अनुबाई घोरपडे - बाजीराव पेशवे यांच्या भगिनी
अनुबाई घोरपडे या बाळाजी विश्वनाथ यांच्या सर्वात लहान कन्या. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे लग्न इचलकरंजी येथील व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला.
इतिहासातील अनेक स्त्री रत्ने प्रसिद्ध आहेत. काहींनी आपल्या पराक्रमाने तर काहींनी आपल्या त्यागाने इतिहासात आपले नाव कोरले मात्र अनेक ऐतिहासिक स्त्रिया अजूनही फारशा प्रकाशझोतात आल्या नाहीत. शाहू महाराजांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची कन्या अनुबाई घोरपडे (Anubai Ghorpade) या त्यापैकीच एक.
अनुबाई या बाळाजी विश्वनाथ यांच्या सर्वात लहान कन्या. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे लग्न इचलकरंजी येथील व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. एकुलती एक बहीण असल्याने बाजीराव पेशव्यांनी अनुबाईस पुण्यास येऊन राहता यावे म्हणून एक वाडा बांधला होता.
याशिवाय चाकण येथील मौजे वडगाव हा गाव त्यांना इनाम करून दिला होता. अनुबाईंना नारायण आणि वेणू अशी दोन अपत्ये होती यापैकी वेणूबाई हिचे लग्न पेठे घराण्यात झाले होते.
व्यंकटराव घोरपडे यांचे क्षयरोगाने निधन झाले यानंतर संस्थानाचा कारभार अनुबाईनी आपला मुलगा नारायण वयात येईपर्यंत सांभाळला. पुढे पुणे दरबारात आपले वजन वापरून मुलास आर्थिक पाठबळ मिळवून दिले.
छत्रपती शाहू महाराज हे अनुबाईस आपल्या मुलीसारखी मानत असल्याने त्यांनी आजरेमहाल हा परिसर इनाम म्हणून दिला होता. अनुबाई या मोहिमांमध्येही सहभागी होत असल्याचे उल्लेख आहेत. सावनूरच्या व धारवाडच्या मोहिमांमध्ये या स्वतः सहभागी होत्या.
कालांतराने अनुबाई यांच्या जीवनात संकटांची मालिकाच सुरु झाली. मुलगा लहान असताना त्या संस्थानाचा कारभार पाहत होत्या पुढे काही कारणांनी आई व मुलात वितुष्ट निर्माण झाले.
काही काळातच नारायणरावाचे निधन झाले आणि मुलीसही वैधव्य प्राप्त झाले. संकटाची मालिका अशा रीतीने सुरु असताना शेवटच्या एका मोठ्या संकटाची अजून भर पडली. ज्यावेळी सदाशिवराव पेशवे यांचा तोतया पुण्यात आला तेव्हा वार्ध्यक्यामुळे त्यास भाऊसाहेब समजून यांनी सुद्धा त्याच्या बाजूने साक्ष दिली त्यामुळे यावेळी तोतयाचे प्रकरण उघडकीस आले त्यावेळी त्यांचे नातू असलेल्या पेशव्यांची अनुबाईंवर इतराजी होऊन त्यांची सर्व जहागिरी व मामलात जप्त करण्यात आली. पुढे काही मुख्य लोकांनी पेशव्यांना समजावल्याने सव्वा लाख रुपये दंड भरून प्रकरण मिटवण्यात आले.
या सर्व घटनांमुळे वैराग्य येऊन अनुबाई शेवटी काशीस गेल्या व सन १७८३ साली त्यांचे तुळापूर येथे निधन झाले. अनुबाई या धोरणी व महत्वाकांक्षी असून ३८ वर्षे त्यांनी संस्थानाचा कारभार स्वतःच्या हिमतीवर केला मात्र कालपरत्वे जबाबदाऱ्या आपल्या भावी पिढीकडे सोपवाव्यात याचे भान त्यांना न राहिल्याने शेवटच्या काळात त्यांना हे दिवस पाहावे लागले.