प्रयागजी अनंत प्रभू फणसे पनवेलकर

प्रयागजी यांचे वैशिट्य म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या कारकिर्दी पहिल्या.

प्रयागजी अनंत प्रभू फणसे पनवेलकर
प्रयागजी अनंत प्रभू फणसे पनवेलकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य सुरु केले तेव्हापासून त्यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासून जी मंडळी होती त्यापैकी एक म्हणजे प्रयागजी अनंत फणसे पनवेलकर.

प्रयागजी फणसे यांचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला असल्याने त्यांना प्रयागजी प्रभू या नावाने सुद्धा ओळखले जात असे. प्रयागजी यांचे मूळ गावं सध्याच्या रायगड तालुक्यातील पनवेल हे असून १६४९ साली प्रयागजी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत परिचय झाला व तेव्हापासून त्यांनी स्वतःस स्वराज्यकार्यात झोकून दिले.

प्रयागजी यांचे गुण पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सातारा व परळी या दोन परगण्यांचे सुभेदार केले. साताऱ्यातील अंजिक्यतारा या किल्ल्यावरील प्रसिद्ध युवतेश्वर महादेवाच्या मूर्तीची स्थापना प्रयागजी यांच्या कार्यकाळात झाली होती. 

या देवास युवतेश्वर असे नाव मिळण्याचे कारण म्हणजे युवत या शब्दाचा अर्थ कळकीचे झाड असा होतो. एके दिवशी प्रयागजी यांना दृष्टांत झाला व एका कळकीच्या झाडीत माझी मूर्ती आहे तिची तू पुनर्स्थापना कर असे देवाने त्यांस सांगितले व त्यानुसार प्रयागजी यांनी शोध घेतला असता महादेवाची स्वयंभू मूर्ती त्यांना प्राप्त झाली व तिची स्थापना त्यांनी अजिंक्यतारा या किल्ल्यात केली.

प्रयागजी यांचे वैशिट्य म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या कारकिर्दी पहिल्या.

 कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सातारा हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र होते. ज्यावेळी साताऱ्यास राजधानीचा दर्जा मिळाला त्यावेळी त्यांचे महत्व अधिक वाढले.

१६९९ साली औरंगजेबाने ब्रह्मपुरी पार करून वीस दिवसांत वसंतगड गाठला आणि तीन दिवसांत तो किल्ला घेऊन त्याने मिरज पन्हाळा असा मार्ग पकडून अचानक सातारा गाठले. 

औरंगजेब अचानक साताऱ्यावर येईल अशी कुणालाच कल्पना नव्हती त्यामुळे सातारा किल्ल्यावर बंदोबस्त आणि शिबंदी जुजबी होती.

यावेळी बादशाह साताऱ्याच्या उत्तरेस करंजे या ठिकाणी, आजमशाह पश्चिम दिशेस शहापूर येथे आणि दक्षिण आणि पूर्व दिशांना तर्बीयतखान आणि सर्जेखान असे दोन मोगल सरदार मोर्चा लावून बसले होते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा प्रयागजी प्रभू यांनी स्वराज्याच्या सैन्यासह मोठ्या खुबीने सातारा किल्ला लढवला.

मोगल किल्ला सर करण्याचा प्रयत्न करीत होते मात्र प्रयागजी यांनी व स्वराज्याच्या सैनिकांनी किल्ल्यावरून मोठं मोठे दगड मोगलांच्या अंगावर टाकून त्यांना जायबंदी केले, किल्ल्यावरून गोळ्यांचा वर्षाव केला आणि साप आणि विंचू भरलेले रांजण मोगल सैनिकांवर फेकून त्यांना निष्प्रभ केले.

प्रयागजी किल्ला लढवत असताना किल्ल्याखालील मराठे सैन्याने मोगलांवर हल्ला करून आसपासचा वीस कोस मुलुख निरुपयोगी करून टाकला व मोगलांची शिबंदीची व्यवस्था तोडून टाकली.

तब्बल चार महिने झाले तरी प्रयागजी प्रभू आणि इतर मराठ्यांनी केलेल्या अथक प्रतिकारामुळे सातारा किल्ला मोगलांच्या ताब्यात पडला नाही. यावेळी परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी हे किल्ल्यावरील लोकांना परळीच्या येथून धान्यपुरवठा करीत असत.

बरेच दिवस लोटूनही किल्ला ताब्यात येत नाही हे पाहून तर्बीयतखान याने सातारा किल्ल्याच्या ईशान्य दिशेकडील मंगळाईच्या बुरुजाखाली दोन मोठे सुरुंग लावले. मोगलांना सुरुंग लावताना पाहून किल्लयावरील काही लोक बुरुजावर येऊन त्यांना प्रतिकार करू लागले मात्र मोगलानी सुरुंगाना बत्ती दिली आणि भलामोठा स्फोट होऊन एक मोठा कडा बुरुजासहित आकाशात उडून किल्ल्यात आदळला आणि यात शेकडो मराठे मरण पावले.

याचवेळी अनेक मोगल सैन्य किल्ल्यात शिरण्यासाठी एकत्र झाले असता दुसरा सुरुंग फुटला आणि त्यामुळे कोसळलेला एक मोठा कडा मोगलांच्या अंगावर कोसळून दोन हजार मोगल सैनिक ठार झाले.

या स्फोटात मराठे सैनिकांवरही मोठी दरड कोसळली आणि स्वतः प्रयागजी ढिगाऱ्याखाली फसले मात्र दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. सुभेदार जिवंत आहेत हे पाहून मराठ्यांना हुरूप आला आणि ते जोशात लढू लागले.

समोर स्वतः औरंगजेबाने मोगलांना धीर दिल्याने ते सुद्धा मराठ्यांसोबत लढू लागले. हळूहळू किल्ल्यातील सामग्री संपू लागली आणि त्यातच छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी आली आणि सर्वांचा धीर खचला.

यानंतर नाईलाजास्तव परशुराम त्र्यंबक यांनी साताऱ्याचा किल्ला औरंगजेब याचा पुत्र आजमशाह याच्याकडे सोपवला. अजमशाह याने किल्ला घेतल्याने औरंगजेबाने या किल्ल्याचे आजमतारा असे नामांतर केले. 

कालांतराने आजमतारा हे नाव बदलून सातारा किल्ल्याचे अजिंक्यतारा असे नामकरण झाले जे आजही कायम आहे. छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १७०० च्या मार्च महिन्यात झाल्यावर एक महिन्याच्या अंतराने हा किल्ला मोगलांकडे गेला मात्र कालांतराने पुन्हा एकदा हा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला व त्यावेळी या किल्ल्याची जबाबदारी प्रयागजी यांच्याकडेच देण्यात आली.

छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर प्रयागजी त्यांना जाऊन मिळाले व यानंतर थोडक्याच काळात त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

प्रयागजी यांना ज्योतिबा उर्फ अप्पाजी नामक एक पुत्र होते आणि अप्पाजी यांना रावजी आणि बाबाजी नामक दोन पुत्र होते ज्यांनी बडोदा येथे आपल्या कारकिर्दी गाजवल्या.

स्वराज्याच्या चार छत्रपतींची कारकीर्द अनुभवणाऱ्या व त्यांना साथ देणारे प्रयागजी प्रभू अनंत फणसे पनवेलकर हे खऱ्या अर्थी एक स्वराज्यनिष्ठ सुभेदार होते.