संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम

इ.स. 1681 च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे व आपटे ही गावे लुटली व जाळली. सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना फार त्रास झाला आणि सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी जंजिराच हस्तगत करण्याचे ठरवले.

संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम

इतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक फक्त १०० रुपयात घरपोच मिळवण्याची संधी! अधिक माहितीसाठी 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा!

इतिहास भवानी तलवारीचा हे लोकप्रिय पुस्तक फक्त १०० रुपयात घरपोच मिळवण्याची संधी! अधिक माहितीसाठी 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा!

एप्रिल १६८० पासून सिद्दी माझगाव बंदरात येऊन हल्ले करतच होता. सिद्दीचा दाणागोटा इंग्रजांनी बंद केल्याने सिद्दीच्या लोकांची उपासमार होऊ लागली व सिद्दीचे लोकच सिद्दीविरोधात गेल्याने नाईलाजास्तव सिद्दीला इंग्रजांशी तह करावा लागला. या तहात नागोठणे, पेण, आपटे व अन्य भागात लुटालूट न करण्याची अट सिद्दीने लिहून दिली. याचवेळी औरंगजेबाने सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीज या तीन सत्तांना मराठ्यांविरुद्ध संघर्ष करण्याचे आदेश दिले.

शिवाजी महाराजानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांनी राज्याची सुत्रे हाती घेतली. १० जानेवारी १६८१ साली संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यानंतर त्याच वर्षी संभाजी महाराजांनी औरंगजेबास पहिला तडाखा दिला. सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर हा राजपुतान्याच्या दुर्गादास राठोड याच्यासह दक्षिणेत संभाजी महाराजांकडे आश्रयास आला. त्याने संभाजी महाराजांस औरंगजेबास सम्राट पदावरून हटवण्याच्या कामात मदत करावी अशी दोन पत्रे सादर केली. याच सुमारास सिद्दी मराठ्यांच्या मुलुखातल्या नागोठणे, पेण या भागात लुटालूट करत होता, इंग्रजांनी सिद्दीला मुंबई बेटावर आश्रय दिल्याने सिद्दीला नागोठणे खाडीत शिरून परिसरात लुटालूट करणे शक्य होते हे संभाजी महाराजांचे ध्यानात आल्याने त्यांनी इंग्रजांना अद्दल शिकविण्यासाठी इंग्रजांच्या राजापूरच्या वखारीवर हल्ला चढवला, हल्ल्यामुळे घाबरुन गेलेले ब्रिाटिश वखारीतच अडकून पडले. 

यानंतर संभाजी महाराजांनी आपले वकील आवजी पंडित यांना इंग्रजांना तंबी देण्याकरिता मुंबईस पाठवले व निरोप दिला की, यापूर्वी शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त नाही केला तर संभाजी महाराज इंग्रजांबरोबर युद्ध पुकारतील, त्यामुळे इंग्रजांनी सिद्दीला देत असलेली मदत त्वरीत थांबवावी व त्याला त्याच्या आरमारासह मुंबईबाहेर हाकलून द्यावे अन्यथा संभाजी महाराजांनी मुंबईवर हल्ला करण्याचा निश्चय केला आहे.

याचवेळी सिद्दी आपल्या आरमारासहित सुरतला गेल्याने ब्रिटिशांना थोडे हायसे वाटले व संभाजी महाराजांचा वकील मुंबईस काही काळ राहिला. व ब्रिाटिशांनी जाताना त्यांना अनेक नजराणे संभाजी महाराजांना नजर करण्यासाठी दिले. यामुळे संभाजी महाराज खूष होऊन नागोठणे मुलुखातून आपली तांदळाची गरज  भागेल असे ब्रिटिशांना वाटले परंतु सिद्दीने त्यांच्या मनोदयास परत एकदा तडाखा दिला.  त्याने १६ मार्च १६८१ साली नागोठणे मार्गे मुंबईस जाणारी मराठ्यांची दोन गलबते व त्यातील चार माणसे धरली, त्यामुळे चौल येथे ३००० सैन्यासह मराठा प्रमुख मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत बसला होता. त्याने गलबतांची मागणी केली तेव्हा ब्रिाटिशांनी संभाजी महाराजांच्या भयास्तव ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांना परत केली.

मोगलांच्या कारवायांना तोंड देण्याआधी संभाजी महाराजांना जंजिरेकर सिद्दीशी सामना करावा लागला जो मोगलांचा मांडलिक होता. सिद्दीने उंदेरीहून लहान लहान नौका मुंबईच्या दक्षिणेकडे नागोठणे आणि पेण खाड्यांमध्ये पाठवल्या. तेथील किनार्‍यांवर छापा घालून कैद्यांना गुलाम म्हणून मुंबईस पाठविले. सिद्दीचे वृत्त संभाजी महाराजांना समजताच त्यांनी दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवण्याचा प्रयत्न केला. याकाळात सिद्दी, इंग्रज व मराठे यांच्यामध्ये युद्ध झाल्याशिवाय एक वर्षही उलटत नसे.

इ.स. १६८१ च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे व आपटे ही गावे लुटली व जाळली. सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना फार त्रास झाला आणि सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी जंजिराच हस्तगत करण्याचे ठरवले. 

