अविस्मरणीय ढेबेवाडा

मिरकुटवाडीतून बैलगाडीचा कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. झाडी झुडुपे, चढ उतार पार करून सुमारे एक कि.मी. अंतरावर ढेबेवाडा आहे. गर्द हिरवाईत असलेले हे ठिकाण आपण अगदी वाड्याजवळ पोहोचेपर्यंत लक्षात देखील येत नाही.

अविस्मरणीय ढेबेवाडा
ढेबेवाडा

२०१९ मधे आलेल्या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. गेले दोन वर्ष जगभर या महामारीने मानवाच्या जीवनात फार मोठे बदल झालेले आहेत, अगदी त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०२० मधे आलेल्या पहिल्या प्रलयात या वैश्विक महामारीशी लढण्यासाठी कोणतेहि निर्णायक औषध वा प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. आज मात्र जगभरातील व भारतातील संशोधक यांनी अपार मेहनतीने या आजारावर प्रतिबंधक लस शोधून तिची निर्मिती देखील सुरू केली आहे. २०२० मधे अपुरी साधने असताना तितकीशी मानवी जीवित हानी झाली नव्हती जी २०२१ मधे परिणामकारक औषधे, लस असताना झाली आहे. आजकाल समाज माध्यमावर प्रामुख्याने दोन प्रकारची माहिती प्रसारित होताना दिसते ती म्हणजे आजारी व्यक्तिला दाखल करण्यासाठी कुठे जागा उपलब्ध होईल, प्राणवायू हवा आहे, हे औषध कुठे मिळेल तर महामारीसाठी इतक्या रुग्णांच्या सोईसाठी तात्पुरते केंद्राचे उद्घाटन अमुक तमुक लोकप्रतिनिधीच्या वा मा.मंत्री साहेबांच्या हस्ते संपन्न झाले आणि ह्यासाठी अमुक तमुक लोकप्रतिनिधीने विशेष परिश्रम घेतले.

मागील वर्षी कुलुपबंद स्थितित काही महिने राहिल्याने सर्व सामान्य लोकांच्या आर्थिक स्तराची घसरण होऊन जवळजवळ तो कंगाल झाला आहे. आता या वर्षी तर तो एकवेळ महामारीतून कसाबसा वाचला तरी उपासमारीने निश्चितपणे मरणार. रोजगार संपला असून उत्पन्न शुन्यावर आले असताना, महागाई वाढली आहे. यातहि कृत्रिम टंचाईचा आभास करून, कुलुपबंद स्थिति ही मोजक्या व्यवसाय करणाऱ्या आपल्याच समाज बंधूंना श्रीमंत होण्याची संधी असल्याची जाणीव झाली. आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य लोकांना स्वकीयांनीच इतके बेजार व पंगू केले आहे की दुसऱ्या कशाची आवश्यकता पाहिजे ? लहान लहान व्यवसायिक जगण्याची पराकष्ठा करीत आहे. कुलुपबंद अवस्थेत दिवसरात्र वृत्तवाहिन्यांनी माहिती, ज्ञान व सामाजिक जागृती करण्याचे सोडून नकारात्मक, निराशावादी व भितीदायक मानसिकता निर्माण करण्याचे अखंड व्रत घेतले आहे असे प्रकर्षाने दिसून येते. प्रत्येकाला हा विकार झाला आहे असा त्याच्या मनाचा कल निर्माण करण्यात वृत्तवाहिन्या पुरेपूर यशस्वी झाल्या आहेत हेच दुर्दैव आहे.

समाजाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ही लोकशाही मधे लोक नियुक्त स्थापन झालेल्या सरकारची असते, पण हेच लोक नियुक्त लोक प्रतिनिधी सरकार म्हणून कार्य करताना जनतेच्या हितापेक्षा स्वहितावर विशेष लक्ष ठेवून काम करताना प्रामुख्याने दिसून येत असल्याचा अनेक वर्षांचा समाजाचा अनुभव आहे. व्यवस्था हिच अव्यवस्था ठरल्यामुळे सामान्य जनता ही फक्त उद्घाटन व घोषणा यात गुंतवली गेली आहे. कागदावर असलेले प्रत्यक्षात आल्याचे अपवादाने व तेहि अल्पस्वल्प कधीतरी दिसते हाच काय तो दिलासा.महामारीच्या काळात व्यवस्थेतील अनागोंदी पाहून मा.न्यायपालिका आपण होऊन हस्तक्षेप करते तेव्हा व्यवस्था काय असेल याची जाणीव होते.

