शिवरायांच्या अटकेचे एक फसलेले कारस्थान

बाजी शामराज वाईमार्गे जावळी प्रांतातील पारघाट येथे ससैन्य दाखल झाला कारण कोकणातील महाड येथून जर घाटमाथ्यावर जायचे असेल तर जावळी प्रांत ओलांडून पारघाट या घाटमार्गावरूनच प्रवास करावा लागत असे.

शिवरायांच्या अटकेचे एक फसलेले कारस्थान
शिवरायांच्या अटकेचे एक फसलेले कारस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळप्रांतापासून केली. हा भाग त्याकाळी आदिलशाही राज्याचा भाग होता हे आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या एका मोठ्या सरदाराच्या पुत्राने आपल्या सत्तेविरोधात बंड उभारून जहागीर तर स्वतंत्र केली आहेच मात्र जहागिरीच्या आसपासचा प्रदेशही तो वेगाने जिंकू लागला आहे ही बाब आदिलशहास सहन होण्यासारखी नव्हती.

आदिलशहाच्या प्रत्येक शहास शिवाजी महाराज काटशह देत असल्याने आदिलशहाचा महाराजांपुढे नाईलाज झाला होता. शिवाजी महाराजांना रोखण्याचा कुठलाच पर्याय न उरल्याने शहाजी महाराजांना जेव्हा आदिलशहाने अटक केली तेव्हा शिवाजी महाराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास आपल्या वतीने आदिलशाही राज्यावर मी हल्ला करेन असे सांगून आदिलशहाची पाचावर धारण बसवली होती. आपल्या पुत्राची शहाजीराजे गुप्तपणे मदत करत आहेत या संशयामुळे आदिलशहाच्या मनात शहाजी राजांची हत्या करण्याचे जे बेत सुरु होते ते शिवाजी महाराजांमुळे फसले मात्र शहाजी महाराज आदिलशहाच्या कैदेत असल्याने शिवाजी महाराजांना सुद्धा आक्रमक धोरण स्वीकारणे कठीण जात होते.

आदिलशहाच्या दरबारी मुरार जगदेव आणि रणदुल्लाखान हे दोन सरदार होते जे शहाजी महाराजांचे खूप चांगले मित्र होते. या दोघांनी अदिलशाहास सांगितले की शहाजी महाराजांची मुक्तता करावी अन्यथा शिवाजीराजे मोगलांची मदत घेऊन आपल्यावर हल्ला करून आदिलशाही साम्राज्य नष्ट करतील. यानंतर अदिलशाहास नाईलाजाने शिवरायांशी तह करून शहाजीराजांची मुक्तता करावी लागली.

यापुढील काही काळ दोन्ही बाजुंनी तटस्थ गेला मात्र आदिलशहाच्या मनात आदिलशाहीची पाळेमुळे हादरवणाऱ्या शिवाजी महाराजांना नष्ट  करण्याची प्रबळ इच्छा घर करून बसली होती. शिवाजी महाराजांना आपल्या कार्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न करून पाहिल्यावर आदिलशहाने एक गुप्त कारस्थान रचले व ते होते शिवाजी महाराजांना थेट छापा मारून अटक करण्याचे.

रायगड किल्ल्यापासून काही अंतरावर असलेले महाड हे त्याकाळातील प्रमुख व्यापारी शहर होते. या शहरास तेव्हा तटबंदी होती. सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमावर वसलेले महाड हे धार्मिक दृष्ट्याही प्रसिद्ध होते. सावित्री नदीचा उगम हा महाबळेश्वर क्षेत्री झाला असून ती दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर जवळ सिंधुसागरास मिळते. सावित्री नदीच्या महाबळेश्वर ते हरिहरेश्वर या मार्गात एकूण बारा प्राचीन शिवालये असल्याचा उल्लेख ऐतिहासिक संधानात येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासूनच जलतरणाची अत्यंत आवड होती व त्यांचे जलतरणाचे आवडते ठिकाण होते महाड येथील सावित्री नदीचे अत्यंत विस्तारित असे पात्र. बालपणी शिवाजीराजांना जलतरणासाठी एक वाडा शहाजी महाराजांनी महाड येथे बांधून दिला होता असे उल्लेख इतिहासकार करतात. महाराज या ठिकाणी अनेकदा भेट देत असत. याची माहिती आदिलशहास असल्याने याच ठिकाणी महाराजांवर छापा घालून त्यांना पकडण्याचा बेत आदिलशहाने केला.

ही घटना अदमासे १६५०-५१ च्या दरम्यान घडली असावी. महाडच्या पूर्वेस जावळीचे प्रसिद्ध राज्य होते व तेथील संस्थानिक चंद्रराव मोरे हे आदिलशाही दरबारात होते. चंद्रराव मोऱ्यांच्या दुर्गम अशा जावळीतून महाडवर छापा मारून शिवाजी महाराजांना पकडण्याचा बेत पक्का झाला आणि आदिलशहाने बाजी शामराज या सरदारास शिवाजी महाराजांना अटक करण्याची जबाबदारी सोपवून व  सोबत दहा हजार सैनिक देऊन जावळीस पाठवले. 

बाजी शामराज वाईमार्गे जावळी प्रांतातील पारघाट येथे ससैन्य दाखल झाला कारण कोकणातील महाड येथून जर घाटमाथ्यावर जायचे असेल तर जावळी प्रांत ओलांडून पारघाट या घाटमार्गावरूनच प्रवास करावा लागत असे. पुण्यास परत जाताना शिवाजी महाराज महाडहून पारघाट मार्गेच जातील अशी खात्री बाजी शामराज यास होती व तो आपल्या सैन्यासह पारघाटात नाकेबंदी करून महाराजांची वाट पाहत बसला.

मात्र अष्टावधानी शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते सुरुवातीपासूनच प्रबळ असल्याने त्यांना या कटाची खबर लागली आणि त्यांनी सैन्य जमवून महाडमार्गे पारघाटातील घनदाट अरण्यात लपलेल्या बाजी शामराजवर हल्ला करून त्याची व त्याच्या सैन्याची त्रेधा उडवली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बिथरून बाजी शामराज आपल्या सैन्यासहित युद्ध सोडून पळून गेला आणि शिवाजी महाराजांना घातपात करण्याची आणखी एक आदिलशाही योजना पुन्हा एकदा फसली.

शिवकाळातील हे अनेक अपरिचित प्रसंग आपल्याला नव्याने शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची व युद्धनीतीची ओळख करून देतात.