रामजी पांगेरा - स्वराज्याचे शूर सेनानी

कण्हेरगड या किल्ल्यावरही आपल्याला सहज विजय प्राप्त होईल या भ्रमात मोगल होते मात्र कण्हेरगडावर शिवरायांच्या तालमीत तयार झालेले एक झुंजार किल्लेदार तैनात होते आणि ते म्हणजे रामजी पांगेरा.

रामजी पांगेरा - स्वराज्याचे शूर सेनानी

शिवचरित्रातील प्रत्येक घटनेस अनन्यसाधारण महत्व आहे. १६३० ते १६८० या शिवकाळातील प्रत्येक घटना ही आजही प्रत्येकास प्रेरणा देणारी ठरते. शिवकाळातील असाच एक महत्वाचा प्रसंग म्हणजे कण्हेरगडाचे युद्ध. याच युद्धात शिवरायांचे निष्ठावंत सहकारी रामजी पांगेरा व त्यांच्या नेतृत्वाखालील ७०० मावळ्यांनी मोगलांविरोधात अतुलनीय पराक्रम गाजवून इतिहासात आपले नाव अजरामर केले.

खरं तर रामजी पांगेरा हे शिवरायांचे अत्यंत जुने सहकारी. रामजी पांगेरा यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती मिळत नाही मात्र रामजी हे खूप पूर्वीपासून स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते याचा पुरावा १६५९ सालच्या अफझलखान वधाच्या प्रसंगात पाहता येतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यावर आदिलशाही सैन्यात जी दाणादाण उडाली त्यावेळी त्याच जावळीच्या खोऱ्यात स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रू व शत्रुसैन्यास नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखान वधानंतर दुंदुभीच्या ध्वनीने शिवरायांच्या सैनिकांना आदिलशाही सैन्यावर तुटून पडण्याची आज्ञा देण्यात आली.

यावेळी कमळोजी साळुंके, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वरखले आणि रामजी पांगेरा हे पाच अग्नीप्रमाणे पाच तेजस्वी वीर एक हजार पायदळासह वेगाने येऊन जावळीच्या जंगलाच्या मध्यभागी असलेल्या अफजलखानाच्या सैन्यास चारही बाजूनी घेरून त्यांचा निःपात केला होता.  

शिवरायांच्या आग्रा भेटीत औरंगजेबाने त्यांना विश्वासघाताने नजरकैद करून ठेवल्याच्या प्रसंगानंतरही महाराजांनी स्वतःची व संभाजी राजांची हुशारीने सुटका करून घेतली. नोव्हेंबर १६६६ च्या अखेरीस शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडास परातल्याची बातमी सर्वत्र पसरली व मोगलांच्या गोटात खळबळ माजली.  

आग्रा येथे झालेल्या दगाफ़टक्यानंतर शिवाजी महाराजांनी मोगलांविरोधात चढाईचे धोरण स्वीकारले व पुरंदरच्या तहात गमावलेला मुलुख व किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या प्रयत्नास लागले. स्वराज्याची हद्द वाढवण्यासोबत महाराजांनी आपले आरमारही बलाढ्य केले. या काळात औरंगजेबाने सुद्धा छुपे राजकारण सुरु करून निराजी रावजी व प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद केले या प्रसंगामुळे शिवाजी महाराजांनी अधिक आक्रमक होत बागलाण, खान्देश, वऱ्हाड, मराठवाडा या मोगलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ले सुरु केले. 

मोगलांच्या ताब्यात गेलेले स्वराज्यातील २३ किल्ले जिंकून घेण्यापूर्वी मराठ्यांनी वऱ्हाड, जुन्नर, नगर, औरंगाबाद व मराठवाड्यातील परिंडा औसा पर्यंत आक्रमण करून मोगलांची नाचक्की केली. यानंतर मोगलांकडे गेलेले २३ किल्ले एकामागोमाग एक जिंकण्याचा सपाटा लावला. १६७० साली सुरतेची दुसऱ्यांदा लूट करून महाराजांनी मोगलांना पुन्हा एकदा हादरा दिला. 

सुरतेवरून परत येताना महाराज खानदेश-बागलाण मार्गे स्वराज्याकडे येत होते यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान याने शिवाजी महाराजांना वणी दिंडोरी परिसरात अडवले यानंतर मराठे मोगल यांच्यात याच परिसरात तुंबळ युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचा दणदणीत पराभव झाला.

१६७० च्या डिसेंबर मध्ये मराठ्यांनी बुऱ्हाणपूर पर्यंत धडक मारली, १६७१ साली मुल्हेरचा किल्ला ताब्यात घेतला. अशाप्रकारे साल्हेर पासून त्रिंबकगडापर्यंतचे चाळीस हुन अधिक किल्ले स्वराज्यात आणून कित्येक नवे किल्ले महाराजांनी पुन्हा वसवले, कोळवण, रामनगर, जवाहीर हा प्रदेश स्वराज्यात आणला, सुरत, बसनूर, बुऱ्हाणपूर व औरंगाबाद ही मोगलांची संपन्न शहरे उध्वस्त केली, खानदेश, बागलाण, वऱ्हाड, गुजरात असे एक एक प्रांत बांधीत चालले व ही बातमी औरंजेबाच्या कानावर पडली व तो चिंतातुर होऊन म्हणाला की,

'काय इलाज करावा? लाख लाख घोड्यांचे सुभे रवाना केले ते (शिवाजी महाराजांनी) बुडविले, नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे? शहाजादे पाठवावे तर तिकडेच फितव्यात मिळून दिल्लीच घेतील. या करीत कोण पाठ्वावयास दिसत नाही. याउपर आपण स्वतः कंबर बस्ती करून शिवाजीवर चालून जावे तर शास्ताखानासारखी गत झाल्यास काय करावे?'

असा विचार करून औरंजेबाने  महाताबखान या सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.

१६७१ साली बुऱ्हाणपूर पार करून महाताबखान महाराष्ट्रात आला. येथून प्रथम तो औरंगाबाद येथे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान याच्यासोबत चर्चा केली. नंतर औरंगाबाद मध्ये जाऊन शाहजादा मुअज्जम याची भेट घेतली. या भेटीत बागलाण प्रदेशावर प्रथम ताबा मिळवण्याचा बेत मोगलानी केला. महाताबखानासोबत संख्येने विपुल असे सैन्यबळ होते याशिवाय मोगलांचा बलाढ्य सेनापती दिलेरखान आणि खानदेशचा सुभेदार दाऊदखान हे दोघे व त्यांचे सैन्यही त्याच्या सोबत होते.

दाऊदखानास बागलाण प्रांताची चांगली  माहिती असल्याने त्याच्या अनुभवाचा उपयोग महाताबखानाने करून घेण्याचा बेत केला व सैन्याचे वेगवेगळे गट तयार करून त्यांना बागलाणातील किल्ले जिंकून घेण्यासाठी पाठवले. सुरुवातीस मोगलांनी बागलाणात जोर पकडून तेथील मार्कंडा, अहिवंत आणि हातगड हे किल्ले ताब्यात घेतले व यानंतर त्यांनी कण्हेरगड या किल्ल्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. कण्हेरगड या किल्ल्यावरही आपल्याला सहज विजय प्राप्त होईल या भ्रमात मोगल होते मात्र कण्हेरगडावर शिवरायांच्या तालमीत तयार झालेले एक झुंजार किल्लेदार तैनात होते आणि ते म्हणजे रामजी पांगेरा.

कण्हेरगडावर कब्जा करण्यासाठी दिलेरखान आपल्या प्रचंड सैन्यासोबत चालून आला. किल्ल्यावर रामजी पांगेरा हे हशमांचे हजारी किल्लेदार होते. दिलेरखान किल्ल्यावर चाल करून येत आहे हे समजल्यावर रामजी पांगेरा यांनी आपल्या सोबतच्या हजार सैन्यास सोबत घेतले. दिलेरखानास रामजी पांगेरा यांच्यासोबत फक्त हजार मराठे आहेत याची माहिती असल्याने हा किल्ला आपण आरामात जिंकू अशी त्याची कल्पना होती मात्र पुढे काय वाढून ठेवले आहे याची त्यास कल्पना नव्हती.

रामजी पांगेरा यांनी आपल्यासोबत असलेल्या हजार शिलेदारांसोबत चर्चा केली व त्यांना सांगितले की दिलेरखान आपल्यापेक्षा संख्येने अधिक सैन्य घेऊन किल्ल्यावर चालून आला आहे तेव्हा आपल्याला किल्ल्याच्या खाली जाऊन प्राणांतिक लढाई लढावी लागेल यासाठी ७०० जणांनी माझ्यासोबत खाली यावे व उर्वरित ३०० जणांनी किल्ल्यावर राहून त्याचे रक्षण करावे.

रामजी पांगेरा यांच्या आवाहनास सर्वच मराठ्यांनी प्रतिसाद दिला व बघता बघता ७०० मावळे घेऊन रामजी पांगेरा गडाखाली आले व दिलेरखानाच्या सैन्यावर विजेसारखे तुटून पडले. चारही बाजूनी मावळ्यांनी दिलेरखानाच्या सैन्यास वेढा घातला आणि हर हर महादेव या नामघोषात ते मोगलांवर हल्ला करू लागले. सभासद बखरीत मराठ्यांच्या या पराक्रमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. 

"एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले"

दिलेरखानाकडे विपुल संख्येत पठाण सैन्य होते व रामजी पांगेरा यांच्याकडे ७०० मावळे होते. मात्र या ७०० मावळ्यांनी दिलेरखानाच्या सैन्यास जेरीस आणले.  दोन्ही बाजुंनी तलवारी, तिर आणि बर्ची या शस्त्रांचा मारा होऊ लागला मात्र स्वराज्यासाठी प्राणही देण्याची तयारी ठेऊन युद्धात उतरलेल्या मावळ्यांना त्याची फिकीर नव्हती. मराठे व मोगल यांची ही लढाई खूप तुंबळ झाली, रामजी पांगेरा व मावळे देह भान विसरून लढत होते यावेळी रामजी पांगेरा व त्यांच्यासोबत असलेल्या ७०० मावळ्यांपैकी प्रत्येकाच्या शरीरावर बाणांच्या व बर्चीच्या तीस तीस जखमा होऊनही ते लढत होते. हा खरच एक चमत्कार होता. 

पाहता पाहता दिलेरखानाच्या १२०० हुन अधिक पठाण सैनिकांना जमीनदोस्त करून रामजी पांगेरा व त्यांच्यासोबत असलेले मावळे धारातीर्थी पडले. हा किल्ला नंतर मुघलांच्या ताब्यात गेला तरी या लढाईची दिलेरखानाने एवढी दहशत घेतली की रामजी पांगेरा व मावळ्यांचा पराक्रम पाहून त्याने काही घटका आपली बोटे तोंडात घातली असे उल्लेख सापडतात.

शिवचरित्रात कन्हेरगडाच्या लढाईस व रामजी पांगेरा व त्यांच्या ७०० मावळ्यांच्या पराक्रमास मानाचे स्थान प्राप्त झाले आहे कारण मोगलांना हादरवून टाकणारा हा युद्धप्रसंग रामजी पांगेरा व ७०० मावळ्यांनी आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवला आहे.