उमाबाई दाभाडे - स्वराज्याच्या पहिल्या महिला सेनापती

मराठी साम्राज्याच्या महिला सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांना ओळखले जाते. उमाबाई या खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी.

उमाबाई दाभाडे - स्वराज्याच्या पहिल्या महिला सेनापती
चित्रकार - प्रमोद मोर्ती

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

तळेगाव चे दाभाडे हे घराणे इतिहासकाळापासून सेनापतींचे घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. सेनापती खंडेराव यांना पाटील, सरपाटील, देशमुख, राज देशमुख अशी बिरुदे होती व सेनापती पदाशिवाय सरदेशमुख, सरदेशकुलकर्णी, अठरा कारखान्यांचे हवालदार, अधिकारी, देसाई, देशमुख, इनामदार, मोकासदार, सेनाखासखेल असे इतर अधिकार त्यांच्याकडे होते.

एका शिलालेखात खंडेराव यांचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.  'नुसते सेनापती म्हटले म्हणजे खंडेराव दाभाडे हे नाव घेतल्याचाच कार्यभाग होतो. '

यावरून तळेगाव चे दाभाडे हे घराणे किती मातब्बर होते हे लक्षात येते. अशा या शूर सेनापतीची शूर पत्नी म्हणजे उमाबाई दाभाडे. 

उमाबाई या अभोणेकर देवराम ठोके यांच्या कन्या. अभोणे हे गाव नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतात येते. ठोके घराणे अतिशय घरंदाज घराणे असल्याने लहान वयातच उमाबाई यांना राजकारण, लष्कर, घोड्यावर बसणे, तलवार चालवणे इत्यादी शिक्षण प्राप्त झाले.

खंडेराव व उमाबाई यांना एकूण सहा अपत्ये होती त्यापैकी तीन कन्या शहाबाई, आनंदीबाई व दुर्गाबाई तर तीन पुत्र त्रिंबकराव, यशवंतराव व बाबुराव हे होते.

१७२९ साली खंडेराव यांचा मृत्यू झाला व शाहू महाराजांनी त्यांचे पुत्र त्रिंबकराव दाभाडे यांना सेनापतिपद बहाल केले. त्यावेळी त्रिंबकराव यांना गुजरातच्या मुलूखगिरीची व बाजीराव पेशवे यांना माळव्याच्या मुलूखगिरीची जबाबदारी शाहू महाराजांनी दिली होती मात्र बाजीराव त्रिंबकराव यांच्याकडे निम्मा गुजरात मागून माळव्यातील जे काही ते सर करतील त्यातील निम्मा भाग तुम्हास देऊ अशी मागणी करू लागले ज्यास त्रिंबकरावांनी विरोध केला. या वादामुळे पुढे उद्भवलेल्या बाजीराव पेशवे व त्रिंबकराव यांच्या मधील डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले. 

एकुलत्या एक पुत्राच्या वियोगामुळे उमाबाई दाभाडे बाजीराव पेशवे यांच्यावर अतिशय संतप्त झाल्या त्यामुळे खुद्द शाहू महाराजांना या प्रकरणात मध्यस्ती करावी लागली आणि बाजीरावांना उमाबाई यांची माफी मागायला लावून हा वाद शांत केला.

यानंतर उमाबाई दाभाडे यांनी स्वतः सेनापतिपदाचा स्वीकार करून गुजरात प्रांताचा कारभार आपल्या हाती घेतला व अनेक वर्षे गुजरातचा कारभार उत्तम रित्या चालविला.

त्रिंबकराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने मुघलांच्या मदतीने गुजरातवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यासाठी अभयसिंग याने प्रथम बडोदा हस्तगत करून डभई प्रांतास वेढा घातला. या युद्धात उमाबाई यांचे सरदार पिलाजी गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने आता उमाबाई यांची ताकद कमी पडेल अशी खात्री अभयसिंगास वाटली मात्र लहानपणापासूनच क्षत्रियत्वाचे शिक्षण घेतलेल्या उमाबाई स्वतः युद्धात उतरून त्यांनी थेट अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाई यांचा पराक्रम पाहून अभयसिंग यास गुजरातमधून पलायन करावे लागले.

बडोदा व डभई प्रांत जरी ताब्यात आला असला तरी अहमदाबाद येथील मुघलांचे ठाणे अस्तित्वात होते त्यामुळे उमाबाईंनी पुन्हा एकदा गुजरावरील दुसरी स्वारी केली यावेळी अहमदाबाद येथील मुघलांचा सरदार जोरावरखान बाबी याने उमाबाई यांना पत्र लिहून 'एक विधवा माझ्याशी काय लढणार? तुमचा निभाव लागणार नाही' अशी वल्गना केली. 

या पत्रास उमाबाईंनी रणांगणात शौर्य गाजवूनच उत्तर दिले. उमाबाईंच्या सैन्याने अहमदाबादवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्याने मुघल सैन्य एवढे बिथरले की खुद्द सरदार जोरावरखान तटात जाऊन लपला. यानंतर मराठ्यांनी मोगलांचे मृतदेह एकावर एक रचून तटावर जाण्याचा मार्ग तयार करून किल्ल्यात प्रवेश केला व अहमदाबाद ताब्यात घेतले.

सेनापती उमाबाई दाभाडे यांनी स्वतः मोहिमेत भाग घेऊन गुजरात सर केल्याने स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाई यांचा खूप मोठा सन्मान करून त्यांच्या चरणात सोन्याचे तोडे घातले होते. छत्रपती शाहू महाराज व दाभाडे घराणे यांच्या मनात जरी एकमेकांविषयी पूज्य भाव होता मात्र सुरुवातीपासूनच दाभाडे व पेशवे घराण्याचे संबंध तेवढे बरे नव्हते व पुढील काळात या संबंधातील तणाव वाढतच गेला.

बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे यांच्यापासून पेशवे व दाभाडे घराण्यात सुरु झालेला वैरभाव पुढेही कायम राहून १७५० साली नानासाहेब पेशवे यांनी सेनापती उमाबाई यांच्यावर निजामाशी संगनमत केल्याचा आरोप लावून त्यांच्याकडून गुजरात प्रांत काढून घेतला.

या अन्यायामुळे उमाबाई नाराज होऊन ताराराणी यांना जाऊन मिळाल्या. १७५० साली उमाबाईंनी पेशव्यांसोबत बोलणी करण्यासाठी आपला वकील तिथे पाठवला मात्र त्याने काहीच उपयोग झाला नाही म्हणून स्वतः उमाबाई यांनी पेशव्यांची भेट आळंदी येथे घेतली मात्र तरीही काही उपयोग न झाल्याने उमाबाईंनी दमाजी गायकवाड यांना पेशव्यांवर पाठवले, दुर्दैवाने दामाजी गायकवाड यांचा युद्धात पराभव झाला व नाईलाजास्तव ३० एप्रिल १७५१ साली वेणेचा तह होऊन उमाबाई यांना गुजरात पेशव्यांच्या स्वाधीन करावा लागला.

१७५१ साली पेशव्यांनी उमाबाई दाभाडे व कुटुंबियांना कैद करून होळकरांच्या वाड्यात ठेवले. यानंतर त्यांना सिंहगडावर नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेत असताना उमाबाई यांचे पुत्र यशवंतराव व नातू त्रिंबकराव यांनी आपली सुटका करून घेतली त्यामुळे १७५२ साली उमाबाई यांना पुण्यास कैदेत ठेवण्यात आले. 

५ एप्रिल १७५२ साली पेशवे व दाभाडे यांच्यात अखेरचा तह झाला ज्यानुसार गायकवाड पूर्वीप्रमाणे दाभाडे यांची चाकरी करतील. दाभाडे यांनी राज्यात बखेडा करू नये व छत्रपती रामराजे यांना अनुकूल होऊ नये, शाहू महाराजांच्या राजमंडळाचे प्रधान असलेल्या पेशव्यांना अनुकूल राहावे. याशिवाय दाभाडे यांना दर महिन्यास ५०००० रुपये मिळतील व पूर्वीचे मोकासे दाभाडे यांच्याकडेच चालू राहतील अशी तहाची कलमे होती. यानंतर पेशव्यांनी उमाबाई यांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना सन्मानाने परत केला यानंतर पेशवे व दाभाडे संबंध पुन्हा एकदा सुधारले.

१७५३ साली उमाबाई यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचाराकरिता मुठा नदीच्या किनाऱ्यावरील नडगेमोडी येथे नेऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले येथेच १८ नोव्हेंबर १७५३ साली उमाबाई यांची प्राणज्योत मालवली. उमाबाई यांच्या अस्थिकलशाचे त्यांचे पुत्र यशवंतराव दाभाडे यांनी तळेगाव येथील इंद्रायणी नदीच्या काठी पूजन करून तेथील बनेश्वर या पुरातन शिवमंदिराजवळ उमाबाई यांची समाधी उभारली.

इतिहासातील राजकारणात थेट सक्रिय असणाऱ्या महिलांमध्ये सेनापती उमाबाई दाभाडे यांचे नाव आदराने घेतले जाते. मराठ्यांचा गुजरातमध्ये वचक कायम ठेवण्याचे काम उमाबाई यांनी केले. पती खंडेराव व ज्येष्ठ पुत्र त्रिंबकराव यांच्या निधनानंतर सेनापतिपदाची अत्यंत कठीण अशी जबाबदारी हाती घेऊन ती यशस्वीपणे निभावण्याची कामगिरी उमाबाई यांनी करून दाखवली. दुर्दैवाने पेशवे व दाभाडे यांच्यातील वैरभावामुळे उमाबाईंच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाचे दिवस सत्कारणी लागले नाहीत अन्यथा उमाबाईंच्या पराक्रमात आणखी विजयांची निश्चितच भर पडली असती.