लारी - आकाराने अजब असे नाणे

लारी हे नाणे आपल्या वेगळ्या आकारासाठी प्रसिद्ध असून केसाला लावण्याच्या पिनेसारखे हे नाणे दिसते.

लारी - आकाराने अजब असे नाणे

मानवी समाजव्यवस्थेत चलन पद्धतीस अनन्यसाधारण महत्व आहे. व्यापार व देवाणघेवाण ही चलनाशिवाय होणे अशक्य. प्राचीन काळापासून नाणी पाडण्याचा अधिकार असणे हे राजसत्तेचे प्रतीक मानले गेले आहे व ज्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी त्या सत्ताधीशाची नाणी प्रचलित असायची.

आपल्या भारतातच स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राज्ये होती व या राज्याची वेगवेगळी नाणी असत. या नाण्यांची यादी करायची झाली तर लाखोंच्या घरात होऊ शकेल. या लेखात आपण लारी या आकाराने अजब अशा नाण्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

लारी नाण्याचा उगम मुळचा भारतातील नव्हे. मध्यपूर्वेतील इराण या देशात लारी हे नाणे प्रथम पाडण्यात आले. इराण मध्ये लार नावाचा एक प्रदेश आहे तेथे हे नाणे प्रथम पाडण्यात आल्याने नाण्यास लारी हे नाव मिळाले. लारी नेण्यास लारीन या नावानेही उच्चरले जाते.

आदिलशाही राज्याचा बादशाह युसूफ आदिलशाह जेव्हा गादीवर आला त्यावेळी आपल्या नावाची नाणी पाडण्याचा विचार त्याने केला. मात्र कुठल्या प्रकारची नाणी असावीत याचा अभ्यास करण्यासाठी त्याने काही माणसे विविध राज्यांत पाठवून दिली. आदिलशाहच्या माणसांनी मग परत येताना नमुन्याची गझनीच्या महमूदचे टांक, इराणहून अश्रफी आणि लारी इत्यादी नाणी आणली. या सर्व नाण्यांत युसूफ आदिलशहाला लारी हे नाणे खूप आवडले. चांदीचे हे नाणे सर्वप्रथम इराणमध्ये शहा अब्बास याने पाडले होते.

यानंतर लारी नाण्यांची पहिली टांकसाळ आदिलशहाने विजापूरला सुरु केली. युसूफ आदिलशाहने पाडलेल्या लारी या नाण्याच्या एका बाजूस हिजरी सन आणि सुलतान युसूफ आदिलशाह अशी अक्षरे आणि दुसऱ्या बाजूस झरब लारी अशी अक्षरे होती. अल्ली आदिलशाहने पाडलेल्या लारी नाण्यांवर एकाबाजूस हिजरी सन १०७१ आणि सुलतान अल्ली आदिलशाह अशी अक्षरे होती आणि दुसऱ्या बाजूस झरब लारी डांघ सिक्का अशी अक्षरे होती. 

दक्षिण कोकण व गोवा प्रांतात जी आदिलशाही लारी तयार होत त्यावर एका बाजूस १११ अल्ली आदिलशाह आणि दुसऱ्या बाजूस सालारी वाले अशी अक्षरे होती.

लारी हे नाणे आपल्या वेगळ्या आकारासाठी प्रसिद्ध असून केसाला लावण्याच्या पिनेसारखे हे नाणे दिसते. पूर्वी मध्यपूर्वेतील राष्ट्रांचा व्यापाराच्या अथवा राजकीय निमित्ताने इतर राष्ट्रांशी समुद्रमार्गे संबंध येत असे. समुद्रप्रवास करताना समुद्री लुटारूंचा धोका कायम असायचा अशावेळी गोल आकाराची नाणी थैलीत नेली असता ती लुटली जाण्याचा अधिक धोका असायचा म्हणून लांब आकाराच्या लाऱ्या अंगरख्याच्या आतील भागात कमरपट्टा लावून त्यामध्ये खोचून ठेवली जात त्यामुळे चोरीची भीती थोडी कमी होत असे.

कमीत कमी जागेत जास्तीत जास्त नाणी नेता यावीत यासाठी सुद्धा लारी नाण्याचा आकार लांबट केला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे.

कालांतराने ही नाणी भारतातील पश्चिम किनारपट्टी भागात पाडली जाऊ लागली. या नाण्यांवर त्या त्या राजवटीचे शिक्के कोरलेले असत. आदिलशाही काळात भारतातील लारी नाण्यांचा उदय झाला. आपल्याकडे या नाण्यांना लाडी असे म्हटले जाई. लारी नाण्यांबाबत एक दंतकथा प्रख्यात आहे त्यामध्ये 'पूर्वी आदिलशहाच्या राण्या खरेदीसाठी बाजारात गेल्या की तेथे त्या पैसे म्हणून केसातील पिना काढून देत म्हणून पुढे केसांतील पिनांच्या आकाराची ही नाणी काढण्यात आली'.

त्याकाळी एक होन म्हणजे पाच लाऱया व एक लारी म्हणजे बारा शिवराई असे प्रमाण असे. अर्थात वेगवेगळ्या काळात हे प्रमाण बदलत होतेच. महाराष्ट्रात कोकणातील दाभोळ व चौल या ठिकाणी लारी पाडण्याची टांकसाळ सुरु करण्यात आली होती. त्याकाळची चलने ही ठराविक प्रदेशात प्रचलित असावयाची व लारी हे नाणे प्रामुख्याने कोकणात प्रचलित होते. लारी तयार करताना चांदी या धातूचा प्रामुख्याने वापर केला जात असे. लारी नाण्यांमध्ये अर्ध लारी नावाचा सुद्धा एक प्रकार अस्तित्वात होता. 

स्वराज्याच्या खजिन्यात सुद्धा विपुल प्रमाणात लारी नाण्यांचा साठा असल्याचा उल्लेख येतो. दाभोळी लारी, चौली लारी, हरमजी लारी असे लारी नाण्याचे प्रकार त्याकाळी होते. चौली लारीसच बसरी लारी असे दुसरे नाव होते. कालपरत्वे तत्कालीन चलने बंद पडली मात्र आजही ही नाणी संग्राहकांच्या माध्यमातून टिकून आहेत. भारतीय चालनव्यवस्थेतील सर्वच नाणी म्हणजे इतिहासाचा एक भाग आहेत त्यामुळे त्यांचे जतन होणे खूप महत्वाचे आहे.