दुर्गसंपदा - भाग १

आपल्यावर होणारे आक्रमण थोपविण्यासाठी आणि आत्मरक्षणासाठी उभारलेला अडथळा किंवा स्वसंरक्षणाची व्यवस्था जिच्या सहाय्याने प्रसंगी प्रतिहल्ला सुद्धा करता येतो आणि आपले व आपल्या साधनसामग्रीच संरक्षण करता येते ती व्यवस्था म्हणजे दुर्ग. - संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गसंपदा - भाग १
दुर्गसंपदा - भाग १

आपल्यावर होणारे आक्रमण थोपविण्यासाठी आणि आत्मरक्षणासाठी उभारलेला अडथळा किंवा स्वसंरक्षणाची व्यवस्था जिच्या सहाय्याने प्रसंगी प्रतिहल्ला सुद्धा करता येतो आणि आपले व आपल्या साधनसामग्रीच संरक्षण करण्याची व्यवस्था म्हणजे दुर्ग.

या पृथ्वीवर मानव जेवढा प्राचीन आहे तेवढीच दुर्ग ही संकल्पना देखील. अगदी अश्मयुगीन काळापासून माणसाला स्वसंरक्षण करण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची आवश्यकता होतीच.

त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेत असताना त्याने स्वतःला व आपल्या परिजनांना हिंस्र श्वापदे व इतर धोक्यांपासून वाचविण्यासाठी नैसर्गिक आश्रयांचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि तेथूनच दुर्ग ही स्वसंरक्षण व प्रसंगी आक्रमण करण्यासाठी उपयोगात आणता येईल अशी संकल्पना उदयास आली. काळानुसार तिच्यात बदल झाले व ती अधिकाधिक मजबूत होत गेली.

महाराष्ट्रा पुरता विचार केल्यास शिवकाळात दुर्गांचे महत्व अतिशय वाढून संरक्षण व्यवस्थेत ते सर्वोच्च स्थानी पोहोचले.

दुर्गांचे स्थूलमानाने ३ प्रकार आहेत 

  • गिरिदुर्ग - डोंगरावर, पर्वतावर बांधलेला दुर्ग जसे की रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड. 
  • स्थलदुर्ग - जमिनीवर बांधलेला दुर्ग जसे की औसा, परांडा, उदगीर, बिदर, नळदुर्ग.
  • जलदुर्ग - पाण्यात बेटावर बांधलेला दुर्ग जसे की सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जंजिरा.

याशिवाय दुर्गांचे अनेक उपप्रकार सांगितले जातात जे या वरील तीन प्रकातच अंतर्भूत होतात.

भारतात  साधारण ३५०० हुन अधिक दुर्ग (गिरी, जल व स्थल सर्व मिळून) आहेत.

महाराष्ट्रात साधारण ५५०  दुर्ग आहेत.

यातील साधारण ३५० गिरिदुर्ग आहेत, ६० हे जलदुर्ग आणि सागर किनाऱ्यावर आहेत, तर साधारण १५० च्या आसपास स्थलदुर्ग व गढ्या आहेत.

शिवाजी राजांनी ८ जलदुर्ग बांधले (सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कासा/पदमदुर्ग, राजकोट, सुवर्णदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट) तसेच प्रतापगड, पारगड, सदाशिवगड, मच्छिन्द्रगड सारखे अनेक गिरिदुर्ग त्यांनी नव्याने बांधले तर राजगड, रायगड सारखे अनेक दुर्ग त्यांनी पुन्हा वसवले. 

सभासद बखरीनुसार महाराजांनी सुमारे १११ गडकोट नव्याने बांधले किंवा दुरुस्त करून घेतले. 

दुर्ग ही संकल्पना मानवा इतकीच प्राचीन असल्याचं आपण वर पाहिलंच आहे. तर असे हे आपल्याएवढेच प्राचीन दुर्ग आपण जसजसे प्रगत होत  गेलो तसतसे ते देखील प्रगत होत गेले. गुहेपासून सुरु झालेला हा  प्रवास  रंजक आणि रोचक आहे.

अगदी अशमयुगात मानव निवास करण्यासाठी मुख्यतः गुहेचा वापर करीत असे. पुढे भौतिक प्रगती नुसार पक्के घर, तटबंदी युक्त ग्राम अथवा शहर असा त्यात बदल झाला. जशी भौतिक प्रगती वाढली तशी अधिक संरक्षणाची गरज निर्माण झाली व यातूनच पुढे गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि इतर अनेक संरक्षक प्रकारांचा उदय झाला व त्याच बरोबर त्याच्या बांधणीचे एक शास्त्र तयार झाले. आज आपण असेच काही प्राचीन दुर्ग बांधणीतील संदर्भ पाहुयात.

ऋग्वेदात "शतमश्मन्मयीनां पुरामिन्द्रो व्यास्यत. दिवोदासाय दाशुषे" (४.३०.२०) अर्थात 'इंद्राने दगडी तटबंदीने युक्त अशी शंभर नगरे हव्य देणाऱ्या दिवोदासास दिली' यासारखे उल्लेख मिळतात. तर मनुस्मृती संरक्षित वस्त्यांचे सहा प्रकार सांगते. केवळ एवढेच न सांगता मनुस्मृती सांगते कि दुर्गात राहणारा एकच मनुष्य शंभर जणांशी लढू शकतो. तर किल्ल्यात असणारे शंभर वीर प्रसंगी १० हजार जणांशी देखील सहज लढू शकतात.  दुर्ग आणि राजा यांचा अन्योन्य संबंध सांगताना मनू म्हणतो-

ततो दुर्ग च राष्ट्रं च लोकं च सचराचरम ।
अंतरिक्षगतांश्चैव मुनिन्देवांश्च पीडयेत ।।

अर्थात राजाच्या नाशानंतर किल्ला, राज्य आणि स्थावर जंगम प्रजा व आभाळात राहणारे पक्षी आणि वायू सारख्या देवता तथा मुनी यांना देखील त्या अधर्मी (विजयी) राजाचा दंड पीडित करतो.

रामायणात श्रीलंकेच्या प्रसिद्ध दुर्गाचे वर्णन हनुमान करतात तर भगवान श्रीकृष्ण आपल्या बळकट द्वारकेबद्दल म्हणतात कि दुर्गांच्या मदतीने तर स्त्रिया सुद्धा लढू शकतात मग आमचे महारथी लढतील यात नवल ते काय? महाभारतातील शांती पर्वात भीष्म पितामह दुर्गाच्या रचनेबद्दल बरीच मौलिक माहिती देतात. मात्र त्यांच्या लेखी 'उपयुक्त माणसांचा संचय हाच सर्वश्रेष्ठ संचय तर नरदुर्ग हाच श्रेष्ठ दुर्गप्रकार आहे.'

पुढे कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात दुर्ग रचनेबद्दल अतिशय सविस्तर माहिती देतो आणि गिरिदुर्ग हाच सर्वोत्तम दुर्गप्रकर आहे असे स्पष्ट करतो.  केवळ कौटिल्यच नव्हे तर सर्वच मनीषी गिरिदुर्गाला सर्वोत्तम मानतात (पितामह भीष्म सोडून)

पुढे ११ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या 'अभिलषितार्थ चिंतामणी' या ग्रंथात दुर्गांचे प्रकार व तत्सबंधाने उपयुक्त चर्चा केली आहे. अशीच चर्चा 'आकाशभैरवकल्प' या अजून एका ग्रंथात सुद्धा केलेली दिसते. लक्ष्मीधर कृत 'दैवज्ञविलास' मध्ये 'प्रथम गिरिदुर्गंच' अशी सुरुवात करून दुर्गांचे ८ प्रकार वर्णिले आहेत.  

संभाजी राजे देखील आपल्या 'बुधभुषणम' मध्ये म्हणतात

'सर्वेषामेव दुर्गाणा गिरिदुर्ग प्रशस्यते।
दुर्गंच  परीखोयेतं वप्राट्टालकसंयुतम।।

अर्थात सर्व दुर्गांमध्ये गिरिदुर्ग हा प्रशंसनीय आहे आणि तो वप्र व अट्टालक यांनी युक्त असावा.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करवून घेतलेल्या राज्यव्यवहार कोशात देखील स्वतंत्र दुर्गवर्ग प्रकरण आहेच. याशिवाय मानसार, समरांगण सूत्रधार, मयमत, शिल्पशास्त्र, कामंदकीय नीतिसार, शुक्रनीती अशा अनेक ग्रंथांमध्ये दुर्गांबद्दल चर्चा करण्यात आली आहे. पुढील भागात दुर्ग रचनेबद्दल करण्यात आलेले विवेचन समजावून घेऊयात. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)