संभाजी शहाजी भोसले - शिवरायांचे थोरले बंधू

संभाजी राजेंचा जन्म वेरूळ येथे जिजाबाईंच्या उदरी झाला. त्याकाळी शहाजी महाराजांची निजामशाही दरबारात इतकी ज्येष्ठता होती की खुद्द मुर्तुजा निजामशाह संभाजी राजेंच्या बारशास तेथे हजर होता.

संभाजी शहाजी भोसले - शिवरायांचे थोरले बंधू

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले यांच्याविषयी जाणून घेण्यास कुणास नाही आवडणार? संभाजी राजेंनी आपल्या कर्तृत्वाने युवराजपद प्राप्त केले आहे असे स्वतः त्यांचे वडील शहाजी महाराज यांनी लहानग्या शिवाजी महाराजांना सांगून त्यांची पुणे प्रांती नेमणूक करून स्वराज्य विस्तार करण्याची प्रेरणा दिली होती.

दुर्दैवाने संभाजीराजेंचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे कर्तृत्व फार कमी काळ इतिहासास पाहायला मिळाले. संभाजी राजेंचा जन्म सन १६२३ मध्ये वेरूळ येथे जिजाबाईंच्या उदरी झाला. त्याकाळी शहाजी महाराजांची निजामशाही दरबारात इतकी ज्येष्ठता होती की खुद्द मुर्तुजा निजामशाह संभाजी राजेंच्या बारशास तेथे हजर होता. १६३६ साली शहाजी महाराज जेव्हा पुणे प्रांत सोडून कर्नाटकास गेले तेव्हा संभाजी राजे, जिजाबाई व शिवाजी महाराज त्यांच्या सोबत होते.

तत्पूर्वी शिवनेरीचे किल्लेदार विजयराज विश्वासराव यांची कन्या जयंती व संभाजी राजे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. जयंतीबाईंशिवाय आणखी दोन राण्या संभाजी राजे यांना होत्या ज्यांची नावे गौरीबाई व पार्वतीबाई अशी होती. शहाजी महाराजांनी आपली पुणे जहागीर शिवाजी महाराजांना दिली तर बंगळूर व कोलार ही कर्नाटकातील जहागीर संभाजी राजे यांना दिली त्यामुळे या ठिकाणीच त्यांचे वास्तव्य असे.

कोलार या प्रांतावर पूर्वी चिक्क रायल तिम्मा गौडा याचे राज्य होते ते जिंकून शहाजी महाराजांनी संभाजी राजांना तेथे स्थापन केले. संभाजी राजांच्या पुत्राचे नाव उमाजी असे होते व त्यांचा जन्म १६५४ साली झाला होता. याशिवाय मलकोजी व सुरतसिंग अशी इतर दोन मुलेही त्यांना होती. सुरतसिंग हा उमाजी यांचा सख्खा व थोरला बंधू होता. 

याशिवाय त्यांना कनकराय नावाचा पुत्रही असावा कारण कोंडीपल्ली येथील शिलालेखात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. 

शके कार्तिक वद्य ११ विजय संवत्सर या दिवशी राजाधिराज संभाजी राजा यांचा पुत्र कनकरायजी पंडित याने कोंडीगानहली विकत घेतले व ते गावं सावती यास बक्षीस दिले. 

१६५५ साली कनकगिरीचा पाळेगार सरदार आपाखान याने आदिलशाहीविरोधात बंडखोरी केली म्हणून आदिलशाही दरबारातून अफजलखान व संभाजी राजे यांना पाठविण्यात आले. यावेळी कनकगिरीवर हल्ला केला असता अफजलखानाने लबाडीने संभाजी राजे यांना पुढे पाठवून पाठपुरावा केला नाही त्यामुळे भर लढाईत तोफेचा गोळा लागून संभाजी राजे यांचा मृत्यू झाला.

शहाजी महाराजांसाठी संभाजी राजे यांचे निधन म्हणजे अतिशय मोठा आघात होता व या प्रकारानंतर अफजलखान विरोधात त्यांच्या मनात प्रचंड रोष उत्पन्न झाला होता. पुढे आपल्या थोरल्या बंधूंच्या मृत्यूचा वचपा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा फडशा पाडून घेतला.