अशा या मानसिक अवस्थेत अनेक दिवस कुलुपबंद राहिल्याने व वृत्तवाहिन्यांच्या कृपेने शरीरातील प्राणवायू कमी होतोय की काय अशी मनात पुसटशी शंका डोकावून पाहत असताना प्राणवायूच्या मुलभूत साठ्याकडे म्हणजेच निसर्गात जाण्याचा मोह अनावर झाला, त्यासाठी फार दूर जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझा जन्म व वास्तव्य सह्याद्रीच्या डोंगररांगाने वेढलेल्या ऐतिहासिक व निसर्गसंपन्न भोर तालुक्यातीलच आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेवा चाखता येईल ही सुद्धा मनात भावना होतीच. 'दो गज दुरी व मास्क है जरुरी' असल्याने कोणत्याही व्यक्तिच्या संपर्कात यायचे नाही हा विचार घेऊन सकाळीच बाहेर पडलो. सोबत जेवाणाचा डबा, पिण्याचे पाणी घेऊन भाटघर धरणाच्या पाणीसाठ्याच्या कडेने प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहरांच्या गुलाबी दर्शनाने मनात उत्साह येत होता, धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे विस्तीर्ण नदीपात्र हे जीवनातील सुखदुःखाचे प्रातिनिधीक रुप दर्शवित होते.

नैसर्गिक हवा आणि डोंगरावर असलेली हिरवाई शरीराबरोबर मनाला देखील प्रसन्न करीत होती. रस्त्याच्या कडेला भाताच्या तरव्यासाठी भाजणी करून शेत तयार करण्यासाठी झाडपाल्याचे भारे वाहणारे शेतकरी दिसत होते. प्राथमिक शाळा बंद असल्याने बाळगोपाळ झाडाच्या सावलीत खेळण्यात रममाण होती. तुरळक आंबे व फणस असलेली झाडे मागे पडत होती तर कधी पिकलेल्या उंबराचा सुगंध जाणवत होता. वाढाणे गावाच्या हद्दीतील सिंधींच्या झाडाला आलेले गर्द पिवळ्या रंगाचे फळाचा समूह आकर्षित करीत होता. नागमोडी वळणाच्या रस्त्याने सुमारे ३५ -४० कि.मी.अंतरावर गेल्यावर मळे गाव आले तर त्याच्या पाठीशी असलेला व छत्रपतिंच्या पंचवीस वर्षाच्या वास्तव्याने पावन झालेला दुर्गराज राजगड सुखद दर्शन झाले. मळे गावाच्या सुतारवाडी मधे फणसाच्या झाडाची लगडलेली फळांची प्रकाशचित्रे घेऊन पुढे प्रवास सुरू केला. डेरे गावापर्यंत प्रवास केला.मग उन्हाची तीव्रता व भूक लागल्याने शिदोरी सोडण्यासाठी एखाद्या डेरेदार झाडाखाली बैठक ठोकण्याचा विचार सुरू झाला. परत सुतारवाडी ओलांडून येताना एका वळणावर डाव्या बाजूला मिरकुटवाडी असा फलक दिसला. मग उंचीवर असलेल्या निसर्गसंपन्न मिरकुटवाडी येथे पोहोचलो. तेथे एका बाहेर गावाच्या गुंतवणूकदाराने काही एकर क्षेत्र विकत घेऊन विकसन सुरू केले होते. तेथे एकावर एक असे मोठे तीनचार दगड ठेवलेले दिसल्याने तेथून दिसणारा राजगड किल्ल्याचे दगडांसहित प्रकाशचित्र घेतले.

