राजाराम महाराजांचे जिंजीस प्रयाण व मराठ्यांची स्वामीनिष्ठा
राजाराम महाराज हे कर्नाटकात गेले आहेत ही बातमी ज्यावेळी औरंगजेबास समजली त्यावेळी त्याने तेथील सर्व फौजदारांना राजाराम महाराजांना शोधून अटक करण्याचा हुकूम दिला.
१६८९ साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी राजधानी रायगडास वेढा दिल्यावर छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना मोगलांविरोधात पुढील लढा देता यावा यासाठी महाराणी येसूबाई यांनी मोगलांची कैद पत्करली व खूप मोठा आदर्श प्रस्थापित केला यावेळी अटक झालेल्यांमध्ये यांच्यासहित युवराज शाहू महाराज आणि इतर मातब्बर मंडळी सुद्धा होती.
मोगलांच्या हाती रायगड लागल्यावर सर्व प्रमुख मंडळी एकाच वेळी मोगलांच्या कैदेत सापडली असती तर स्वराज्य वाचणे कठीण होते यासाठी राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यांसह रायगड किल्ल्याचा वाघ दरवाजा उतरून खाली गेले व तेथून प्रतापगड गाठून भवानी मातेचे दर्शन घेतले व मराठ्यांचा लढा सुरु ठेवण्याची प्रतिज्ञा केली.
या दरम्यान मोगल स्वराज्यातील वेगवेगळे भाग ताब्यात घेतच होते त्यामुळे तूर्तास येथे राहणे धोक्याचे आहे हा विचार करून राजाराम महाराजांनी कर्नाटक राज्यातील जिंजी येथे प्रयाण केले जो स्वराज्याचाच एक भाग होता. जिंजीस जातेवेळी राजाराम महाराजांसहित प्रल्हादजी निराजी, खंडो बल्लाळ चिटणीस, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंडेराव दाभाडे, कान्होजी आंग्रे इत्यादी मातब्बर व्यक्ती होत्या.
राजाराम महाराज हे कर्नाटकात गेले आहेत ही बातमी ज्यावेळी औरंगजेबास समजली त्यावेळी त्याने तेथील सर्व फौजदारांना राजाराम महाराजांना शोधून अटक करण्याचा हुकूम दिला. वेषांतर करून मजल दरमजल करीत राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह बंगळूर येथे आले व एका मोठ्या वाड्यात त्यांनी त्या रात्री मुक्काम केला.
यावेळी महाराजांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या पायावर एका गड्याने पाणी ओतले तेव्हा काही लोकांना संशय आला की ज्याअर्थी या माणसाच्या पायावर दुसरा पाणी ओतत आहे त्याअर्थी हा माणूस नक्कीच सामान्य नसावा. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण बंगळूर मध्ये पसरली त्यामुळे खंडो बल्लाळ यांनी महाराजांना व सहकाऱ्यांना सांगितले की परिसरात आपल्याबद्दल चर्चा सुरु आहेत आणि जर ही बातमी मोगलांपर्यंत गेली तर त्यांची माणसे येथे पोहोचण्यास उशीर लागणार नाही तेव्हा आपण त्वरीत येथून निघणे आवश्यक आहे.
औरंगजेबास माहित होते की राजाराम महाराज एकटे नसून यांच्यासहित माणसांचा समूह आहे त्यामुळे त्याने अशा समूहावर नजर ठेवण्यास आपल्या लोकांना सांगितले होते त्यामुळे राजाराम महाराजांनी समूहाचे छोटे भाग करून तेथून पुढे जाण्याचा निश्चय केला आणि आपल्यासोबत काही माणसे घेतली आणि दुसऱ्या गटात खंडो बल्लाळ आणि अजून तीन माणसे राहिली.
मोगलांच्या माणसांनी लवकरच त्या ठिकाणावर छापा घातला तेव्हा त्यांना खंडो बल्लाळ स्वयंपाक करीत असताना दिसले. मोगलांनी त्यांना व सहकाऱ्यांना अटक केली आणि चौकशी सुरु केली. यावेळी खंडो बल्लाळ म्हणाले की आम्ही यात्रेकरू असून रामेश्वर या तीर्थक्षेत्री जात आहोत. यावेळी मोगलांनी विचारले की सोबत आणखी काही जण असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे तेव्हा ती माणसे कुठे आहेत?
यावेळी खंडो बल्लाळ म्हणाले की आम्ही एवढेच आहोत. ती माणसे वेगळ्या ठिकाणाहून आली होती त्यामुळे ती जेवण करून अगोदरच निघून गेली. खंडो बल्लाळ यांच्या उत्तरावर फौजदाराचा विश्वास बसला नाही त्यामुळे त्याने खंडो बल्लाळ व त्यांच्या सहकाऱ्यांवर अत्याचार सुरु केला. सर्वांच्या डोक्यावर अतिशय वजनदार दगड ठेवण्यात आले आणि चाबकाचे फटके देण्यात आले. राखेचे चटके दिले तरी कोणीही फितुरी केली नाही.
खंडो बल्लाळ आणि सहकारी एकूण तीन दिवस मोगलांच्या कैदेत होते व यावेळी सर्वानी अन्न पाण्याचा त्याग केला आणि आम्हाला सोडल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करणार नाही असा हट्ट धरला व शेवटी हे सर्व खरोखरीच यात्रेकरू असावेत असे वाटून त्याने सर्वांची सुटका केली.
सुटकेनंतर काही दिवसांनी सर्वजण राजाराम महाराजांना जाऊन मिळाले व तेथून सर्व सुखरूप जिंजीस पोहोचले व येथून त्यांनी मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा उभारला. खंडो बल्लाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपल्या स्वामिनिष्ठतेची प्रचिती वेळोवेळी दिली होती व या प्रसंगी पुन्हा एकदा मराठ्यांच्या स्वराज्यनिष्ठतेची प्रचिती आली होती.