संदकफू - एक रमणीय ट्रेक
आम्हाला दोघांनाही पर्यटनाची विशेष आवड असल्यामुळे सतत नव्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्याचा ध्यास लागलेलाच असतो. ह्या ध्यासातूनच दोन वर्षापूर्वी आम्ही संदकफू हा अतीशय रमणीय परिसराचा ट्रेक केला.
हा ट्रेक तसा फारसा अवघड नाही. रोज ८ ते १० कि.मी. अंतर चालावे लागे. शिवाय संदकफू पर्यंत बर्यापैकी गाडीरस्ता असल्यामुळे लँडरोव्हर ह्या गाडीने जाता येते. त्यामुळे ज्यांना चालायचे नसेल त्यांना जीपने जाता येते. परंतू हिमालयातील व ट्रेकरुटवरील रस्ते हे खाचखळगे व वळणाचे असल्याने प्रवास तसा सुखावह होत नाही पण चालण्यात पर्याय उपलब्ध होऊ शकतो असा हा रुट होता. ट्रेकचा मार्ग दार्जिलींग, मणीभंजन, मेघमा, ग्यारीबासा व कालीपोखरी व संदकफू असा जातो. प्रत्यक्ष चालण्यास सुरुवात ही मणिभंजन येथून होते व जीपही येथूनच मिळतात. ट्रेकरुट हा सिंगलीला फॉरेस्ट मधून जात असल्याने प्रचंड झाडी आहे. पाईन देवदार हे वृक्ष व होडेडेंड्रॉन, मॅग्नॉलीया ह्या फुलांनी लगडलेली झाडे मन मोहून टाकतात. इतरही अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, फुले बघून वेडच लागते. येथे जाण्यास मर्च ते मे हा उत्तम काळ. ह्या मोसमात लाल, पांढरी, जांभळी, पिवळी अशी फुलांनी बहरलेली झाडे व हवा सुद्धा असल्यामुळे हिमशिखरे बघायला मिळतात.
पुण्याहून निघून आम्ही पहिला मुक्काम दार्जिलिंगमध्ये होडेडेंड्रॉन डेलमध्ये घेतला. पहाडावरचेच हे सुंदर लाकडी हॉटेल. त्याच्या मागील विस्तारावर होडेडेंड्रॉन फुलांच्या असंख्य जाती, मॅग्नोलीयाची पांढरी शुभ्र फुले, त्यांचा मंद सुगंध अशा परिसरात पसरला होता. तेथील शुद्ध थंड हवा भरभरुन घेऊन एक नवचैतन्य मिळवून आम्ही मणिभंजन या प्रत्यक्ष ट्रेकच्या गावी पोहोचलो. आमच्यापैकी सहा जणांसाठी व सामानसाठी सहा लँङरोव्हर ठरवून उरलेले ६ जण चालत जाण्यास निघाले. मणिभंजन ते मेघमा हे अंतर ८ कि.मी. २ कि.मी. अंतर चढण चढून गेल्यावर एक सुंदर हिरवीगार गवताने आच्छादलेली टेकडी लागली. तेथे थोड्या वेळ रेंगाळल्याशिवाय मन पुढे जाऊ देईना. त्यामुळे तेथे विश्राम केला.
तेथील लाजवाब वातावरणात गरम चहाही मिळाल्याने पहिला चालण्याचा शिणच गेला. उत्साहाने पुढील चालणे सुरु केले आणि मेघमा ह्या आमच्या पहिल्या कॅम्पला पोहोचलो. भरपूर थंडी असल्याने सर्वांचे अंगभर लोकरीचे कपडे चढले होते. गाव तसे अगदी छोटे, भोवती चहाचे मळे व झाडी होती. एक प्राचीन गोंपाही होती. दुसर्या दिवशी ग्यारीबासा ह्या पुढील कॅम्पवर जाण्यासाठी निघालो. एक तासाचे अंतर चालल्यावर टुमलींग गावी पोहोचलो आणि प्रथमच आम्हाला दूरवर कांचनगंगा पंडेम या हिमशिखरांनी दर्शन दिले. हवा स्वच्छ असल्यामुळे शिखरांवर ऊन पडून ती चकाकत होती. येथुन पुढील रस्ता जंगलातून असल्याने दरीत लाल रंगाची होडेडेंड्रॉन फुले, ढगाळ थंड हवा, नागमोडी रस्ते व जंगलातील अभेद्य अशी शांतता यांचा अनुभव खरोखरच वर्णनातीत होता. हा संपुर्ण ४-५ तासांचा रस्ता अनुभवत ग्यारीबासा येथे केव्हा पोहोचलो ते समजलेच नाही. ग्यारीबासा हे असेच २५/३० उंबर्यांचे गाव, टुमदार लाकडी हॉटेल, नेपाळ-भारत बॉर्डर असल्यामुळे हॉटेल समोरच सुरक्षादलाची छावणी होती.थोडेफार चेकींगही चालायचे.
येथेच कुमांऊचे गेस्ट हाऊसही आहे. जुजबी वस्तू मिळणारे गावात एकच दुकान. बाकी सर्व सामान बाहेरुन येते. थंडी मात्र प्रचंड होती त्यामुळे सतत गरम पाण्याची गरज लागायची, अगदी उकळते पाणी सुद्धा गरमच वाटायचे. हॉटेलमध्ये फायरप्लेस असल्यामुळे त्या उभेजवळच मुक्काम ठोकून गप्पा गाणी चालत. दिवसा चालल्यावर रमत गमत घालवलेल्या अशा संध्याकाळी पण छान वाटायच्या. जीपने जाणारी मंडळी चालाणार्यांच्या आधीच पोहोचून ताजीतवानी होऊन आम्हा चालणार्यांसाठी सज्ज असायची. आता पुढील मुक्काम हा ९००० फुटांवरील कालपोखरीला होता. हे चालायला अंतर ६ कि.मी. होते पण रस्ता उंची १५०० फुटांनी वाढणार होती त्यामुळे चढण थोडी जास्त होती. कालीपोखरीला सकाळी ११ वाजता पोहोचलो.
- सौ. सुनिता सुरेश बापट