शिवरायांच्या तलवारी - रहस्य कधी उलगडणार?

भवानी तलवारीशिवाय महाराजांच्या खाजगी शस्त्रागारात आणखी दोन तलवारी होत्या ज्यांची नावे तुळजा व जगदंबा अशी होती. या तलवारींबद्दलही फार कमी लिखाण झाले आहे.

शिवरायांच्या तलवारी - रहस्य कधी उलगडणार?
शिवरायांच्या तलवारी - रहस्य कधी उलगडणार?

छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत प्रिय असलेली भवानी तलवार त्यांना केव्हा व कशी प्राप्त झाली हे आपण आपल्या 'भवानी तलवारीचे रहस्य' या लेखात जाणून घेतले.

भवानी तलवारीशिवाय महाराजांच्या खाजगी शस्त्रागारात आणखी दोन तलवारी होत्या ज्यांची नावे तुळजा व जगदंबा अशी होती. या तलवारींबद्दलही फार कमी लिखाण झाले आहे. खरं तर भवानी तलवारी इतक्याच या तलवारी सुद्धा अतिशय महत्वाच्या होत्या आणि जर या तलवारी बाहेरील देशात असतील तर त्या त्वरित भारतात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.  

शिवाजी महाराजांना भवानी तलवार ही उत्तर कोकणावरील स्वारीत असताना तेव्हाच्या सिद्दीच्या मुलुखातील गोवेले या गावातील सावंत आडनावाच्या सरदारांकडून प्राप्त झाली हे आपण ससंदर्भ दाखवून दिले आहेच.

काय सावंत आणि बाजी पासलकर यांची जेव्हा लढाई झाली तेव्हा एकमेकांचे वार वर्मी लागून दोघेही धारातीर्थी पडले. यानंतर दोनही बाजूचे सैन्य आपापल्या जागेवर गेले त्यावेळी काय सावंत यांचे पुत्र माल सावंत यांना त्यांच्या एका नातेवाईकाने समजावले की शिवाजी महाराजांसारख्या प्रतापी पुरुषासोबत सख्य करण्याची नामी संधी सोडू नका. आपली खानदानी तलवार त्यांना नजर करा, ते नक्कीच खुश होतील. यानंतर माल सावंत हे महाराजांना भेटले व तलवार नजर केली आणि ती तलवार म्हणजेच भवानी तलवार.

प्रख्यात इतिहासकार वा. कृ. भावे हे शिवचरित्राचे एक अतिशय जाणते अभ्यासक होते. त्यांनी शिवकाल व पेशवेकालावर प्रचंड लिखाण केले आहे. शिवाजी महाराजांच्या तलवारीवर सुद्धा त्यांनी जुन्या जाणत्या लोकांनी केलेल्या वर्णनाचा वापर करून अमूल्य प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. 

शिवरायांच्या तलवारीवरील आपल्या लेखात वा. कृ. भावे यांनी बडोद्याचे प्रसिद्ध मल्लविद्या विशारद कै. माणिकराव यांनी लिहिलेल्या शिवाजी सावनीर नामक ग्रंथातील तलवारीचे वर्णन दिले आहे ते पुढील प्रमाणे

या तलवारीचे बाह्यवर्णन म्हणजे तिच्या दोन्ही बाजूना दोन खोल रेघा आहेत, मुठीजवळील जाड पोलादी भागावर सोनेरी फुलांची नक्षी आहे. तलवारीची मूठ आच्छादित लोखंडी आहे, सांध्याजवळील भाग चांगला रुंद व गोल असून मुठीच्या टोकास मोगरा आणि त्यावर सोनेरी फुलांची नक्षी आहे. या नक्षीत जवळ जवळ बसवलेले हिरे व लाल मणी आहेत. तिची करवीरकर महाराजांच्या देव्हाऱ्यात पूजा करण्यात येत असे. (शिवाजी सावनीर-कै. माणिकराव)

माणिकराव यांनी आपल्या पुस्तकात तलवारीचे केलेले वर्णन पाहून ही तलवार लंडन येथे नक्की आहे का हे पाहण्यास ठाणे येथील विनायकराव भावे यांनी ब्रिटिश म्यूजियमचे प्रमुख हर्क्युलिस यांना १९१५ साली एक पत्र लिहिले. 

हे पत्र वाचुन हर्क्युलिस यांनी भावे यांना उत्तरादाखल एक पत्र धाडले ज्यामध्ये भवानी तलवार ही ब्रिटिश म्यूजियम मध्ये नाही असे लिहिले होते. मात्र सदर तलवार भवानी नसून शिवरायांचीच तुळजा अथवा जगदंबा ही तलवार असावी असा अंदाज या निमीत्ताने बांधण्यात आला.

पुढे पत्रव्यवहार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष तेथेच जाऊन शहानिशा केलेली अधिक चांगली म्हणून भारत इतिहास मंडळाचे सदस्य व प्रख्यात इतिहासकार वा. सी. बेंद्रे हे थेट लंडनलाच जाऊन आले. 

आपल्या पुस्तकात माणिकराव म्हणतात की सन १८७५ साली ब्रिटिश बादशाह सातवा एडवर्ड भारतात आला तेव्हा त्यांना भेट म्हणून सदर तलवार देण्यात आली होती. इंग्लंडच्या बकिंगहम राजवाड्यात ती तलवार आहे असे बेंद्रे समजले तेव्हा त्यांनी पॅलेस ला भेट दिली व दुरून तिचे फोटो सुद्धा घेतले. ही तलवार माणिकराव यांनी वर्णन केलेल्या तलवारीसारखीच हुबेहूब होती आणि तिच्यावर जे.एच.एस. अशी अक्षरे कोरलेली होती.

आपण मागील लेखात वाचले आहे की रायगड जिल्ह्यातील गोवेले या गावातील सावंत यांच्याकडून शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्राप्त झाली मात्र सावंतांना ही धोप तलवार पोर्तुगीजांविरोधातील एका स्वारीत प्राप्त झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांकडे असलेल्या शस्त्रसाठ्यात तीन तलवारी महत्वाच्या होत्या ज्यांची नावे अनुक्रमे भवानी, जगदंबा व तुळजा अशी आहेत. या तलवारी सुद्धा धोप या प्रकारातील होत्या असे म्हटले जाते.

या तीनही तलवारींची निश्चिती प्रथम होणे आवश्यक आहे कारण त्याशिवाय लंडन च्या राजवाड्यात असलेली तलवार कुठली यांची शहनिशा होणे कठीण आहे.

भवानी व तुळजा  तलवारीचे अनेक वर्षांपासून गूढ असलेले रहस्य दूर व्हावे अशी आमचीही इच्छा आहे. ज्येष्ठ लेखक वा. कृ. भावे  यांनी आपल्या पुस्तकात कै. माणिकराव यांनी शिवरायांच्या तलवारीचे केलेले वर्णन व ठाण्याचे विनायक भावे तसेच वा. सि. बेंद्रे यांना या शोधात काय अनुभव आला ते कथन करण्याचा खूपच स्तुत्य उपक्रम केला आहे.