मिरकुटवाडीतून बैलगाडीचा कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. झाडी झुडुपे, चढ उतार पार करून सुमारे एक कि.मी. अंतरावर ढेबेवाडा आहे. गर्द हिरवाईत असलेले हे ठिकाण आपण अगदी वाड्याजवळ पोहोचेपर्यंत लक्षात देखील येत नाही. डेबेवाडा म्हणजे श्री. बाळासाहेब ढेबे यांचे ऐसपैस कौलारू घर. वाड्याच्या पूर्वेकडून जाणारा रस्ता तेथे घेऊन जातो. डाव्या हाताला उंबराचे मोठे झाड व त्याच्या खोडातील फांद्यात वैरण साठवून ठेवलेली तर उजव्या बाजूला फणसाचे झाड. घराभोवती बांबूची हिरवीगार बेटे तर पश्चिमेस घराला लागून एक भात खाचर. या खाचराच्या बांधावर आंब्याच्या झाडासहित अनेक झाडे त्यामुळे थंडगार सावली. आंब्याच्या झाडाच्या सावलीत चारपायीवर श्री.ढेबे पहुडलेले. त्यांच्या समीप गेल्यावर नमस्कार झाला. तोपर्यंत त्यांच्या लहान नातवांनी पाण्याचा तांब्या व बसायला खुर्ची, चटई आणली. आम्ही जेवणाचा डबा घेऊन जेवण्यासाठी आलोय ही माहिती ओघाने सांगितली. ढेबे हे पंचक्रोशीत एक आदर्श नागरिक म्हणून सुपरिचित. आदरतिथ्य करणारे नम्र स्वभावाचे ढेबे हे समाजात आपल्या वागण्या बोलण्याने लोकांच्या स्नेहास पात्र आहेत.

थंड पाणी पिऊन चटईवर बैठक मारून थोड्या गप्पा झाल्या मग जेवण्यासाठी डबा बाहेर काढला. तोपर्यंत त्यांच्या कुटुंबांनी झ-याच्या पाण्याने भरलेले भांडे, तांब्या, ताकाची किटली, गरमागरम इंदायणी भात, नाचणीची भाकरी, साखर वाटी व कल्हई केलेले तांब्याचे ताट आणले. खूप वर्षे झाली होती अशा पितळी ताटात जेवून. आजूबाजूच्या वृक्षराईतून विविध पक्ष्यांचा किलकिलाट एकप्रकारचे निसर्ग संगीत निर्माण करीत होते मात्र त्यातहि रानकोंबडीचा आवाज सर्वात मोठ्याने ऐकू येत होता. पिशवीतून पाण्याची बाटली न काढता थंडगार व स्वच्छ झ-याचे पाण्याला नकळत पहिली पसंती दिली. गावरान गायीच्या दुधाचे घट्ट दही चमचाने कापून ताटात ठेवले. हे दही नसून खरवसच असल्याचा भास झाला. अप्रतिम चवीचे दही सोबतीला ताकाचा ग्लास, गरमागरम नाचणी भाकरी, भात, दही. निसर्गाच्या सानिध्यात रसायन विरहित जेवणाचे अलौकिक समाधान मिळाले. जेवण करून काही वेळ गप्पा झाल्यावर ढेबे यांचा निरोप घेतला.

संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास दुर्गराज राजगडाला वंदन करून मिरकुटीवाडीचा उतार उतरत असताना मनात विचार आला की, वैश्विक महामारीच्या विषाणूपासून मी स्वतःचे रक्षण करू शकलो तर मनातील अहंकाराचा वाढलेला विषाणू नष्ट करण्यासाठी परत या सह्याद्रीच्या भूमित पुन्हा आले पाहिजे. सह्याद्रीच्या झ-याचे पाणी असेल ही क्षारयुक्त पण सुखी व समृद्ध जीवन जगण्याचा नक्कीच संस्कार देणारे आहे. महानगरातील पिण्याच्या पाण्यात रसायन मिश्रणाने काही रोगजंतू नष्ट होत असतात पण त्याच बरोबर हे रसायन, संस्कार, विचार यांचे गुणधर्म देखील नष्ट करते. आणि अशा या पाण्याने मानवाला ना शारीरिक रोग होतो, ना आयुष्याचा उपयोग होतो.

- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])