जंजिरा मोहिमेआधी संभाजी महाराज पन्हाळ्यास होते. जंजिरा मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी संभाजी महाराजांनी नागोठण्यास जाण्याचे ठरविले व या बैठकीसाठी नागोठण्यातल्या दर्यावर्दी आणि आरमाराच्या अधिकार्‍यांना सांगावा धाडण्यात आला.  दुसर्‍या दिवशी नागोठण्याहून पन्हाळ्यास फेरजाब आला की, निवडीच्या दर्यावर्दींचा जमाव नागोठण्यास जमला आहे. संभाजी महाराज पन्हाळ्याहून कोकणात उतरुन नागोठण्यास आले व महत्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. सर्वांना मानविडा देण्यात आला तसेच तब्बल तीन हजार आरमारी सैनिकांना सहा महिन्याचा आगाऊ पगार अदा करण्यात आला.  यानंतर महाराजांनी नागोठणे, पेण व आपटे परिसरात फेर फटका टाकला व पन्हाळ्यास परतले.  अशा त-हेने संभाजी महाराजांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा जंजिरा मोहिमेची गुढी उभारली गेली होती.

संभाजी महाराजांनी प्रथम कोंडाजी फर्जंद यास सिद्दीकडे नोकरीसाठी पाठविले. यामध्ये तो यशस्वी झाला आणि कुटूंबासह जंजिरा किल्ल्यात राहू लागला. मात्र हा कट सिद्दीला कळला व त्याने कोंडाजी फर्जंदसहित त्याच्या कुटूंबास आणि इतर माणसांस ठार केले. यानंतर महाराजांनी जंजिर्‍यास वेढा घालण्याचे ठरवले आणि राजपुत्र अकबर आणि वीस हजार सैनिकांसह रायगडाहून जंजिर्‍यास पोहोचले. सतत १५ दिवस मराठ्यांनी जंजिर्‍यावर तोफा डागल्या. त्यामुळे जंजिरा किल्ल्याच्या भिंती तुटून पडायची पाळी आली. त्यामुळे सिद्दीने आजूबाजूच्या टेकड्यांवर आश्रय घेतला. जंजिरा जिंकण्यास काही काळाचाच अवधी होता तेव्हाच सिद्दीने मोगलांची मदत मागितली आणि औरंगजेबाचा सरदार हसन अलिखानच्या नेतृत्वाखाली भलेमोठे सैन्य घाट उतरून उत्तर कोकणावर म्हणजे सुभे कल्याणवर चाल करून येत होते; त्यामुळे ही मोहीम अर्धवट सोडून महाराजांना वेढा सोडून जावे लागले मात्र कल्याणकडे जाताना संभाजी महाराजांनी चौल प्रांतावर मोगलांनी हल्ला करू नये म्हणून पंधरा हजारांचे सैन्य नागोठण्यात तैनात ठेवले.

मोगलांच्या सांगण्यावरुन सिद्दी व पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध युद्ध पुकारले. याच कटासंदर्भातले एक पत्र गोव्याच्या व्हॉईसरॉयने सिद्दी याकुब याला लिहिले. त्यात त्याने असे सांगितले की, आपली दोन पत्रे मिळाली. एक पत्र २६ ऑक्टोबरचे असून ते मुंबई येथून लिहिण्यात आले आहे. हे पत्र आपले प्रतिनिधी नूर महंमद याने आणले तर दुसरे पत्र वेंगुल्र्याच्या बंदरातून लिहिले आहे. ज्या ठिकाणी आपण आपल्या आरमारासह आहात. ही दोन्ही पत्रे वाचून मला फार आनंद झाला. त्यात आमच्यावर आपला किती लोभ आहे हे दिसून येते. आपण चौलच्या छावणीत आमच्या ठाण्याच्या रक्षणासाठी सैन्य पाठविलेत व त्या सैन्याची आपल्या आरमारासाठी गरज असताना आपण ते सैन्य तिथून काढून घेतले नाहीत. कारण आमचे उत्तरेकडील सेनापती मॅन्युअल लोबुद सिल्व्हेरा यांना चौलच्या मदतीला पाठव म्हणून सांगितलेले सैन्य आले. करंजा नदीच्या पात्रात आपण दोन आणि काही गलबतांसह आपली नौका आमची वाट मोकळी करुन देण्यासाठी पाठवलीत. संभाजी नागोठणे बंदरात शहात्तर गलबतांसह होता व वरील नदींच्या पात्रातील रस्ता रोखण्याचा हेतू होता. आपण ही उपाययोजना अनुभवी सेनापतीप्रमाणे केली, त्यातून आपली आमच्याकडील मैत्री प्रतित होते.

मात्र मोगलांना पोर्तुगीजांनी केलेली ही मदत पोर्तुगीजांच्या आणि सिद्दीच्याही कालांतराने चांगलीच अंगाशी आली, १६८२ च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी चौल (चेऊल) व रेवदंड्यास वेढा दिला, बरेच दिवस तो चालला. संभाजीराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकून घेतले (१६८३), तसेच जुनी साष्टी व बारदेस येथेही चढाई केली. त्यांनी चौलचा वेढा उठवावा, म्हणून पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला. १६८३ च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांची अनेक गावे घेऊन फोंडा लढविला. सहा महिन्यांनंतर चौलचा वेढा उठविला. फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी यांनी मोठा पराक्रम गाजविला.

त्यानंतर महाराजांनी जंजिरा किल्ल्याभोवती एक सेतूच उभारण्याचे काम सुरु केले. यासाठी ५०००० माणसे कामाला लागली. आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक दगड, कापूस, गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हसन अलिखानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण जिंकून घेतल्याने महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभु देशपांडे यांच्याकडे सोपवून रायगडी यावे लागले. जंजिर्‍याला मराठा सैन्याचा वेढा असताना सिद्दीची काही जहाजे मुंबई बंदरात आली, तेव्हा महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला लुटण्याचे आदेश दिले.  १६८२ ते ८५ सालच्या सुमारास पाच हजार सैन्य असणारी गलबते नागोठणे, आणि पेण बंदरांमध्ये सज्ज होती. संभाजी महाराजांचे आरमार १२० गलबते आणि १५ गुराबांनी सज्ज होते. मराठ्यांनी सिद्दीची अनेक जहाजे उडवली व जबर नुकसान केले.