धुमाळ देशमुख वाडा - पसुरे

मनात असलेला पसुरे येथील वाडा पाहण्याचा योग अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ आॕगष्ट २०२१ ला आला. दुपारी १ वाजता श्री. वैभवकुमार साळवे यांचेसह भोरहून दुचाकीवरून पसुरेकडे निघालो.

धुमाळ देशमुख वाडा - पसुरे

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुखपुस्तिकेवरील "ऐतिहासिक वाडे व गढी" या समुहावर संकेत फडके यांनी पसुरे येथील धुमाळ देशमुख यांच्या वाड्यावरील लिहलेला लेख वाचण्यात आला, तेव्हापासून एकदा तिथे जाण्याचा विचार मनात सुरू झाला होता पण, ते काहीतरी निमित्ताने लांबणीवर पडत होते. दि.२९ मे २०२१ रोजी दुपारनंतर एकदा वेळवंड येथील भाटघर धरण पाणीसाठ्यात गेलेले श्री नागेश्वर मंदिर पाहण्यासाठी पसुरेहून पुढे गेलो होतो, परंतु उशीर झाल्यामुळे पसुरे येथील धुमाळ देशमुख वाडा पाहता आला नव्हता. 

मनात असलेला पसुरे येथील वाडा पाहण्याचा योग अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ आॕगष्ट २०२१ ला आला. दुपारी १ वाजता श्री. वैभवकुमार साळवे यांचेसह भोरहून दुचाकीवरून पसुरेकडे निघालो. भोरपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावरील पसुरेला जाताना निर्मलनगर - बारे खुर्द व बुद्रुक - म्हाळवडी - कर्नवडी करीत पसुरे येथे पोहोचलो. भोर तालुका म्हणजे शिवकाळच्या इतिहासाला दिशा देणारी ऐतिहासिक व निसर्गसंपन्न भूमी. बारा मावळापैकी वेळवंडी नदी तीराच्या दुतर्फा असलेली सुमारे बत्तीस गावांचे मिळून " वेळवंड " खोरे वसले आहे, मात्र प्रत्यक्षात यात तीसच अस्सल ग्रामीण संस्कृतीची जपणूक करणारी खेडी आहेत. वेळवंडी नदीवर ब्रिटिशकाळात म्हणजेच इ.स.१९२७ साली २४.५ टि.एम.सी. पाणीसाठा करू शकणारे भाटघर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरण झाल्यामुळे या खो-यातील गावे विस्थापित झाली आहेत.पावसाळा असल्याने वाढलेला भाटघर धरण पाणीसाठा रस्त्याच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हिरवाईचा शालू पांघरलेला सह्याद्री. झाडाझुडुपातून मोर लांडोर यांचे सुखद दर्शन मनाला आनंद देत होते. खाचरातील आकृतीबंध हिरवेगार भाताचे पीक शेतकऱ्यांच्या कष्टाचे उज्वल भविष्य घडविणेसाठी उत्सुक असल्याचे पाहून समाधान वाटत होते. वळणावळणाच्या रस्त्याने जाताना निसर्गदेवतेचे सौंदर्य डोळ्यात साठवित पसुरे येथे पोहोचलो.   

पसुरे गावच्या मध्यवस्तिमधे रस्त्याच्या उजव्या बाजूस पूर्वाभिमुखी दुमजली सागवानी लाकूडकाम केलेला धुमाळ देशमुख यांचा सुमारे शंभर वर्षापूर्वीचा वाडा दिसून येतो. या वाड्यातील मा.श्री.चंद्रकांतराव कृष्णराव देशमुख व त्यांच्या जेष्ठ बंधुंचे चिरंजीव मा.श्री.प्रकाशराव उर्फ काका धुमाळ देशमुख यांनी सुहास्य वदनाने आमचे स्वागत केले. वाड्याच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर दक्षिणोत्तर असा भव्य दिवाणखाणा आहे. दिवाणखाना जरी शंभर वर्षापूर्वी तयार केला असेल तरी धुमाळ देशमुखांच्या ऐतिहासिक महत्त्वाची ओळख करून देण्यासाठी माझ्या मतानुसार खूप काही सांगून जातो. तत्कालीन लोकजीवनाचे विविध पैलू नबोलता उलगडतो. दिवाणखान्यात टांगलेले विविधरंगी काचेच्या हंड्या, दक्षिणेस असलेले जाळीदार सागवानी चौकटीत देवघर व समोरच्या भिंतीजवळ असलेली सागवानी लाकडातील सुमारे चार फूट रूंद व तितक्याच उंचीची भव्यदिव्य चारचाके असणारी संदुक. दिवाणखान्यातील खांबावर त्यांच्या पूर्वाजांनी केलेल्या सांबराची/ हरणाची शिंगे दिसून येतात. अगदी वाघाची कातडी व हरणाची कातडी पूर्वी त्यांच्याकडे होती हे मा.श्री.चंद्रकांतराव व श्री.प्रकाशराव सांगतात.     

वेळवंड खो-याची ऐतिहासिक काळातील देशमुखी ही बाबाजी अढलराऊ यांच्याकडे असल्याचा उल्लेख येतो, तर आडनावाचा उल्लेख ' डोहर किंवा ढोर ' येतो. या घराण्याला 'अढळराव' असा किताब होता. वेळवंड खो-याचे देसकुलकर्णी हे मोरो विठ्ठल हे असल्याचा उल्लेख  २१ मार्च १६५७ च्या मजहरात येतो. या खो-यात असणारी लोकवस्ति लहान लहान खेड्यात वास्तव्य करीत होती व त्या गावांच्या नावामागे मौजा ही उपाधी असायची, मात्र ऐतिहासिक कागदपत्रात या खो-यातील फक्त हर्णस या गावाच्या नावामागे कसबा ही लावलेली होती. यावरून हर्णस हे वेळवंड खो-याचे मुख्य ठिकाण होते हे अधोरेखित होते. याच हर्णस गावातील बाबाजी अढलराऊ यांचे वंशज श्री.धुमाळ देशमुख हे भाटघर धरण बांधकामानंतर वेळवंडी नदी प्रवाहच्या हर्णसच्या बरोबर पलिकडील तीरावर असलेल्या पसुरे जुने गावठाण येथे स्थलांतरीत झाले. हर्णस येथील पुरातन वाडा हा पाणीसाठ्यात गेला होता तर त्यांच्या ऐतिहासिक पुरूषांच्या समाधिशिळा आजदेखील हर्णस येथील श्री.वाढेश्वर मंदिराच्या परिसरात आहेत. त्यानंतर हा तिसरा वाडा तत्कालीन वंशजांनी बांधला असून आजचे त्यांचे वंशज मोठ्या श्रद्धेने सांभाळीत आहेत. कसबा हर्णस येथे शिरवळ परगण्याच्या देशमुखीविषयी एक मजहर शुक्रवार ३ डिसेंबर १६८० रोजी झाला होता, या मजहरच्या हाजिर मजालसीत मोरो विठ्ठल याच्या मुलाचा उल्लेख 'अंताजी मोरदेव देशकुलकर्णी ता| वेलवंडीखोरे' असा येतो.  

श्री.धुमाळ यांच्याशी चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना बाबाजींना अढळराऊ ही किताब आदिलशाही कालखंडात म्हणजेच शिवपूर्व काळात मिळालेला असून बेलसर व प्रतागड रणसंग्रामात धुमाळ देखमुखांचा सक्रिय सहभाग होता. श्री.धुमाळ यांनी कलात्मक व मजबूत संदुकीतून दोन तरवारी, एक भाला, एक कट्यार आम्हाला दाखविली तसेच त्यांच्याकडे असलेल्या पेशवेकालीन दुदांडी शिवराई पैसे व अंकुशी रुपये प्रत्यक्ष हातात घेण्याचा योग आला.( नाण्यांविषयी आमचे मित्र श्री. किरण शेलार यांस प्रकाशचित्रे पाठवून माहिती घेतली ती येथे दिली आहे) याचवेळी पत्र समाप्ति किंवा मंजुरीदर्शक असणारी " मोर्तब सूद " मुद्रा देखील पाहावयास मिळाली. 

मग आम्ही त्यांच्या देवघरात जाऊन देवदर्शन घेतले. सुमारे दोन तासांपेक्षा जास्त वेळ धुमाळ देशमुख यांच्या वाड्यात इतिहास काळातील घडामोडीवर चर्चा करताना अतिशय आनंद झाला. श्री. धुमाळ देशमुख यांच्याशी झालेल्या गप्पा अविस्मरणीय आहेत. माणूसकी जपणारे, स्वागतास सदैव हजर असणाऱ्या श्री.धुमाळ यांच्याकडे चहापान घेऊन परतीच्या वाटेला लागलो. 

(या लेखातील प्रकाशचित्रे श्री.वैभवकुमार साळवे यांनी घेतलेली आहेत, तर नाण्यांचे विश्लेषण श्री.किरण शेलार यांनी प्रकाशचित्रांचे आधारे केलेले आहे.)    

- © सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])