चिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं
दाभोळकडे गेलं की लोकमान्य टिळकांचे मूळ गावं असलेल्या चिखलीकडे पाय आपोआप वळतात. दापोली-दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून २० ते २५ कि.मी. अंतरावर चिखली गाव नावाची एक पाटी प्रवासात दिसते.

चिखली गावाकडे मी दुसऱ्यांदा जात होतो. दहा वर्षापूर्वी गेलो तेव्हा या चिखली गाव एस.टी. थांबा पाटीच्या दक्षिणेस एक लाल मातीचा नागमोडी रस्ता त्यावेळी चिखली गावाकडे गेला होता. पायी चालत गेलो तर जेमतेम एक तास या गावाकडे जाण्यास लागतो. रस्त्यावरून थोडे खोलगट भागात जावून पुन्हा दुसऱ्या टप्प्यावर गेल्यावर टिळकवाडी नावाच्या एका वाडीत आपण प्रवेश करतो. चिखली गावाच्या परिसरात जी गावे येतात त्यामध्ये या टिळकवाडीचा समावेश आहे. कोकणातील इतर खेड्याप्रमाणे नारळ, आंबे आणि केळींच्या सान्निध्यात ही वाडी लपली होती. अलिकडेच म्हणजे दहा वर्षानंतर पुन्हा मी या चिखली गावाकडे गेलो तेव्हा लाल मातीचे रस्ते जावून तेथे डांबरीकरणाने जागा घेतली होती.
गावाकडे जात असताना पूर्वी डावीकडे असलेले माळरान गवताने जाम भरलेले दिसायचे, या खेपेस मात्र या माळरानावर टिळक विद्यालय नावाचे एक सुंदर शैक्षणिक संकुल उभे राहिलेले दिसत होते. हे संकुल जेथे बांधले आहे ती जागाही टिळक घराण्याची. टिळकांनी शैक्षणिक संकुलासाठी ती जागा देणगी दिली आहे हे गावात गेल्यावर कळले.
टिळकांचे जन्मगाव चिखली गाव नसले तरी त्यांचे मूळ घराणे चिखली गावात होते. याची जाणीव फार वर्षानी का होईना शासनाला झाल्याने चिखली गाव माणसात येत असल्याची जाणीव झाली. अनेकांचा समज असा आहे की, टिळकांचे जन्म ठिकाण चिखली गाव, परंतु प्रत्यक्षात टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते. आपल्या बदलीच्या वास्तव्यात ते रत्नागिरीत असताना बाळ गंगाधर नावाच्या या सुपुत्राने रत्नागिरीच्या भूमीवर जन्म घेतला होता.
टिळकांच्या पूर्वजांचे वास्तव्य असलेल्या टिळकवाडी या गावात शिरल्यावर डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली एक कौलारू घर दिसले, जवळच उभा असलेला एक ग्रामस्थ म्हणाला, तेच ते कौलारू घर लोकमान्य टिळकांचे... घराचा दरवाजा बंद होता, दरवाजावर टकटक केल्यावर एका वृद्ध माणसाने दरवाजा थोडासा किलकिला केला, मी विचारले टिळकांचे घर हेच का? माझ्या प्रश्न पुरा होत नाही तोच त्या माणसाने आतून दरवाजा आपटला आणि म्हणाला, कोण टिळक? टिळक पुण्याला राहतात आणि आता ते टेल्कोतून निवृत्त होऊन घरीच आहेत. पुण्याला जा...
कपाळावर हात मारण्यापलिकडे माझ्याकडे उत्तर नव्हते. तहान लागली होती म्हणून याच गृहस्थांना पाणी द्या म्हणालो आणि दरवाजा पूर्णपणे न उघडताही दरवाजातून फक्त हात आणि तांब्याच बाहेर आला. गावात गेल्यावर कळलं की, टिळकांच्या पूर्वजांचे हे घर असल्याने (चौथी पिढी) हे घर शासन ताब्यात येईल या भितीने त्यांना तसं खोटे बोलावं लागतं, असे गावातील एकजण म्हणाला. याचवेळी दुसरा एक इसम माझ्याजवळ आला आणि त्या घरासमोरील रिकाम्या जोत्याकडे बोट दाखवित म्हणाला, टिळकांचे मूळ घर या जागेवर होते. मी त्या मोकळ्या जागेकडे पाहिले तेव्हा त्या रिकाम्या जोत्यावर टिळकांचा एक अर्धपुतळा होता, डोक्यावर छत्री, आजूबाजूला स्वच्छता नाही, कित्येक दिवस झाडलोट नाही, योगायोगाने टिळक जयंतीच्या दिवशीच मी चिखली गावात होतो. गावातील शाळेतील मुले पुतळा स्वच्छ करून झाडलोट करून टिळकांच्या पुतळ्याला हार घालीत होती आणि म्हणत, होती चिखलातून कमळ उमलावे तसे...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव ठाऊक नसलेला भारतीयच मिळणार नाही. पारतंत्र्याच्या काळात आपल्या प्रखर ध्येयवादाने भारतीय जनतेला त्यांनी जागृत केले होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या अध्यापकांनी लोकशिक्षणासाठी चालविलेली 'केसरी व मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे. 'मराठा'चे संपादनकार्य करीत असतानाच टिळकांनी क्रियाशील राजकारणात भाग घेतला, आधी राजकीय स्वातंत्र्य देशाला मिळाले पाहिजे, मग सर्व त-हेच्या राजकीय सुधारणा आपोआपच होतील अशी श्रद्धा होती. 'लोकमान्य' ही त्यांना जनतेने दिलेली उत्स्फूर्त पदवी आहे. टिळक हे मुत्सद्दी तर होतेच पण असामान्य विचारवंतही होते. गीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन दि वेदाज या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथातून त्यांच्या विवेचक प्रज्ञेची व गाढ व्यासंगाची खात्री पटते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरीमधील या जन्मठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे म्हणून १९४४ सालो लोकांनी सुमारे आठ हजार रुपयांचा निधी जमा करून टिळकांचा अर्धपुतळा उभारला. अर्थात चिखली गावामधील त्यांच्या उघड्या जोत्यावरील उभारलेला टिळकांचा अर्धपुतळा अलिकडचा, अर्थात १९४४ नंतर शासनाला जाग आल्याने तब्बल ५५ वर्षानी रत्नागिरी येथील जन्मस्थळी शासनाने त्यांचा पूर्ण आकृतीचा पुतळा उभा केला. परंतु १ ऑगस्ट या त्यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने व मंत्री न मिळाल्याने या पुतळ्याचे अनावरण झालेच नाही, हे अनावरण शेवटी लोकांनीच केले, हे यातील विशेष. यातील दुसरे विशेष म्हणजे उद्घाटनासाठी मंत्र्यांची वाट पहात हा पुतळा कपड्याने बंदिस्त करण्यात आला होता. 'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच' या आपल्या ब्रिदाचा त्यांनी निर्भय उच्चार केला व निर्भयतेमुळे त्यांना १९०८ साली मंडालेच्या तुरूंगात राजकीय बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. हे लक्षात घेतले तर ९१ वर्षानंतरही १९९९ साली उद्घाटनाला मंत्री मिळत नाहीत म्हणून टिळकांना त्यांच्याच घरासमोर कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत बंदिस्त व्हावे लागले, हा दोष नक्की कोणाचा? त्या पुतळ्याचा कि लोकमान्यांचा की नव्याने इंग्रज म्हणून निर्माण झालेल्या राज्यकर्त्यांचा?
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |