चिमाजी अप्पा पेशवे - एक असामान्य योद्धा

बाळाजी विश्वनाथ यांचे कनिष्ठ चिरंजीव चिमाजी बल्लाळ यांचे मूळनाव अनंत (अंताजी) व दुसरे नाव चिंतामणी. त्यांना लाडाने चिमण म्हणत असत. पुढे चिमाजीअप्पा हेच नाव रूढ झाले.

चिमाजी अप्पा पेशवे - एक असामान्य योद्धा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

नरवीर चिमाजीअप्पांची आज तारखेने २८० वी पुण्यतिथी. (तिथीनुसार पौष शुद्ध १० शके १९३९). त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी या लेखात जाणुन घेऊयात.

बाळाजी विश्वनाथ यांचे कनिष्ठ चिरंजीव चिमाजी बल्लाळ यांचे मूळनाव अनंत (अंताजी) व दुसरे नाव चिंतामणी. त्यांना लाडाने चिमण म्हणत असत. पुढे चिमाजीअप्पा हेच नाव रूढ झाले. ६ ऑक्टोबर सन १७१८ रोजी चिमाजीअप्पांना हुजूरचे मुतालिक म्हणून नेमण्यात आले आणि पुढे १७ एप्रिल सन १७२० रोजी पंडित हा किताब व सरदारकी मिळाली. तसेच दमाजी थोरातांकडील सरंजामही देण्यात आला. चौथाई वसूल करण्यात चिमाजीअप्पांचा हातखंडा होता. सातारा दरबारातील अंतर्गत हितशंत्रूंच्या सर्व बातम्या काढून ते बाजीरावांना कळवत असत. छत्रपती शाहूमहाराजांचा चिमाजीअप्पांवर फार लोभ होता. सन १७२४ पासून खऱ्या अर्थाने त्यांनी मुलूखगीरी सुरू केल्यानंतर अनेक मोहीमांतून पराक्रमाचे अक्षरशः तमाशे दाखविले.

चिमाजीअप्पा हे नाव घेतले की आठवते ती वसईची विजयी मोहीम, मात्र प्रत्यक्षात चिमाजीअप्पांनी अशा अनेक यशस्वी मोहीमा केल्या. अप्पा जितके शुर होते तितकेच मुरब्बी, मुत्सद्दी राजकारणीही होते. त्यांचा स्वभाव निःस्वार्थी, कर्तबगार, विनयी, धोरणी, करारी, मनमिळाऊ, नीतीमान, कर्तव्यनिष्ठ, लाघवी व हिशोबात कडक होता. त्यांच्या अत्यंत कडक हिशोबी वृत्तीचा खुद्द राऊंनाही धाक होता. मात्र राऊंना चिमाजीअप्पांची काळजी फार होती. वेळोवेळी ते अप्पासाहेबांना सूचना देत असत. हनुमानाची काळजी श्रीरामाने घ्यावी व श्रीरामाची हनुमानाने. असेच काहीसे होते. महापराक्रमी बाजीराव यांचे तर ते हनुमानच होते. बंधूप्रेमाचे लक्ष्मणालासाजेसे उत्तम उदाहरण म्हणजे चिमाजीअप्पा. माळव्यात गिरिधर बहादूर व दया बहादूर या मोगली सुभेदारांचे पारिपत्य झाल्यावर श्रीमंत बाजीराव यांनी चिमाजीअप्पांना पत्र लिहून सांगीतले की "फौज फिरे कर्ज मरे यैसा विचार करणे." कारण मराठ्यांना राज्यविस्तारासाठी मोठमोठ्या मोहीमा काढाव्या लागत होत्या. त्यासाठी अमाप कर्ज काढावे लागे. मराठी साम्राज्याचा विस्तार होत असला तर कर्ज फेडण्याची जवाबदारी ही केवळ पेशव्यांवर असे. त्यामुळेच श्रीमंत बाजीराव हे कर्ज फेडण्यासाठी कायम उपाययोजना करताना दिसतात. कर्जाच्या काळजीत दिसतात. बाजीराव हे कायम आणि कायम राज्यविस्ताराचा विचार करत होते तर चिमाजीअप्पा राज्यविस्ताराबरोबरच राज्यविस्ताराची घडी बस॓वून महसूल वसूल करत होते. सर्वच मोहिमा सविस्तर द्यायच्या तर एक पुस्तकच तयार होईल. विस्तारभयास्तव काही मोजक्या मोहीमांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

माळवा

दिल्लीतील सत्ता ताब्यात ठेवायची असल्यास माळवा हातात असणे अपरिहार्य होते. गिरिधर बहादूर व दयाबहादूर हे दोन मोगली शाही सुभेदार म्हणजे मराठ्यांच्या दिल्लीमार्गातील प्रमुख अडथळे होते. या दोन सैतान बंधूंनी प्रचंड फौजेच्या जीवावर माळव्यात उच्छाद मांडला होता. त्यांचाकडे अनुभव, मोठा तोफखाना, प्रचंड प्रमाणात फौज, भरभक्कम खजिना, घोडे, हत्ती, बंदुका आदी मुबलक युध्दसज्जता होती. त्याचयासमोर चिमाजीअप्पांची युध्दसज्जता म्हणजे समुद्रासमोर जसा झरा, पण तरीही चिमाजीअप्पांच्या माळव्यातील स्वारीत १७२८ मधे सुभेदार गिरिधर बहादूर मारला गेला. नंतर २९ नोव्हेंबर १७२८ रोजी दयाबहादूर हा ही ठार झाला. दोन्ही सैतानांचा मराठ्यांच्या सैन्याने पार धुव्वा उडवला. या मोहिमेत उदाजी पवार, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर, बाजी रेठरेकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत समशेर गाजवली. या मोहिमेत प्रचंडप्रमाणावर द्रव्य व १८ हत्ती मिळाले. १८ हत्ती व सर्व खजिना चिमाजीअप्पांनी छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी अर्पण केला. हा सर्व खजिना खर्च न होता शाबूत राहिला कारण राऊंची "फौज फिरे कर्ज मरे यैसा विचार करणे." ही आर्थिक - रण निती आणि त्यानितीनुसार वागणारे अप्पासाहेब. यशाच्या कैफात रममाण न होता जो योध्दा प्रत्यक्ष परिस्थितीचा वास्तव विचार करून निर्णय घेतो तोच यशवंत होतो. धाकट्या भावाचे कौतुक करतानाच योग्य तो सल्ला देणे हेही थोरल्या भावाचे कर्तव्य असते. याच आशयाचे थोरले बाजीराव यांनी अप्पासाहेबांना लिहिलेले पत्र खालील छायाचित्रात दिले आहे.

गुजरात

सन १७३० सालापर्यंत गुजराथ प्रांतात राजकीय गुंतागुंत फार वाढली होती. ती सोडविण्यासाठी चिमाजीअप्पा सन १७३० च्या फेब्रुवारीत उदाजी पवारासंह बासवाडा, आलोद, दाहोद मार्गाने गुजरातेत उतरले. त्यांनी दाहोद, चंपानेर शहरे काबीज केली. मार्च महिन्यात पेटलाद येथून खंडणी वसूल केली. धोलका शहरातून लूट मिळवली. गुजरातमधील मधील मोगली सुभेदार सरबुलंदखान याचाकडे खंडणी मागीतली व याच्याशी मराठ्यांचे पूर्वी झालेले महत्त्वपूर्ण करार कायम करून घेतले. गुजरातेत मराठ्यांचा चौथाई अंमल सुरू झाला. सन १७३१ मधे झालेल्या त्र्यंबकराव दाभाडे यांच्या विरोधातील मोहीमेत चिमाजीअप्पांनी मोठी साथ केली. वेळप्रसंगी माघार घेतल्याचे भासवून प्रतिपक्षाला चकवून अखेरीस स्वतःल ठरवलेले मत प्रतिपक्षाकडून मान्य करून घेण्यात चिमाजीअप्पा माहीर होते.

माळवा व बुंदेलखंड

२ ऑक्टोबर १७३२ ते ७ जून १७३३ या काळात अप्पासाहेबांनी पून्हा माळवा मोहीम केली. नर्मदेच्या दक्षिण तीरापासून उत्तरेकडचा २०० मैलांपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आला. सन १७३३ च्या बुंदेलखंड मोहीमेत महाराजा छत्रसाल यांचे वारस हिरदेसाह व जगतराय यांच्याशी संबध दृढ करून राज्यविभागणीचे जटिल कार्य अत्यंत कुशलतेने उरकले. सव्वादोन लाखांच्या प्रदेशाची जहागीरी या वेळी मिळवून बुंदेलखंडाचे भौगोलिक महत्व ओळखून बुंदेली संस्थानिकांनी सेनेसह उत्तरेकडील मोहीमांत पेशव्यांना सहकार्य करावे यासाठी मान्य करण्यात भाग पाडून उत्तरेतील व्युहरचना योजून ठेवली.

कोकण

गुजरात, माळवा, बुंदेलखंड येथे अंमल प्रस्थापित झाल्यानंतर चिमाजीअप्पांवर पश्चिम किनारपट्टीवरील भागात मोहीम राबविण्याचे आदेश छत्रपती शाहू महाराजांनी सन १७३६ च्या एप्रिल महिन्यात दिले. जंजीरेकर राक्षसी सिद्दीने कोकणात भयंकर प्रकार प्रथमपासूनच आरंभले होते. भगवान श्री परशुरामांचे मंदिर उध्वस्त करण्यापर्यंत सिद्दी साताची मजल गेली होती तर सामान्य रयतेला तो किती त्रास देत असेल. अप्पांनी मोठ्या प्रयत्नांनी सिद्दीसाताला त्याच्या अभेद्य जंजीर्‍यांबाहेर यायला भाग पाडले. कुलाब्याजवळील रेवस खाडीभागातील युद्धात १९ एप्रिल सन १७३६ रोजी जंजीर्‍याच्या राक्षसी सिद्दीसाताला चिमाजीअप्पांनी ठार मारले. छत्रपती शाहूमहाराजांनी हे वृत्त ऐकताच तोफा उडविण्याचा व नौबती वाजविण्याचा हुकूम केला. जंजीरेकर मराठ्यांचे मांडलीक झाले. सर्व मुलूख शाहूमहारांच्या कडे आला. पण जंजीरा, पद्मदुर्ग व उंदेरी हे महत्वाचे जलदुर्ग स्वराज्यात आले नाहित. या मोहिमेत सरखेल मानाजी आंग्रेही चिमाजीअप्पा बरोबर सहभागी होते. स्वराज्याचा एक मोठा शत्रू नेस्तनाबूत झाला होता. सदर यसस्वी मोहीमेनंतर छत्रपती शाहूमहाराजांनी चिमाजीअप्पा आणि सरखेल मानाजी आंग्रे यांचा सातारा दरबारात मोठा सन्मान केला.

वसईची पहिली मोहीम

चिमाजीअप्पांची वसईची पहिली मोहीम म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील एका मोठ्या भागाची धर्मांध परकीयांपासून झालेली सुटका व उत्तर कोकणातून अत्याचारी मस्तवाल पोर्तुगीजांचे अंशतः निर्दालन. उत्तर कोकण म्हणजे साष्टी प्रांतात धर्मांध पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर अनन्वित अत्याचार करून धर्मप्रसार चालविला होता. पेशव्यांकडे याबाबत अनेक वर्षांपासून म्हणजे १७२२ पासून पेशव्यांचे सरदार गंगाजी नाईक ( अणजूर आताचे अंजूर ) यांच्याकडून तक्रारी येत होत्या. पण सततच्या मोहिमांतील व्यस्ततेमुळे साष्टीकडे लक्ष देणे शक्य होत नव्हते. सन १७३७ च्या मार्च ते जुलैपर्यंत चिमाजीअप्पा कोकणातील उतरले होते. ही वसईची पहिली मोहीम. या मोहिमेत २८ मार्च सन १७३७ रोजी वसईपासून ९ कोसांवर असणारा अर्नाळा किल्ल्यावर भगवे निशाण फडकले. साष्टीतील ठाण्याचा कोट, आजूबाजूची ठाणी (आताचे गायमुख, नागला बंदर, घोडबंदर, कासार, वडवली, भाईंदर, कामण, उत्तन, वर्सेवा ) व भोवतालचा बराच प्रदेश मराठ्यांनी जिंकून घेतला. पोर्तुगीज ज्या प्रदेशाचा उल्लेख गाय मुखाचा देश असा करत तोच बराचसा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आला. या वसईच्या पहिल्याच मोहिमेत चिमाजीअप्पांनी धर्मांध, मस्तवाल पोर्तुगीजांना जबरदस्त मराठी हिसका दाखवत त्यांच्याकडील मोठा भूप्रदेश हिसकावून घेतला होता. ह्याच हरामखोर पोर्तुगीजांनी सातारचे छत्रपती शाहूमहाराज म्हणजे मांडलीक व पोर्तुगीज म्हणजे पृथ्वीवरील महान देशाचे राजे.. त्यामुळे आम्ही आमचा वकील सातारा दरबारात पाठवणार नाही. अशी मस्तवाल भाषा केली होती.या प्रकारावरून छत्रपती शाहूमहाराजांच्या मनात पोर्तुगीजांबद्दल विशेष राग होता. एका पत्रावरून तो स्पष्ट दिसून येतो. जे दिल्लीचे राजकारण खेळणारे त्यांना कोण कुठले फिरंगी अशी अपमानास्पद वागणूक देतात म्हटल्यावर पोर्तुगीजांबद्दलचा त्यांचा राग रास्तच होता.

त्याच शाहूमहाराजांच्या सेवकाने या मोहीमेच्या माध्यमातून पोर्तुगीजांच्या बेमुर्तखोर डोळ्यात झणझणीत अंजन घातले. काही कारणाने ही मोहीम आटोपती घेऊन चिमाजीअप्पा सन १७३७ च्या जुलैमहिन्यात पुण्याला परतले.

अर्नाळा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांनी सन १७३७ साली शंकराजी केशव फडके यांच्याकडून पून्हा बांधून घेतला. या बद्दल एक शिलालेख आहे. तो असा..

'बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिलें शंकरा |

पाश्चात्यांस वधूनी सिंधू उदरी बांधा त्वरी जंजिरा ||

 अर्नाळा जलदुर्ग चिंतुनि मनीं तुळाजी सुता |

शिल्पज्ञें दृढ शौर्यं जाणुनि तया दुर्गासि संस्थापिता ||

वसईची दुसरी मोहीम

सन १७३८ मधील नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारखेला कार्तिक वद्य एकादशी होती. चिमाजीअप्पांनी आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याच दिवशी कोकणातील मोहीमेवर रवाना झाले हीच ती ऐतिहासिक प्रसिद्ध वसई मोहीम.

वसईचा किल्ला म्हणजे हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा अड्डा बनला होता. येथील पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनरी वेगळीच खेळी खेळत होते. प्रत्यक्ष युध्द न करता वसई प्रांतातील हिंदू समाजातील कोळी, भंडारी, आगरी, कुणबी, ब्राह्मण, महार, मांग आदी लोकांना पकडून वसईच्या किल्यात आणून त्यांचे धर्मांतरण करण्यासाठी अनन्वित छळ करीत. धर्मांतरण झाले ख्रिश्चन धर्म स्विकारला की सोडून देत. अशाप्रकारे जबरदस्तीने धर्मप्रसार करून राज्य विस्तार करण्याचा पोर्तुगीजांचा डाव होता. ह्या सर्व गोष्टींनी परिसीमा गाठली होती. अखेर चिमाजीअप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नरला जबरदस्त दम देणारा निरोप पाठवला.

तो असा - "जर तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्यात घुसतील. मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या देवळात गुंजतील."

हा निरोपवजा दम पोर्तुगीज गव्हर्नरने दुर्लक्षित केला. या वेळी मार्तिन्यु द सिल्व्हैरा द मिनेझिस् हा वसई प्रांताचा गव्हर्नर होता. या आधी पेद्रु द मेलु हा वसई प्रांताचा गव्हर्नर होता. तो मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी गेला असता तोफेचा गोळा लागून ठार झाला होता. त्याच्या जागेवर मार्तिन्यु द सिल्व्हैरा द मिनेझिस् याची नेमणूक २३ डिसेंबर सन १७३८ रोजी झाली. वसईच्या या युध्दाआधी दिड वर्षांपासून पोर्तुगीजांनी गोवा, चौल, मुंबईकर इंग्रज, सुरतेचा नवाब यांच्याशी पत्रव्यवहार करून मोठ्या प्रमाणावर रसद, दारूगोळा, सैनिक अशा सर्व आघाड्यांवरील सुसज्जता ठेवण्यास सुरुवात केली होती. गुप्तचरांकडून मराठ्यांवर पाळत ठेवून बातम्या काढून या संकटासंबधी चर्चा करत होते. दरम्यान मराठेही सज्ज होते. सरखेल मानाजी आंग्रे आरमाराच्या विचित्र हालचाली करून पोर्तुगीजांना चकवत होते. पायदळ व घोडदळांच्या वेगवान हालचालींचा अंदाजही पोर्तुगीजांना धड बांधता येत नव्हता.

अखेर ७ जानेवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी वसईच्या किल्याला वेढा घातला. चिवट पोर्तुगीजांनी तब्बल चार महिने मराठ्यांच्या वेढ्याला दाद दिली नाही. मे महिन्याच्या सुरवातीला चिमाजीअप्पा प्रचंड संतापले आणि मराठ्यांच्या फौजेसमोर जाऊन म्हणाले की "कोट जिंकता येत नसेल तर ठीक आहे. मला तोफेच्या तोंडी बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊन पडेल असे करा. मला त्यानेच समाधान वाटेल."

चिमाजीअप्पांच्या या विधानाने मराठी फौजांत आवेश संचारला. मसलती झाल्यावर किल्याच्या तटबंदी खाली सुरूंग पेरण्यात आले. सुरूंगास बत्ती दिली क्षणार्धात एक प्रचंड मोठा बुरूज आसमंतात उडाला. बुरूजाबरोबर साठएक पोर्तुगीज सैनिकही उडाले. ह्या अचानक भयंकर हल्याची पोर्तुगीजांना कल्पनाच नव्हती. बुरूज उडालेला पाहून मराठ्यांना प्रचंड स्फुरण चढले. बेभान मराठे स्फोटाने पडलेल्या खिंडाराकडे धावले.. आणि अचानक मराठ्यांनीच पेरलेल्या दुसर्‍या सुरंगाचा स्फोट झाला. अनेक मराठे या स्फोटात मारले गेले. पण मराठ्यांचे धैर्य अजिबातच खचले नाही. उलट आणखी त्वेषाने मराठ्यांनी किल्यात घुसण्यास जोर लावला. हर हर महादेव च्या घोषणांनी बेभान झालेले मराठे पोर्तुगीजांवर अक्षरशः तुटून पडले. जलचर चिवट पोर्तुगीजांच्या सैन्यानेही लढण्याची शर्थ केली. पण मराठ्यांच्या या तांडवा पुढे त्याचा टिकाव लागला नाही. अखेर ५ मे १७३९ च्या दिवेलागणीस मोठ्या देशाचा टेंभा मिरवणाऱ्या पोर्तुगाल देशाचा पोर्तुगीज व्हाॅइसराॅय पांढरे निशाण धरून छत्रपती शाहूमहाराजांचे सेवक म्हणजेच चिमाजीअप्पांसमोर गेला. चिमाजीअप्पांनी त्यास व त्याच्या सर्व माणसांना जीवदान दिले व कोटातील सर्व लोकांसह बाहेर पडण्यास फर्मावले. वसईचा किल्ला प्रत्यक्षात रविवार दिनांक १३ मे सन १७३९ म्हणजेच वैशाख वद्य व्दितीया या दिवशी मराठ्यांच्या ताब्यात आला. या समयी विधीवत पूजा करून शिवछत्रपतींचा, छत्रपती शाहूमहाराजांचा, महाराष्ट्रधर्माचा, मराठ्यांचा पवित्र जरीपटका, भगवा ध्वज वसई किल्यावर दिमाखात फडकला.

या मोहिमेत २० किल्ले, ३४० गावांचा प्रदेश, सुमारे २५ लाखांचा दारूगोळ्याची मराठी दौलतीत भर पडली. पोर्तुगीजांची धर्मांध जुलमी सत्ता उत्तर कोकणातून नष्ट होऊन हिंदवी स्वराज्याचा अंमल सुरू झाल्याने प्रजा अत्यंत आनंदली.

नासीरजंग

थोरले बाजीराव दिनांक १ नोव्हेंबर सन १७३९ रोजी नासीरजंगाच्या विरोधात स्वारीस निघाले. नासीरजंगास फेब्रुवारीत राऊंनी जेरीस आणले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला राऊ व नासीरजंग यांची भेट ठरली. या भेटीच्या वेळी चिमाजीअप्पा जातीने उपस्थित होते. तहानंतर राऊ खरगोण प्रांतात गेले व अप्पा पुण्यास येण्यासाठी निघाले.

कुलाबा

वाटेतच मानाजी आंग्रे यांचे मदतीसाठीचे पत्र आले. नानासाहेब व अप्पा एप्रिलमध्ये कुलाब्यास उतरले. मोहीमेदरम्यानच राऊ निवर्तल्याची बातमी आल्याने अप्पा व नानासाहेब पुण्यास परत आले. या अल्प मोहिमेत अप्पांनी रेवदंडा आदी प्रांत पोर्तुगीजांकडून मुक्त करवून घेतला.

दरम्यानच्या काळात नानासाहेबांच्या पेशवाईचे आसन स्थिर होते न होते तोंच राऊ गेल्याने उत्तरेस काहींस जोर चढू लागला होता. परंतु अप्पांनी संबधितांना "रायाचा आसिर्वाद आमच्या व चिरंजीव राजश्री नानाच्या पदरी आहे.." आदी गर्भित इशारायुक्त यथायोग्य पत्र पाठवून दिनांक २३ नोव्हेंबर सन १७४० रोजी नानासाहेबांच्या बरोबर मोहीमेस निघाले. { हिंगणे दप्तर भाग एक लेखांक १७ सदर पत्राचा काही भाग खालील छायाचित्रात देत आहे.}

दरम्यान मोहिमेत अप्पांची प्रकृती फारच बिघडली. तिथीनुसार शुद्ध १० व तारखेनुसार दिनांक १७ डिसेंबर सन १९४० रोजक अप्पांचे निधन झाले. एकापाठोपाठ छत्रपती शाहूमाहाराजांचे रामलक्ष्मण सर्वांस सोडून कायमचे निघून गेले. अशा अनेक अप्रिय घटनांमुळे पौष महिना भट घराण्यास दुःखदायकच आहे असेच वाटते. पौषात घराण्यातील फार व्यक्ती कैलासवासी झाल्या आहेत.. असो..

नरवीर चिमाजीअप्पांना विनम्र आदरांजली!

- श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.