनसबदार हे पद देऊन मोगलांकडे आणले. मात्र औरंगजेबाचा नेतोजी यांच्यावर संशय कायम होता. नेतोजी हे गुप्तपणे शिवरायांना सहकार्य करीत आहेत असे त्यास वाटून त्याने नेतोजी यांना कैद करण्याचा हुकूम जयसिंगास दिला. जयसिंगाने नाईलाजास्तव एका बेसावध क्षणी नेतोजी व त्यांचे काका कोंडाजी पालकर यांना अटक करवून दिलेरखानासोबत आग्ऱ्यास पाठवून दिले. औरंगजेबाने नेतोजी दिल्लीत पोहोचल्यावर त्यांना फ़िदायिन खानाच्या ताब्यात देऊन त्यांचा भयंकर छळ चालवला. या छळातून व मृत्यूपासून मुक्तता हवी असेल तर धर्मांतर हाच एक पर्याय शिल्लक आहे असे त्यांना सांगण्यात आले. नाईलाजास्तव नेतोजींना धर्मांतर करावे लागले. यावेळी त्यांना मुर्शिद हा किताब देण्यात येऊन मुहम्मद कुलीखान असे नवे नाव देण्यात आले. याशिवाय औरंगजेबाने त्यांना पंचहजारी मनसबदार केले व त्यांना पुन्हा महाराष्ट्रात न पाठवता महाताब खान याच्यासोबत काबूलच्या स्वारीवर पाठवले. 

मात्र शेवटी ज्याचे मूळ स्वराज्यात आहे तो शेवटी स्वराज्याकडेच परत येणार. नऊ वर्षांनी नेतोजी पुन्हा एकदा मोगलांकडून स्वराज्यात आले व महाराजांना भेटले. महाराजांनीही त्यांचे स्वागत केले. महाराजांनी १६७६ साली नेतोजी यांना पुन्हा एकदा हिंदू धर्मात घेतले.

शिवाजी महाराजांनंतर नेतोजी हे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही कार्यरत असल्याचे उल्लेख मिळतात. १६८१ सालच्या बागलाण येथील लढाईत नेतोजी यांनी चांगला पराक्रम गाजवला. कालांतराने वृद्धापकाळाने नेतोजी यांचे निधन झाले. स्वराज्याचे शूर व कर्तृत्ववान सेनानी मात्र दुर्दैवाने काही वाईट प्रसंग आयुष्यात पाहावे लागणारे हिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेतोजी पालकर यांचे योगदान इतिहासात ठळक अक्षरांत लिहिले गेले आहे.