उदाजी पवार - धार संस्थानाचे संस्थापक

१७२४ साली उदाजी पवार यांनी मध्यप्रदेशातील धार हे आपले मध्यवर्ती केंद्र करून तेथे आपले ठाणे बसवले.

उदाजी पवार - धार संस्थानाचे संस्थापक
उदाजी पवार

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे पुढील काळात साम्राज्यात रूपांतर झाले होते. छत्रपतींच्या आज्ञेखाली राहून अनेक मराठी शूर पुरुषांनी आपल्या कर्तबगारीने स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यात हातभार लावला. अशाच थोर पुरुषांमधील एक म्हणजे उदाजी पवार.

उदाजी पवार यांना धार संस्थानाचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. उदाजी पवार यांचे मूळ गावं पुणे जिल्ह्यातील मलठण हे असून त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी पवार असे होते. संभाजी पवार यांच्याकडे मलठणची पाटीलकी होती. संभाजी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याने उदाजी पवार यांनी लहानपणापासूनच स्वराज्यातील सुराज्याचा अनुभव घेतला होता.

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात उदाजी पवार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असावी कारण १६९८ साली औरंगजेबाविरोधात मराठे व राजपुतांची युती झाली त्यावेळी उदाजी पवार यांनी माळव्यात जाऊन मांडवगड येथे तळ दिल्याचा उल्लेख आढळतो.

१७०९ साली उदाजी पवारांनी मांडवगड जिंकून घेतले. १७१८ साली बाळाजी विश्वनाथ जेव्हा दिल्लीस गेले त्यावेळी त्यांच्या सोबत उदाजी पवार सुद्धा होते.  बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर १७२० साली बाजीराव हे पेशवेपदावर आले. सुरुवातीस बाजीराव आणि उदाजी यांची अतिशय चांगली मैत्री होती व बाजीराव पेशवे यांना कारभाराची समज व्हावी यासाठी उदाजी पवार यांनी त्यांचे दिवाणपद सुद्धा स्वीकारले होते.

मराठ्यांचा अमल माळवा आणि गुजरात मध्ये बसवण्याचे खरे श्रेय उदाजी पवार यांना जाते व ऐतिहासिक साधनांत तसे उल्लेखही आढळतात. उदाजी पवार यांनी सौराष्ट्र, काठेवाड, बागड, बुंदीकोट आणि बुंदेलखंड आदी प्रांत जिंकून तेथे मराठ्यांचा अमल निर्माण केला. उल्लेखलेल्या प्रांतात अमल सुरु केल्यावर त्यांनी तेथील चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्यासाठी ताकीदपत्रे लिहिली. 

१७२४ साली उदाजी पवार यांनी मध्यप्रदेशातील धार हे आपले मध्यवर्ती केंद्र करून तेथे आपले ठाणे बसवले. १७२६ साली छत्रपती शाहू महाराजांनी ठरवून दिलेल्या सहा कलमी तहामध्ये गुजरात आणि माळवा येथे मराठ्यांचे राज्य होण्याचे खरे श्रेय उदाजी पवार यांचे असल्याचे उल्लेख आढळतात. १७२८ मध्ये उदाजी पवार आणि मल्हारराव होळकर यांची उत्तरेस नेमणूक करण्यात आली. 

उदाजी पवार यांचे वाढते वर्चस्व पाहून त्यांचे काही अंतर्गत शत्रू तयार झाले व यामध्ये त्यांचे एकेकाळचे मित्र बाजीराव पेशवे सुद्धा असल्याने १७२८ साली त्यांच्यावर आरोप लावून अटक करण्यात आले मात्र अटकेतून सुटका झाल्यावर उदाजी पवार यांनी पुन्हा एकदा मांडवगड जिंकले.

खंडेराव दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात झालेल्या डभईच्या लढाईत उदाजी पवार यांनी खंडेराव दाभाडे यांचा पक्ष स्वीकारला होता. १७३१ साली मांडवघाटावरील तिरलाच्या युद्धात उदाजी पवार यांनी आपल्या समशेरीने मोठा पराक्रम गाजवला.

मध्य प्रदेशात बडवाणी नामक एक संस्थान आहे तेथील अनुपसिंग ठाकूर हा मराठ्यांना मिळाल्याने त्याच्या मुलुखास उपद्रव देऊ नये असे पत्र छत्रपती शाहू महाराजांनी उदाजी पवार आणि मल्हारराव होळकर यांना लिहिले होते. 

कालांतराने बाजीराव आणि उदाजी यांच्यामधील दुरावा दूर झाला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेने बाजीराव पेशव्यांनी उदाजी पवार यांना गुजरात आणि माळव्याचा अर्धा मोकासा दिला कारण हे दोन प्रांत मराठा साम्राज्यात आणण्यास उदाजी पवारांचा मोठा वाटा होता हे बाजीरावांना सुद्धा माहित होते. बाजीरावांनी ज्यावेळी उदाजी पवारांना सनद दिली त्यावेळी त्यांनी सनदेत स्पष्ट लिहिले होते की, आमची सर्व इमारत तुम्हांवरच आहे. येविसी आपले समाधान असो देणे.

छत्रपती शाहू महाराजांनी कोकणात सिद्दीविरोधात जी मोठी मोहीम काढली होती त्यामध्ये त्यांनी आपले सर्व सरदार उतरवले होते व या सरदारांमध्ये उदाजी पवार यांचा सुद्धा समावेश होता. १७३६ साली उदाजी पवारांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड वाडी येथे सिद्दी अंबर अफवानी याच्या विरोधात लढाई करून त्यास ठार मारले आणि नंतर गोवळकोट किल्ल्यास सुद्धा वेढा दिला.

१७३६ च्या शेवटी उदाजी पवार यांचा मृत्यू झाला. उदाजी पवार यांच्यानंतर धार संस्थानाची सूत्रे त्यांचे बंधू आनंदराव पवार यांच्याकडे आली. उदाजी पवार यांनी मराठा साम्राज्यात आपल्या पराक्रमाने मोलाची भर घातली तरीही त्यांच्या कार्याविषयी आधुनिक काळातही अनभिज्ञताच आहे.