हंबीरराव मोहिते - स्वराज्याचे खंदे सरसेनापती

स्वराज्याचे खंदे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांचे नाव घेतले जाते. हंबीरराव यांनी शिवकाळ व शंभुकाळ हे दोनही काळ आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमाने गाजवले.

हंबीरराव मोहिते - स्वराज्याचे खंदे सरसेनापती
हंबीरराव मोहिते

हंबीरराव यांचे मूळ नाव हंसाजी बाजी मोहिते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस ते स्वराज्याच्या सैन्यात पंचहजारी सरदार होते मात्र नेसरीच्या लढाईत सरनोबत प्रतापराव गुजर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळी याच मोहिमेत सहभागी असलेल्या हंसाजी यांनी प्रसंगावधान राखून मावळ्यांना प्रोत्साहन देऊन बहलोलखानाच्या सैन्याचा पराभव केला या कामिगिरीने खुश होऊन महाराजांनी सरनोबतीची जबाबदारी हंसाजी यांच्याकडे दिली तसेच हंबीरराव हा किताबही दिला.

हंबीरराव हे शिवाजी महाराजांचे मेहुणे असून सोयराबाई यांचे सख्खे बंधू होते. १६७५ साली त्यांनी मोगलांचा मुलुख लुटून मिळवलेली संपत्ती सुरक्षित राजधानी रायगडावर पोहोचती केली याशिवाय पुढल्याच वर्षी हुसेनखानाचा पराभव करून पुष्कळ लूट मिळवली.

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून परत रायगडास येताना तंजावर येथील त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांच्याकडे त्यांनी हंबीररावांना बंदोबस्तासाठी ठेवले होते मात्र व्यंकोजी यांनी कुरापत काढल्यामुळे ते आणि हंबीरराव यांच्यात एक लढाई झाली. कालांतराने महाराज व व्यंकोजी यांच्यात तह झाल्यावर महाराजांनी हंबीरराव यांना परत बोलावून घेतले मात्र आपल्या परतीच्या वाटेवरही त्यांनी आदिलशाही मुलुखावर हल्ला करून कृष्णा व तुंगभद्रा नद्द्यांच्या मधील दुआब हा प्रांत ताब्यात घेतला.

मोगलांविरोधात आदिलशाहने महाराजांकडे मदत मागितली तेव्हा हंबीररावांनी तेथे जाऊन रणमस्तखानाचा पराभव केला आणि विजापुरास वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाची पुरती नाकेबंदी करून त्याच्या सैन्यात शिबंदीची इतकी टंचाई निर्माण केली की नाईलाजास्तव दिलेरखानाने पावसाळा संपल्यावर त्वरित विजापूरचा वेढा उठवला. 

शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याची सूत्रे कोणाकडे द्यावयाची या संदर्भात कलह सुरु झाला व थेट दोन गट पडले. संभाजी महाराजांच्या रायगडावरील अनुपस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या गटाने राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा विचार केला. ३ एप्रिल १६८० साली अष्टप्रधान मंडळाने हा हेतू तडीस नेण्याचा विचार केला. संभाजी महाराज हे पन्हाळा येथे असल्याने त्यांना तिथेच नजरकैद करून राजाराम महाराजांचा मंचकारोहण समारोह करून घ्यावा असा विचार अष्टप्रधानांचा होता. या नुसार अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अण्णाजी दत्तो यांनी राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व  नंतर मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत पन्हाळ्यावर चाल करून गेले. 

संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर ही बातमी मिळाली व त्यांना अतिशय दुःख झाले मात्र आल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी आपले सावत्र मामा हंबीरराव मोहिते यांना एक पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास सांगितले. हंबीरराव हे राजाराम महाराजांचे सख्खे मामा असूनही त्यांनी काळाची गरज ओळखुन संभाजी महाराजांचा पक्ष धरला यातच त्यांची महानता समजते.  यानंतर हंबीरराव यांनी इतर मंत्र्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्र्यांनी हट्टाने पन्हाळ्यावर हल्ला करण्याचा विचार कायम ठेवला. हा कट एवढ्या गुप्त रीतीने रचला गेला कि ब्रिटिशांनाही तेव्हा वाटले की हे मंत्री संभाजी महाराजांचा हुकूम घेण्यासाठी पन्हाळ्यास जात आहेत मात्र प्रत्यक्षात ते संभाजी महाराजांना कैद करण्यास जात होते. 

रायगडावरून जेव्हा मंत्री निघाले तेव्हा त्यांना अनेक अपशकुन झाले यावेळी त्यांनी पुढील घटनेचा अंदाज लावावयास हवा होता मात्र चुकीच्या हट्टाने घर केल्याने त्यांनी कसलाही विचार न करता पन्हाळ्यावर चाल करण्याचा आपला बेत कायम ठेवला. हंबीरराव यांनी बैठक बोलवून अण्णाजी व मोरोपंत याना पुढील कृत्य करण्यास प्रवृत्त केले मात्र या दोघांनी नकार दिल्याने नाराज होऊन हंबीरराव यांनी आपला जमाव आपल्या बाजूने वळवून घेतला. त्यामुळे अण्णाजी व मोरोपंत यांनी सैन्यासह त्यांच्यावर हल्ला केला मात्र या हल्ल्यात हंबीररावांनी अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ व प्रल्हादजी निराजी यांचा कराड येथे पराभव करून हात बांधून पन्हाळ्यास संभाजी महाराजांसमोर दाखल केले. यापूर्वी काही दिवस रायगडावरही कटातील काही लोकांना कैद करण्यात आले होते.

१६८४ साली औरंगजेबाचे महाराष्ट्रात आगमन झाले व त्याने आपला तळ अहमदनगर येथे बसवला यावेळी हंबीरराव यांनी अचानक बुऱ्हाणपुरास जाऊन मुघलांच्या मुलुखात जाऊन लूट मिळवली व स्वराज्यात आणली.  १६८७ साली मोगल सरदार सर्जाखान व हंबीरराव यांच्यात वाईजवळ तुंबळ लढाई झाली यामध्ये हंबीरराव तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले मात्र मराठ्यांनी ही लढाई जिंकून आपल्या खंद्या सरसेनापतीस खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.