शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम

महाराजांनी पाऊण लाख सैन्य घेऊन स्वराज्यातून दक्षिणेत प्रस्थान केले आणि सर्वप्रथम हैद्राबाद येथे दाखल होऊन कुतुबशाहाची भेट घेतली. कुतुबशहाने सुद्धा महाराजांचे खूप मोठे स्वागत व आदरसत्कार केला.

शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६७४ साली झाला व यानंतर त्यांनी यशस्वी केलेली अत्यंत मोठी व महत्वाची मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय. ही मोहीम महाराजांच्या सार्वभौम सम्राट या पदावर संपूर्ण भारतात शिक्कामोर्तब करणारी ठरली.

भारताच्या दक्षिणेतील कर्नाटक राज्यात शहाजी महाराजांची जहागीर होती व तिचा अमल त्यांचे तिसरे पुत्र व शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्याकडे होता. या राज्यात रघुनाथ नारायण हणमंते नामक एक अनुभवी कारभारी शहाजी महाराजांनी नेमले होते व शहाजी महाराजांनंतर ते व्यंकोजींच्या नेतृत्वाखाली कार्य करीत होते मात्र एके दिवशी व्यंकोजींनी त्यांचा काही कारणांवरून अपमान केला व त्यांनी पदाचा त्याग केला व तेथून त्यांनी शिवाजी महाराजांच्या सेवेत सामील होण्याचा विचार केला.

सुरुवातीस रघुनाथपंत यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचे दिवाण मादण्णा यांची भेट घेतली व ज्यावेळी मी शिवाजी महाराजांची भेट घेईन त्यावेळी त्यांना वेळप्रसंगी कुतुबशाहीचे साहाय्य करण्याची विनंती करेन असे सांगितले. पुढील काळात कुतुबशाहीवर जर एखादे संकट आल्यास शिवाजी महाराज हे आपला बचाव करू शकतात हा कुतुबशाहीचा कारभारी मादण्णा यास पटून त्याने महाराजांना देण्यासाठी कुतुबशाहाकडून विनंतीपत्र घेतले व ते रघुनाथपंतांना दिले. रघुनाथपंत येथून रायगडास आले व महाराजांची भेट घेतली आणि दक्षिणेतील जनता आपल्या स्वागतास आतुर आहे तेव्हा आपण लवकरच दक्षिणेस मोहीम काढावी अशी विनंती केली.

यानंतर ज्या मोहिमेची उभारणी झाली ती मोहीम म्हणजेच दक्षिण दिग्विजय मोहीम. महाराजांनी पाऊण लाख सैन्य घेऊन स्वराज्यातून दक्षिणेत प्रस्थान केले आणि सर्वप्रथम हैद्राबाद येथे दाखल होऊन कुतुबशाहाची भेट घेतली. कुतुबशहाने सुद्धा महाराजांचे खूप मोठे स्वागत व आदरसत्कार केला. कुतुबशहाने महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस शुभेच्छा दिल्या व यानंतर महाराजांनी कर्नाटक येथे प्रयाण केले. सर्वप्रथम तुंगभद्रा नदी पार करून त्यांनी त्या प्रांतातील सर्व किल्ले स्वराज्यात आणले आणि या प्रांतातील एक किल्ला म्हणजेच जिंजीचा भक्कम दुर्ग जो दूरदृष्टी असलेल्या महाराजांनी पुढील काळात कुठली आपत्ती आली तर उपयोगी पडेल म्हणून स्वराज्यात आणला होता व याचा प्रत्यय १६८९ साली जेव्हा मोगलांनी रायगड घेतला त्यावेळी तेथून राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह ज्यावेळी जिंजी गाठले तेव्हा आला. महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत जिंकलेल्या या किल्ल्याचा वापर रायगडनंतर स्वराज्याचे केंद्रस्थान म्हणून करण्यात आला होता. जिंजीच्या किल्लयावरूनच राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे मोगलांविरुद्ध स्वतंत्र्ययुध्द सुरु झाले व यात मराठ्यांचा जय झाला.

पुढे महाराजांनी शहाजी महाराजांची व्यंकोजी राजांच्या अंमलाखाली असलेल्या जहागिरीतील वडिलोपार्जित वाटा मागितला मात्र व्यंकोजींनी विरोध केल्याने नाईलाजास्तव महाराजांना व्यंकोजींचा पराभव करावा लागला मात्र सर्व राज्य जिंकून देखील मोठ्या मनाच्या महाराजांनी व्यंकोजींना त्यांचा हिस्सा परत दिला आणि कर्नाटकातील जिंकलेल्या भागाची व्यवस्था रघुनाथ हणमंते यांच्याकडे सोपवली.

येथून महाराज कर्नाटकच्या पश्चिमेकडे आले आणि तेथे त्यांनी बंगळूर, कोलार, हुस्कोटे, शिरे आणि बाळापूर हे पाच परगणे जिंकले आणि अशाप्रकारे सलग अठरा महिने चाललेली ही दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून महाराज पुन्हा एकदा राजधानी रायगडास आले. पुढील काळात मोगलांच्या दक्षिणेतील सुभेदाराने अदिलशाहाची राजधानी विजापूरला वेढा घातला व यावेळी आदिलशाही राज्याने महाराजांकडे मदत मागितली व महाराजांनी आदिलशहास मदत करून मोगलांना विजापूरचा वेढा उठवण्यास भाग पाडले व अशाप्रकारे दक्षिणेतील प्रमुख राज्यांना स्वराज्याचे अंकित होण्यास भाग पाडून महाराजांची कीर्ती समस्त विश्वात दुमदुमली.