संग्रामदुर्गाचा संग्राम व फिरंगोजी नरसाळा यांचा पराक्रम

स्वराज्य विस्तार करीत असताना शिवाजी महाराजांनी पुणे जहागिरीच्या आसपासचे प्रदेश मिळवण्यास सुरुवात केली यावेळी चाकण चा दुर्ग स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी त्यांनी आपला वकील फिरंगोजी नरसाळा यांच्याकडे पाठवला व त्यांना आपल्या पक्षात घेऊन चाकणचा भुईकोट स्वराज्यात आणून त्याचे संग्रामदुर्ग असे नामकरण केले.

संग्रामदुर्गाचा संग्राम व फिरंगोजी नरसाळा यांचा पराक्रम

पुणे जिल्ह्यातील चाकण हे एक ऐतिहासिक स्थळ. पूर्वी पुणे मार्गे नाशिक येथे जाणाऱ्या मुख्य व्यापारी रस्त्यावर असलेले चाकण ही एक मोक्याची जागा होती व या स्थळाचे रक्षण व्हावे म्हणून तेथे एक बळकट भुईकोट निर्माण करण्यात आला होता.

हा किल्ला पूर्वी आदिलशहाच्या आधीन होता. शहाजी महाराज हे आदिलशाही दरबाराकडे असताना त्यांच्या अंतर्गत जी जहागिरी होती त्यामध्ये चाकणचा समावेश होत असे व चाकणच्या भुईकोटाचे रक्षण करण्याचे काम फिरंगोजी नरसाळा या किल्लेदारांकडे सोपवण्यात आले होते व सुपे परगण्याची जबाबदारी बाजी मोहिते यांच्याकडे होती. 

स्वराज्य विस्तार करीत असताना शिवाजी महाराजांनी पुणे जहागिरीच्या आसपासचे प्रदेश मिळवण्यास सुरुवात केली यावेळी चाकण चा दुर्ग स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी त्यांनी आपला वकील फिरंगोजी नरसाळा यांच्याकडे पाठवला व त्यांना आपल्या पक्षात घेऊन चाकणचा भुईकोट स्वराज्यात आणून त्याचे संग्रामदुर्ग असे नामकरण केले.

१६६० साली औरंगजेबाने शाईस्तेखानास शिवाजी महाराजांवर एक लाख सैन्य देऊन पाठवले यावेळी स्वराज्यावर चालून येताना त्याने ५ एप्रिल १६६० मध्ये सुपे, बारामती व इंदापूर ही शहरे ताब्यात घेतली. येथून पुढे होळ, शिरवळ, शिवापूर, सासवड, राजेवाडी, पाटस, यवत, हडपसर असे एक एक विभाग ताब्यात घेत शाहिस्तेखानाने पुण्यावर आक्रमण केले व ते जिंकून लालमहाल या शिवरायांच्या बालपणीच्या निवासस्थानात तळ ठोकला.

याच काळात शिवाजी महाराज स्वतः पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडले होते त्यामुळे त्यांना शाईस्तेखानास रोखणे कठीण झाले होते. पुणे परिसरात मराठे हे शाईस्तेखानाची नाकेबंदी करण्याचा शक्य तो प्रयत्न करीत होते मात्र स्वतः शिवाय महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात असल्याने मराठ्यांना तितकेसे यश प्राप्त होत  नव्हते.

मराठ्यांनी शाईस्तेखानाच्या व त्याच्या सैन्याच्या अन्नपाण्याची टंचाई भासावी यासाठी पुणे परिसरातील अन्नधान्याचे सर्व स्रोत व साठे नष्ट करून टाकले. यावेळी पावसाळा जवळ येत होता त्यामुळे यावेळी अन्न धान्याची कमतरता भासली तर आपले व सैन्याचे हाल होतील हा विचार शाईस्तेखानाच्या डोक्यात आला यावेळी अहमदनगर या महत्वाच्या मोगली तळावरून चाकण येथे अन्नधान्य पोहोचवणे मोगलांना शक्य होईल हे शाहिस्तेखानाच्या ध्यानी आले व त्याने चाकणचा संग्रामदुर्ग ताब्यात घेण्याचा विचार सुरु केला.

याशिवाय चाकण हे अहमदनगर च्या वाटेवर असल्याने तेथील सैन्याचा पुणे येथील सैन्याशी संपर्क राहील व त्यायोगे पुणे ते नाशिक हा मार्ग मोगलांसाठी निर्धोक होईल हे त्याने जाणले व चाकणच्या किल्ल्यास वेढा घातला.

शिवाजी महाराजांना शाईस्तेखानाने पुणे प्रांतात घातलेल्या धुमाकुळाच्या बातम्या पन्हाळ्यावर येत होत्या व आता चाकणच्या वेढ्याची बातमीही त्यांच्या कानी आली मात्र पावसाळा सुरु झाला तरी पन्हाळ्याचा वेढा काही उठायचे नाव घेत नव्हता. या सर्वास सहा महिन्यांचा कालावधी लोटला मात्र वेढा रेंगाळताच होता. 

चाकण येथे भर पावसाळ्यात शाईस्तेखानाचा वेढा पडलेला असताना या गडाचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आपली सर्व शक्ती एकवटून मोगलांशी लढण्यास सिद्ध झाले. खरे तर मोगलांच्या सैन्याची संख्या फिरंगोजी यांच्या सैन्याच्या तुलनेत खूप होती मात्र आपल्या सैन्यासहित मोगलांच्या सेनासमुद्रास वडवानलासारखे शोषून घेण्याचा निश्चय फिरंगोजी यांनी केला. 

मोगल सैन्य चाकणच्या किल्ल्याजवळ येऊन ठेपले यावेळी शाईस्तेखान स्वतः तेथे हजर होता व त्याच्यासोबत बहुसंख्य सैन्य व तोफखाना होता.  फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ल्यातून बाहेरील परिस्थितीचा अभ्यास केला व किल्ला पूर्णपणे बंद करून टाकला. खानाची फौज किल्ल्याजवळ येताच फिरंगोजी यांनी सैन्यास इशारा केला व किल्ल्यावरून तोफगोळ्यांचा वर्षाव मोगल सैन्यावर होऊ लागला. बंदुकीच्या फैरीही सलग उडत होत्या. या हल्ल्याने मोगल फौज गांगरली त्यामुळे खानाने आपल्या तळास मराठ्यांच्या तोफांच्या टप्प्यापासून लांब जाण्यास सांगितले व तेथे आपला तोफखाना सज्ज करून त्याने चाकणच्या किल्ल्यावर तोफांचा वर्षाव सुरु केला.

तोफांचा मारा करूनही चाकणच्या किल्ल्यातील शिबंदी फुटत नाही हे लक्षात आल्यावर मोगलानी किल्ल्याच्या एकाच भागावर तोफांचा मारा केला व किल्ल्याच्या एका भागास खिंडार पाडले. मात्र एवढे होऊनही फिरंगोजी नरसाळा व मराठ्यांनी मोगलांस बिलकुल दाद दिली नाही व शर्थीने किल्ला लढवला. मराठ्यांचा पराक्रम पाहून खुद्द शाईस्तेखान अचंबित झाला व आता यातून मार्ग कसा काढावा या विचारातून त्याने फिरंगोजी यांना विविध प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र फिरंगोजी बधले नाहीत.

अशा रीतीने २५ दिवस फिरंगोजी व मावळ्यांनी चाकणचा वेढा २५ दिवस लढवला. मोगलांचे अनेक सरदार व सैन्य हा किल्ला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत नष्ट झाले मात्र मोगलांना यश मिळत नव्हते कारण छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सहीसलामत सुटून येईपर्यंत चाकणचा किल्ला आपण लढवलाच पाहिजे या उद्देशाने फिरंगोजी व मावळे जीवाची बाजी लावून लढत होते.

या वेढ्यात मोगलांची मोठी हानी झाली मात्र पुणे प्रांत ताब्यात ठेवण्यासाठी चाकणचा किल्ला ताब्यात घेणे मोगलांकरीता अत्यंत महत्वाचे होते त्यामुळे त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटून चाकणच्या किल्ल्यावर हल्ला सुरु ठेवला व शूर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा व मावळे यांच्या प्रतिकाराचा तब्बल २ महिने सामना करून १५ ऑगस्ट १६६० रोजी चाकणचा किल्ला मोगलांच्या हाती लागला.

मात्र चाकण हा भुईकोट असूनही या वेढ्यात झालेली मोगल सैन्याची हानी पाहून शाईस्तेखानास समजले की स्वराज्याचे निष्ठावंत मावळे हे जर एक भुईकोट लढवताना आपल्यास भारी पडू शकतात तर डोंगरी किल्ले जिंकण्याची तर गोष्टच दूर आहे त्यामुळे शाईस्तेखानाने स्वराज्याचे डोंगरी किल्ले लढवण्याचा नाद चाकणच्या अनुभवानंतर सोडून दिला व खुल्या मैदानात तोफ़खानाच्या साहाय्यानेच मराठ्यांशी लढाई देणे योग्य असा विचार करून त्याने पुन्हा एकदा पुण्याच्या लालमहालात येऊन आपला तळ ठोकला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो महासागर निर्माण केला त्यामध्ये त्यांनी सर्व मावळ्यांना सोबत घेऊनच वाटचाल केली त्यामुळे महाराजांचा एक मावळा सुद्धा शत्रूंच्या शेकडो सैन्यावर सुद्धा भारी पडत असे कारण स्वराज्य नामक महासागराशी समस्त मावळे तनाने व मनानेही जोडले गेले होते. संग्रामगडाच्या या लढ्यातून व फिरंगोजी नरसाळा यांच्या पराक्रमातूनही आपणास याची पुन्हा एकदा प्रचिती येते.