सुरतेची लक्ष्मी अडवण्याचा मुघलांचा डाव महाराजांनी असा उधळला

इ.स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरत जिंकून मोगलांना जबर धक्का दिला. सुरतेची लूट केली नि स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढले.

सुरतेची लक्ष्मी अडवण्याचा मुघलांचा डाव महाराजांनी असा उधळला
सुरतेची लक्ष्मी अडवण्याचा मुघलांचा डाव महाराजांनी असा उधळला

त्यानंतर स्वराज्यावर मोठंमोठी संकटे आली. त्यापैकी मिर्झाराजे जयसिंग याचं आक्रमण फारच भयानक होतं. यावेळी झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांना स्वराज्याच्या उत्पन्नाचा मोठा प्रदेश व २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि नंतर मुघलांची मनसबदारी स्वीकारावी लागली.

यानंतरच्या काळात महाराजांनी दग्धभू धोरण अवलंबले. कोणतीही घाई न करता ते शांतपणे राजकारण करत होते आणि १६७० च्या फेब्रुवारी महिन्यापासून महाराजांनी आक्रमक पवित्रा घेत पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले व प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. किल्ले व मुलूख जिंकला तरी जेव्हा तो प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता तेव्हा मात्र त्याचे काहीच उत्पन्न स्वराज्याला मिळाले नव्हते. साहजिकच स्वराज्याच्या तिजोरीत तूट पडली होती व ही तूट भरून काढण्यासाठी लूट करणे महत्त्वाचे होते व व त्यानुसार महाराजांनी ३ ऑक्टोबर १६७० रोजी सुरतेवर हल्ला केला व दुसऱ्यांदा मुघलांची सुरत बदसुरत केली. तीन दिवस मराठे सुरत लुटत राहिले व ५ ऑक्टोबर रोजी दुपारी मराठ्यांनी सुरत सोडली व जाता जाता मुघल अधिकाऱ्याकडे पत्र पाठवून निरोप दिला,

"दरसाल बारा लाख रुपये दिले नाहीत तर पुन्हा पुढच्या वर्षी येऊन शहराचा उरलेला भाग जाळून टाकू".

सुरतेची लूट घेऊन स्वराज्यात परतण्यासाठी मुल्हेरकडे निघाले. याचवेळी शहाजादा मुअज्जम औरंगाबादला होता. त्याला सुरतेच्या लुटीची बातमी कळली व त्याने महाराजांना रोखण्याची कामगिरी दाऊद खानावर सोपवली. शहाजादाच्या आज्ञेवरून दाऊद खान बुऱ्हाणपूरवरून औरंगाबादला आला व तेथून तो लगेच महाराजांना अडवण्यासाठी रवाना झाला.

दाऊद खाना सोबत अनेक मातब्बर सरदार, तोफखाना, हत्ती, उंट व पुष्कळ सैन्य होते. त्याने वैजापूर येथे आपला तळ ठोकला. यावेळी महाराज मुल्हेरच्या किल्ल्यापर्यंत आले. मुगल आपल्यावर चालून येत असल्याचे कळताच, महाराजांनी कांचन-मंचनच्या घाटातून निसटून जाण्याचे ठरवले. मुघली हेर महाराजांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. महाराजांच्या हालचालीची बातमी कळताच, दाऊदखानाने आपला तळ उचलला व महाराजांना अडवण्यास तो चांदवड येथे आला.

"कांचन-मंचनचा घाट पार करून महाराज नाशिकच्या दिशेने जात आहेत व त्यांचे घाटमाथ्यावर असलेले सैन्य मागाहून येणाऱ्या उर्वरित सैन्याची वाट बघत आहेत"

ही खबर मध्यरात्री दाऊद खानाला मिळाली. लगोलग दाऊदखान महाराजांच्या दिशेने स्वार झाला. तो इतका उतावीळ झाला होता की त्याचे स्वारदेखील त्याच्या मागे जाऊ शकले नाहीत आणि त्यातच अंधार असल्याने दाउद खानाचे सैन्य वाट चुकले व त्यांना सूर्योदयापर्यंत थांबावे लागले.

सूर्योदय झाल्यावर, मोगली सैन्य घाटमाथ्यावर येऊ लागले. इखलासखान सैन्यासह आघाडीवर होता. मोगली सैन्य वर पोहोचताच शस्त्रसज्ज असलेले मराठे त्यांना दिसले. मुघलांचे अनेक सैनिक अजून यायचे होते तरीही इखलासखानाने मराठ्यांवर चाल केली. त्याच्या चालीला मराठ्यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले. तुंबळ युद्ध सुरू झाले. मराठ्यांच्या पहिल्याच धडकेत इखलासखान जबर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. तेवढ्यात दाऊदखान त्या ठिकाणी पोहोचला व त्याने इतर सरदारांना इखलासखानाच्या मदतीला पाठवले. पण मराठ्यांच्या जोरदार आक्रमणापुढे या सरदारांचे काही चालले नाही. मुघलांचे अनेक सैनिक व नामवंत सरदार यात मृत्युमुखी पडले.

मराठ्यांचे आक्रमण थोपवण्यासाठी मोगलांनी तोफांचा मारा सुरु केला. त्यामुळे मराठे थोडे मागे झाले. याचा फायदा घेत दाऊदखानाने इखलासखानाला उचलले व तो मराठ्यांशी लढाई करू लागला. पण मराठ्यांनी चारही बाजूने घेरले व मुघलांवर तुटून पडले. मुघली तोफांचा मारा होतच होता. यात पन्नास एक मराठी सैनिक पडले पण त्या बदल्यात मराठ्यांनी हजारो मुघलांना यमसदनी धाडले होते.

या लढाईत देखील मराठ्यांनी मुघलांची लूट केली व मुघलांची शस्त्रे, घोडे व झेंडा घेऊन मराठे आपल्या पुढच्या दिशेने निघाले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी वणी-दिंडोरी या तत्कालीन जिल्ह्यांच्या सीमेवर ही लढाई लढली गेली म्हणून हिला वणी-दिंडोरीची लढाई असे म्हटले जाते.

महाराजांना रोखण्याचा मुघलांचा डाव पुन्हा एकदा फसला व विजयश्री खेचत शिवाजी महाराज सुरतेच्या लुटीसह नाशिक मार्गे कुंजरगडावर पोहोचले.

- अमित म्हाडेश्वर