मार्लेश्वर मंदिर - एक गूढरम्य तीर्थस्थान

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर हे स्थळ पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या देखील महत्वाचे आहे.

मार्लेश्वर मंदिर - एक गूढरम्य तीर्थस्थान

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मारळ गावाचे दैवत म्हणून या स्थानास मार्लेश्वर या नावाने ओळखले जाते. पूर्वी हे दैवत देवरुख येथे होते व त्याची स्थापना भगवान परशुराम यांनी केली होती. मात्र शिलाहार राजवटीस उतरती कळा लागल्यावर शत्रूंनी कोकणात अनाचार माजवला आणि खून, चकमकी, लुटालूट या सर्वांनी जनता त्रस्त झाली. 

देवरुख येथील शंकरास हे सारे असह्य झाल्याने त्याने मंदिर सोडून डोंगर दऱ्यात राहण्याचा निश्चय केला व तेथून त्याने सह्याद्रीच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रवास करीत असताना त्यास एक झोपडी दिसली व त्या झोपडीत शिवनामाचा जप करीत असलेला एक भाविक त्याच्या दृष्टीस पडला. भाविकाने शंकरास आपल्या झोपडीत घेतले मात्र मार्लेश्वराने त्यास सह्याद्रीतील गुहेचे स्थान विचारले व त्यानुसार भाविकाने शंकरास अंधारात सोबत देऊन दाट जंगलातील त्या गुहेच्या स्थानापर्यंत पोहोचते केले. 

देव नाहीसा झाल्याचे जेव्हा मूळ मंदिरातील पुजाऱ्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने ही खबर रहिवाशांना सांगितली आणि सर्वांच्या दुःखास पारावर राहिला नाही. त्याच रात्री पुजाऱ्यास स्वप्नात शंकराचा दृष्टांत झाला व या दृष्टांतात त्याने आपण माणसा माणसात वाढलेल्या दुराचारास कंटाळून अरण्यात वास्तव्य करीत आहोत असे सांगितले. 

पुजाऱ्यास दृष्टांत झाल्यावर सर्व गावकऱ्यांनी देवाच्या शोधास प्रारंभ केला व जंगजंग पछाडले मात्र काही केल्या देव सापडेना मात्र देव गाव सोडून निघून गेल्यावर परिसरात रोगराई व परकीय आक्रमणे अशी संकटे उद्भवू लागली. मात्र पुढे परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन अन्यायाच्या विरोधात लढा उभारला आणि परकीय शत्रुंना कोकणातून पिटाळून लावले आणि ज्या ठिकाणी हा अभूतपूर्व संग्राम झाला अर्थात नागरिकांनी शत्रुंना ज्या ठिकाणी 'मारलं' ती जागा पुढे 'मारळ' या नावाने ओळखली जाऊ लागली. 

पुढे इसवी सन १८०० मध्ये आंगवलीचे सरदार आणेराव साळुंके शिकारीस सह्याद्रीतील जंगलात गेले असता त्यांना एक शिकार दृष्टीस पडली मात्र ती त्यांना पाहताच पळू लागली व साळुंके तिचा पाठलाग करू लागले. पळता पळता शिकार एका गुहेत शिरली व अचानक वरून एक दगड गुहेवर पडून गुहेचे दार बंद झाले. सरदाराने गुहेवरील दगड बाजूला सरल्यावर त्यांना समोर मार्लेश्वराचे दर्शन झाले.

आणेराव साळुंके यांना ज्या दिवशी मार्लेश्वराचे दर्शन झाले तो दिवस मकर संक्रांतीचा असल्याने दर संक्रांतीला येथे खूप मोठा उत्सव भरतो. याचवेळी मार्लेश्वराचा विवाहसोहळा देखील साजरा केला जातो व साखरपा येथील गिरिजादेवीस पालखीतून वाजत गाजत मार्लेश्वरासोबत विवाहासाठी आणले जाते. यावेळी इतर अनेक गावातून नागरिक देवतांच्या पालख्या घेऊन या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी येतात.

मार्लेश्वराच्या मंदिराशेजारीच धारेश्वर नावाचा धबधबा असून ते येथील एक विशेष आकर्षण आहे. सह्याद्रीच्या कातळातून सहस्त्र धारांनी कोसळणारा हा धबधबा आपल्या नादमधुर ध्वनीने पर्यटकांना मोहून टाकतो. परिसरातील विपुल वनराई आणि शांतता या सुंदर वातावरणात आणखी भर घालतात. मुख्य गुहेच्या दारात गंगोत्री या नावाने परिचित असलेल्या टाक्यांचे पाणी आहे व गुहेच्या समोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलीचा अद्यापही थांग लागलेला नाही. या गुहेत व परिसरात अनेक सापांचे सुद्धा अस्तित्व आहे व त्यांचे दर्शन मिळणे खूप भाग्याचे मानले जाते मात्र इतके सर्प परिसरात असूनही कुणा भाविकांस त्यांनी दंश करण्याची घटना अद्यापही घडलेली नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेले मार्लेश्वर हे निसर्गरम्य धार्मिक स्थळ संगमेश्वरहून ३६ किलोमीटर तर देवरुखपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. एकाच वेळी कोकणचे सौंदर्य व सह्याद्रीचे रौद्र रूप पाहायचे असल्यास मार्लेश्वर येथे एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे.