किल्ले घोसाळगड, बिरवाडी व सुरगड

रोहे तालुक्यात अवचितगड, तळगड, बिरवाडी, सुरगड व घोसाळगड हे अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले आहेत. दुर्गभ्रमंतीची सवय असलेले अगदी दोन दिवस हाती असतील तर हे पाचही किल्ले पाहू शकतात.

किल्ले घोसाळगड, बिरवाडी व सुरगड

घोसाळगड किल्ला 

घोसाळगड हा किल्ला रोहे शहरापासून ९.३ किलोमीटर अंतरावर आहे. याच्या उत्तरेस रेवदंडा खाडी, आग्नेयेस साळाव खाडी व दक्षिणेस भालगाव खाडी आहे. हा गड चढताना पहिला टप्पा ६१ मीटरचा आहे तर दुसरी चढण १६१ मीटरची असून तिसरी उभी चढण ३१ मीटरची आहे. चौथा टप्पा डोंगराच्या माथ्यावर आहे. उत्तरेस गवळीवाडा गाव आहे. पूर्वी येथूनच गडावर दूध जात असे. त्यामुळे या गावाला गोशाळा म्हणत असत. परंतु या शब्दाचा अपभ्रंश होऊन घोसाळे हे नाव पुढे आले असावे.

हल्ली हा गड घोसाळगड म्हणून ओळखला जातो, घोसाळे या गावातून या गडावर जाण्यासाठी वाट आहे. दक्षिण व पूर्वेकडूनही जाण्यास वाटा आहेत. गडाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे असावा परंतु पडझडीमुळे त्याचा ठावठिकाणा लागत नाही. गडावर उत्तर व दक्षिण बाजूने तटबंदी असून त्याचा आकार खेकड्यासारखा आहे.

पश्चिमेस बुरूज असून तेथे गोळीबाराचे ठिकाण आहे. दक्षिणेस चोर दरवाजा असून त्याचा वापर खाजगी कामासाठी व पाहुण्यांसाठी केला जात असे, असे कुलाबा गॅझिटीअरवरून दिसून येते. याच ठिकाणी दगडात अंधारकोठडी होती. परंतु आज तेथे कोठडी नाही. फक्त एक कोरीव भिंत आहे. गडाच्या दक्षिण बाजूला दगडात कोरलेल्या पाण्याच्या तीन टाक्या आहेत. पुढे नैसर्गिक गुहा असून तेथेही पडझड झाली आहे.

गुहेजवळ श्रीभवानी देवीच्या देवळाचे जोते आहे. शेजारीच एक पिंडी आहे तर मंदिराच्या पुढील बाजूस दगडात कोरलेल्या दोन टाक्या असून त्यांना भवानी टाक्या म्हणतात. तेथील एका टाकीत सिमेंटच्या स्लॅबसारखे दगडाचे आवरण असून दोन्ही टाक्यांत पाणी आहे. दक्षिण बाजूच्या पूर्व टोकास तटबंदी असून तेथे फक्त एक तोफ आहे.

हा गड सोळाव्या शतकात निजामशहाच्या ताब्यात होता. सन १६२६ मध्ये आदिलशहाने त्याचा ताबा घेतला. परंतु १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा पाडाव करून हा गड ताब्यात घेतला. आदिलशहाचा सरदार अफझलखान याने १६५० मध्ये प्रतापगडावर स्वारी केली असताना सिद्दीने या घोसाळगडाला वेढा दिला. पुढे १६६५ च्या तहानुसार या गडाची मालकी शिवाजीराजांकडे आली. पहिल्या बाजीराव पेशवांनी १७३५ मध्ये हा किल्ला काबीज केला व त्याच वर्षाच्या सिद्दी व मराठा यांच्या तहानुसार या गडाची मालकी मराठ्यांकडे आली, ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यापूर्वी कप्तान प्रार्थरच्या एक तुकडीने १८१८ मध्ये या किल्ल्याचा पाडाव केला असा उल्लेख आहे.

बिरवाडी किल्ला

बिरवाडी हा किल्ला रोह्यापासून अदमासे २० किलोमीटर अंतरावर आहे.  या गडाच्या पायथ्याशी बिरवाडी हे कोकणातले सुंदर गाव आहे. रोहयावरून रेवदंड्याकडे जात असताना चणेरा या गावावरून हा किल्ला दिसतो. या किल्ल्यावरील तटबंदी, बुरूज सर्व काही ढासळलेल्या अवस्थेत आहेत. किल्ल्यात पडक्या इमारतींचे अवशेष असून जवळच असलेल्या पाण्याचा चार टाक्या गाळाने भरलेल्या आहेत. या किल्ल्याच्या पायथ्याशी एक कबर आहे. त्यावरुन शेखाची बिरवाडी असे नाव या गावाला पडले असावे, गडाच्या मध्य आणि उतारावर श्रीभवानीमातेचे जुने मंदिर आहे, सिद्दीपासून या भागाचे रक्षण व्हावे यासाठी तळागड, घोसाळगड घेतल्यावर शिवाजी महाराजांनी हा गड बांधला.

सुरगड किल्ला

सुरगड नागोठणे शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामागीवर पूर्व वैजनाथ या गावाजवळ आहे. हा गड रस्त्यापासून दूर असल्याने अनेकांना या गडाचे अस्तित्व माहिती नाही, या गडावर जाण्यासाठी किल्ल्याच्या दक्षिण व उत्तरेकडून वाटा आहेत, वाटेवर काही दिकाणी दगडी पायर्‍या आहेत. दोन डोंगराच्या कड्यामधून कातळावरच या पायऱ्या खोदल्या आहेत. दोन डोंगरांच्या मधून घळीतून जाणारा हा मार्ग किल्ल्यावर जुन्या इमारतीचे अवशेष, बुरूज, तटबंदी अंधारकोटडी हे सारं काही कोसळलेल्या अवस्थेत आहे. सध्या रहदारी नसल्याने व हा किल्ला एका बाजूला असल्याने या किल्ल्याकडे विशेष दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्यावर पाण्याच्या पाच टाक्या आहेत, किल्ल्याच्या आग्नेय बाजूकडील बुरूजाजवळ एक दगड पडला असून त्यावर अरबी व देवनागरी लिपीतील एक लेख आहे, त्यावरून हा शिलालेख पूर्वी बुरूजावरील भिंतीत बसविला असावा, या शिलालेखानुसार सिद्दी नबाबाच्या राजवटीत दुसऱ्या वर्षी हा किल्ला बांधला असावा असा निष्कर्ष इतिहासकारांनी काढला आहे, या किल्ल्याचा वास्तुशास्त्रज्ञ नुरयानी होता व गडाच्या हवालदारपदी तुकोजी हैबत होता. फेब्रुवारी १८१८ मध्ये कर्नल प्रार्थरले अवचितगडासह या किल्ल्याचा पाडाव केला. एकूण या किल्ल्याच्या अभ्यास केल्यावर ऐतिहासिक काळातील माणसे कशी पहाडी हाताची व छातीची होती हे दिसून येते. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या वैजनाथ या गावी वैजनाथेश्वर है शंकराचे जागृत देवस्थान आहे. तसेच खांब येथे खांबजाई देवीचे जागृत देवस्थान आहे.